रागाचे रंग आणि रंगाचे राग
डॉ गजानन पाटील
( हे लेखन केवळ मनोरंजनासाठी असलेने यातून कोणाच्या भावना अथवा मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही . हे कृपया माझ्या सुज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावे ही विनंती . )
( भाग ३ )
प्रकार तिसरा : नारंगी राग
या रागामध्ये सौभाग्यवती जितका तुमचा तिरस्कार करता येईल तितका त्या तिरस्कार करतात. म्हणजे तुम्ही अगदी समोर आला तरी ते तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाहीत .आणि पाहिले तर नाक डोळे मुरडणार . शिवाय जेवायला या , असं म्हणण्या ऐवजी गिळायला बसा ..असा शब्दप्रयोग केला तर शंभर टक्के ओळखायचं हा नारंगी राग आहे. हा राग डोकं दुखवणारा असतो . नवरोजी म्हणाले , माझं चुकलं . तर दाणकन उतर येणार .. शेण खाताना नव्हतं कळत ... आणि मग जो काही त्या इतिहास उगाळणार की नवरोजीची बोलती बंद होणार . तो सर्व आरोप डोक्यावर घेवून सफशेल डोकं सौभाग्यवतीच्या पायावर नवरोजीनी टेकवलं तरी जरा सुध्दा पान्हा न फुटता परत लाह्या फुटू लागतात .. म्हणजे आधी चुका करायच्या आणि वर मी त्यातला नाही म्हणून सांगायचं .असा त्याचा अर्थ होतो. चुका करतो माणूस म्हणूनच माफी मागतो ना ! असं खूप खूप बोललं जातं त्यावेळी ,म्हणजे नवरोजीना मोसंबी - नारंगी पिवून आपणास स्वप्न पडले की काय असा सतत भास होतो ... या रागाचं वैशिष्ट्य असं की एकाच छताखाली राहून कित्येक महिने एकमेकांची तोंड बघितली जात नाहीत .एकमेकाकडे पाहिलं जात नाही. आणि सतत यावरून त्यावरून उणेदुणे काढले जाते .मग नवरोजीला एखादा मित्र सल्ला देतो, तिला माहेरी पाठव कायमची. तर तो नवरोजी हताशपणे म्हणतो ,तिला माहेरी पाठवल्यावर या पोरांचा करायचं कोणी? असेना का भांडकुदळ पण प्रेमळ आहे , खरं बोलणारी आहे .बाहेर तो त्या सौभाग्यवतीची एवढी प्रशंसा करतो की बोलायची सोय नाही .पण घरात मात्र या नवरोजीला प्रचंड त्रास होतो हे बाहेर सांगून कुणालाही खरं वाटत नाही. असा हा नारिंगी रंग असतो म्हणून या रागाच्या रंगामध्ये नवरोजी कधीकधी नारंगी मोसंबी आणि मग पुढे इंग्लिश प्यायला सुरुवात करतात .मूळ सुरुवात कुठून झाली याचा शोध घेतल्यास मूळ येथे सौभाग्यवती कडे असते . हे कुणालाही कळत नाही .तरीसुद्धा सौभाग्यवतीमुळे मला दारू प्यावी लागली असं कोणताही पुरुष प्रथम दर्शनी म्हणत नाही . तर माझ्या दुःखामुळे मी दारू पीत आहे असे म्हणतात .असा हा नारंगी राग आहे . हा राग बरेच दिवस सुरू असला तर पुढचा राग तयार होतो . लिंबू राग...
डॉ गजानन पाटील