'डी’मार्ट........एक यशोगाथा !
लेखक : डॉ. शांताराम कारंडे
"डी मार्ट" या सुपरिचित व यशस्वी ब्रॅण्डचे सर्वेसर्वा आहेत खूपच साधी राहणी असलेले "श्री. राधाकृष्ण दमाणी". टाटा, बिर्ला, अंबानी किंवा अडाणी यांच्याप्रमाणे फारसं प्रकाशझोतात नसलेलं हे महान व्यक्तिमत्त्व आपल्याला माहीत नसणं स्वाभाविक आहे. कारण भरपूर प्रसिद्धी, टी व्ही वर जाहिराती आणि अमाप मुलाखती किंवा वारंवार पत्रकार परिषदा घेणे..... अशा गोष्टींपासून राधाकृष्ण दमाणी खूप अंतर ठेवून आहेत.
कधीकाळी मुंबईतील ‘स्टॉक एक्स्चेंज’ या ठिकाणी एक साधा शेअर ब्रोकर म्हणून कार्यरत असलेल्या राधाकृष्ण दमाणी यांनी भारतात नुकतीच रुजू घातलेली रिटेल संस्कृती ओळखून या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला स्वतंत्र आउटलेट उघडण्यापासून सुरुवात करण्याऐवजी नवी मुंबईतील नेरुळ येथील ‘अपना बाजार’चं दुकान त्यांनी प्रथम विकत घेतलं. ते इमाने इतबारे चालवून पाहिलं. ते चांगलं चालल्यानंतर त्यांनी ‘डी' म्हणजेच 'दमाणी’ या नावाने पाहिलं 'डी’मार्ट सन २००२ साली पवई येथे सुरू केले.
नुसत्याच धडाकेबाज, भपकेबाज खोट्या जाहिराती करण्याऐवजी स्वस्त पण चांगला माल ग्राहकांना विकायचा हा श्री. दमाणी यांचा दृष्टिकोन नक्की केला होता. ग्राहकांना खरेदीचा श्रीमंती शाही अनुभव देण्यापेक्षा साधेपणातून त्याच्या खिशाची श्रीमंती वाढवण्याचा दमाणींचा विचार अचूक ठरला. डी’मार्टमध्ये खरेदी करणाऱ्यांचा वर्गभेद त्यांनी ठेवलाच नाही. अगदी बिस्कीट, डाळ, तांदुळ यापासून ते पावडर, साबणापर्यंत सगळ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी इथे गरीब आणि श्रीमंत दोघेही महिन्याचं सामान भरायला एकाच रांगेत उभे राहतात. याचं कारण एकच.. खरेदी हा कितीही स्टेट्सचा प्रश्न करायचा म्हटला तरी ‘डेली डिस्काउंट, डेली सेव्हिंग्ज’ या टॅगलाइनपुढे सगळ्यांची मान झुकते. ग्राहकाची हीच मानसिकता तंतोतंत ओळखल्यामुळेच आतापर्यंत सुरू झालेलं डी’मार्ट या साखळीचं एकही शोरूम बंद पडलं नाही.
बरं, ग्राहकांना तरी दुसरं काय हवं असतं? दैनंदिन वापराच्या वस्तू त्यांना रास्त व डिस्काउंट मध्ये मिळाव्यात. आणि हे काम कोणत्याही गाजावाजाविना डी’मार्ट उत्तम प्रकारे करतंय. प्रत्येक व्यक्तीला बाजारहाट हा शब्द अतिशय सुकर करणाऱ्या रिटेल साखळ्या भारतात आल्या आणि भारतीयांच्या खरेदीची व्याख्या बदलू लागली. हातात पिशवी घेऊन दुकानात जाणे मग तिथल्या गर्दीतून वाट काढत आपली यादी पुढे रेमटवणे. दुकानदार जे सोपवील ते घेऊन परतणे या सगळ्या अनुभवावर फुल्ली मारत ग्राहकाला निवडीचा अनुभव देत, आपल्याला हवं ते उत्पादन प्रत्यक्ष हाताळण्याची आणि प्रत्येक किमतीत तुलना करण्याची संधी देत, गारेगार अनुभव देणाऱ्या रिटेल साखळीतील एक मोठं नाव म्हणजे डी’मार्ट.
भारतीय शहरी भागातील मंडळींसाठी आता हा ब्रॅण्ड काय नवा राहिलेला नाही. आणि दिवसेंदिवस डी’मार्ट चा होणारा विस्तार पाहता लवकरच तो खेडोपाडी सुद्धा पोहोचेल यात तिळमात्रही शंका नाही. जीवनावश्यक रोजच्या वापरातील वस्तू डी’मार्टमध्ये उपलब्ध करून देताना दमाणी यांनी अवलंबलेली नीती कोणत्याही नवउद्योजकासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकेल. श्री. दमाणींनी कोणत्याही डी’मार्ट शोरूमची जागा भाडय़ाने घेतली नाही हे विशेष ! प्रत्येक जागा ही त्यांनी खरेदी केलेलीच आहे. त्यामुळे त्याचा त्यांना दीर्घकालीन फायदा झाला. दमाणी यांनी उद्योग सुरू केल्यानंतर तो विस्तारण्याची बिलकूल घाई केली नाही. लहान लहान पावलांनी विस्तारणाऱ्या व्यवसायावर उत्तम नियंत्रण ठेवता येते हे त्यांना अचूक माहीती होते.
रोजच्या वापरातील वस्तूंवर डी’मार्टमध्ये भरघोस सवलत मिळते, कारण रिटेल साखळीतील मंडळी पुरवठादारांना आठवडय़ाने किंवा महिन्याने पैसे चुकते करत असताना डी’मार्टने मात्र ताबडतोब पैसे द्यायचे धोरण ठेवले. लगेच पैसे मिळतात हे पाहिल्यावर पुरवठादारांनीही वस्तू कमी किमतीत डी’मार्टला विकायला सुरुवात केली. त्यामुळे बाहेरच्यापेक्षा दैनंदिन वापराच्या वस्तू इथे कमी किमतीत उपलब्ध होऊ लागल्या. हेच धोरण आता अन्य रिटेल साखळ्यांनी अवलंबायला सुरुवात केली आहे पण या कल्पनेचं श्रेय फक्त डी’मार्टलाच जातं.