रागाचे रंग आणि रंगाचे राग
( हे लेखन केवळ मनोरंजनासाठी असलेने यातून कोणाच्या भावना अथवा मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही . हे कृपया माझ्या सुज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावे ही विनंती . )
प्रकार चौथा : लिंबू राग
या रागामध्ये लिंबू सारखी अवस्था त्या नवरोजी मंडळीची झालेली असते. कापावा तर आंबट आणि ठेवावा तर वातळ .अशी अवस्था त्यांची होते .या रागामध्ये सौभाग्यवती सतत सतत टोमणे देत राहतात आणि या टोमण्यांचा एवढा मोठा परिणाम मनावर होतो की नवरोजी आक्रसून जातात. उदाहरणार्थ लग्न करताना मोठ्यांनं सांगितलं होतं ,म्हणे मी असा आहे मी तसा आहे .आणि बघतो तर काय ? आंब्याच्या झाडाला वांगी लागलेली आणि ती पण कीडकी .. आणि लग्नाच्या अगोदर माझ्या वडिलांना वचन दिलं होतं ,तुमच्या मुलीला मी कसलाही त्रास देत नाही ... आणि लग्नाच्या पहिल्या दिवसापासून जो त्रास सुरू आहे तो अजून पर्यंत काही गेला नाही... आणि म्हणे तुझं करिअर करू ... गेलं खड्ड्यात करीयर .. रांधा , वाढा , उष्टी काढा यात जन्म गेला ..पण किमान म्हणायचं तरी ,तुझ्यासाठी नाही करता आलं ..ते सुद्धा कधी म्हणून झालं नाही ...जी मंडळी दारू पिणाऱ्या पैकी नाहीत ती दारूच्या मागे न लागता एकटेच शांत बसून राहतात. असं घडलं कसं याचा विचार सातत्याने करत राहतात .एकाच छताखाली असून दोघांची बोलती ४-४ महिने अजिबात होत नाही . सारा व्यवहार मुलांच्या नावावरून होतो, उदाहरणार्थ तिकडून ,चिंगे चहा झालाय घेऊन जा . इकडून ,चिंगे, रिकामी कप बशी घेऊन जा आत आणि आज मला शेवग्याची आमटी नको ... अशी बोलणी सुरू होतात. विशेष म्हणजे त्यात कोणीही मध्यस्थी करू शकत नाही . शिवाय हे प्रकरण चार भिंतीच्या बाहेर कधीही जाऊ शकत नाही . उगा नाचकी... बरं सौभाग्यवतींच्या माहेरी हे प्रकरण सांगावं तरी अडचण असते ...म्हणून त्या माहेरी हे प्रकरण घेऊन जाऊ शकत नाहीत .. आणी घराच्या बाहेर हे प्रकरण कुणाला सांगण्याची सोय नसते ...असा हा राग लिंबू सारखाच हिरवट पिवळा आणि आंबट असतो ...म्हणजे साखर घालून केला तर सरबत होतो पण नाही केला तर नुसता आंबट ढयाण असतो ... अशातली गत या रागाची असते .या रंगांमध्ये कोणी माघार घ्यायची यावर बराच वेळ शीत युद्ध चालू असतं . आणि माघार घेतली तर तुम्ही का माघार घेतली ? म्हणून पुन्हा युद्ध सुरू होतं.. आणि या सगळ्या भानगडीत मध्ये अनेक वेळा माघार घ्यावी किंवा न घ्यावी या विचारांच्या गर्तेत नवरोजी मंडळी माघार न घेता सुद्धा जाहीर माफी मागून रिकामे होतात. पण माफी कशाची असा प्रश्न विचारला जातो . तेव्हा होऊन गेलेली घटना आठवण्यासाठी नवरोजीना अर्धा तास तरी लागतो .अशी घटना घडल्यावर सौभाग्यवती म्हणतात ,बघा बघा आपल्या चुका सुद्धा आठवत नाहीत ... मग केवढ्या चुकांची यादी आहे यांची ??? मग पुन्हा युद्धाला भडका .असा हा लिंबू राग पिळावा तेवढा आंबटच होत जातो आणि त्यामुळे संसाराला कंटाळलेली मंडळी कट्ट्यावर येऊन बाहेर निवांत गप्पा मारत असतात. रात्री जेवण सुद्धा बाहेरच घेतात . कदाचित त्यांच्यामुळेच धाबा संस्कृती जोरदार बळावली असा आमचा होरा आहे . या रागाचा प्रर्दूभाव झालेली मंडळी आंबट चेहरा करून कामावर जातात आणि या मंडळींना पाहिल्यानंतर आजूबाजूचे लोक म्हणतात ,लग्न काही पचनी पडले नाही बुवा ... काहीतरी प्रॉब्लेम आहे ...आणि मग त्यांचे चेहरे फुलून जातात आणि मग हा आंबट लिंबूचा रंग आमसुली बनत जातो . त्यातूनच पुढचा राग होतो आमसुली ..
डॉ गजानन पाटील