|| बौद्धमय भारत ||
संकलन : डॉ. शांताराम कारंडे
जगातील सर्व आचार्यांमध्ये वा धर्म संस्थापकांमध्ये बुद्ध हे एकटेच असे होते की, ज्यांच्या महान कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. भगवान बुद्धांसारखा त्यागी महापुरूष या भुतलावर अन्य कुणीही अजून तरी झाला नाही. मानवा मानवातच काय..... पण मनुष्य आणि पशू यांमध्ये देखील जी विषमता आढळते तिचा बुद्धांनी निषेध केला. त्यांच्या मते भूतलावरील सर्व जीव एकसमान आहेत.
अवघ्या जगामध्ये बुद्धच असे एकमेव महापुरूष आहेत की ज्यांनी यज्ञातील पशूहत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशूच्या ऐवजी स्वत:चे जीवन बळी देण्याची तयारी दाखवली होती. भगवान बुद्धांनीच सर्वप्रथम मद्यपान निषेधाचा पुरस्कार केला होता. बौद्ध धर्म हा जगातील पहिला प्रचारक धर्म होता आणि त्याने त्या काळातील सगळ्या सभ्य जगात प्रवेश केला, आणि तरीही या धर्माच्या प्रचारार्थ रक्ताचा एक थेंबही सांडावा लागला नाही.
बुद्ध हे इतर सर्व धर्माचार्यांपेक्षा अधिक साहसी, अधिक प्रांजळ होते. कोणत्याही शास्त्रावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या मते वेद हे थापाडे होते आणि सर्वात श्रेष्ठ शास्त्र स्वत: मीच आहे, असे ते म्हणत. जगाला सर्वांग सुंदर नीतिशास्त्राची शिकवण देणारे बुद्ध हेच पहिले मानव होते. बुद्ध हे एक थोर समाज सुधारक होते. भारतातील थोर तत्त्वज्ञांमध्ये बुद्ध हेच असे एकमेव होते की ज्यांना जातिभेद मान्य नव्हता. भगवान गौतम बुद्धांनी प्रचंड शक्तीशाली सत्याची शिकवण दिली. सर्व जगाला त्यांनी भेदभाव न करता शिकवले, कारण ‘मानवाची समानता’ हा त्यांच्या महान संदेशांपैकी एक मुख्य संदेश होता. म्हणून बुद्ध हे समतेचे महान उपदेशक होते.
आतापर्यंत आपल्याला शालेय इतिहासात शिकवले जाते की, भारतावर ब्रिटीशांनी १५० वर्षे राज्य केले, तर ६०० वर्षे मोगलांनी राज्य केले, परंतु ही गोष्ट आम्हाला शालेय इतिहासात शिकविली जात नाही की, "बौद्ध" राजांनी ह्या भारतावर तब्बल १२०० वर्षे राज्य केले. प्राचीन भारताच्या इतिहासावर बौद्धधम्म, तत्वज्ञान व बौद्ध राजांची राजनिती व राज्य यामुळे "पाली" भाषा ही भारताची "राजभाषा" होती, तर "बौद्ध" धम्म देशाचा "राजधर्म" होता.
इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यत भारतात तब्बल २००० लेण्या विविध बौद्ध राजांनी खोदल्या. म्हणूनच बौद्ध धम्म भारतातून लोप पावल्यानंतरही त्याचे अस्तित्व टिकून आहे. हे सर्व पुरावे, हा सर्व इतिहास, प्राचीन भारत हे "बौद्धराष्ट्र" होते ह्याचीच ग्वाही देतात. जगभरात ६०० कोटी लोकसंख्या असून, बौद्धांची लोकसंख्या ही तब्बल १५० कोटी आहे. ही लोकसंख्या तलवारीच्या जोरावर निर्माण न होता, तत्वज्ञान व मानवतावादी विचारांच्या जोरावर निर्माण झाली आहे.
बौद्ध धम्माच्या २५०० वर्षाच्या इतिहासात बिंबिसार, प्रसनेजित, अजातशत्रू, अशोक, कनिष्क, मिलिंद, सातवहान राजे, वाकाटक, हर्षवर्धन व त्यानंतरचे पाल असे छोटे मोठे राजे यांनी बौद्ध धम्माला उघडपणे राजाश्रय दिला. म्हणूनच १२ व्या शतकापर्यंत भारतात तक्षशिला, विक्रमाशिला, नालंदा, वल्लभी, उदंत्तपुरी अशी "बौद्ध" तत्वज्ञानाचा प्रचार करणारी जागतिक दर्जाची १९ विद्यापीठे निर्माण झाली, व जग अंधारात असताना ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान जगाला शिकविण्याचे काम ह्या बौद्ध् विद्यापीठांनी केले.
भारत जेव्हा "बौद्धमय" होता, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने महासत्ता होता. भारत खऱ्या अर्थाने सुवर्णभुमी होता. जगाचा केंद्रबिंदू होता. आजही भारताला संपूर्ण जगात "बुद्धाचे राष्ट्र" किंवा "बुद्धभूमी" म्हणूनच ओळखतात. महिलांना मान-सन्मान होता, सर्वांना न्याय मिळत होता. जागतिक व्यापारात भारताचा वाटा सुमारे ३०% हून अधिक होता. सोन्याचा धूर याच काळात भारतात निघत होता. भारतात कुठेही उत्खनन केले तर तथागत बुद्धांच्या मूर्त्याच सापडतात. एका पाश्चिमात्य पुरातत्त्व अभ्यासकाने म्हटले आहे की, ज्या समाजाचा इतिहास भूमीच्या गर्भात/पोटात मिळतो तोच समाज त्या भूमीचा मालक होय. "बौद्धमय भारत" हीच या भारत देशाची खरी ओळख आहे.