रागाचे रंग आणि रंगाचे राग
डॉ . गजानन पाटील
( हे लेखन केवळ मनोरंजनासाठी असलेने यातून कोणाच्या भावना अथवा मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही . हे कृपया माझ्या सुज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावे ही विनंती . )
( भाग २ )
प्रकार दुसरा : केतकी राग
या रागात जरा आक्रमकता जास्त असते .म्हणून याला केतकी राग असं म्हटलं जातं .जसं तुम्ही मुलीला सांगता , दीदी आज ऑफिसमधून येताना मी जेवून येईन .त्यावर अबोली रंग जर विरला तर काहीच प्रतिक्रिया होत नाही .उलट आतून आवाज येतो ,दिदी सांग त्यांना ,संध्याकाळी जेवणाला घरीच या म्हणावं मस्त जेवण करते ...त्यावेळी ओळखायचं अबोली रंगात बदल होत चाललेले आहेत ..पण याच्या ऐवजी असं जर झालं तर तो केतकी रंगांमध्ये मोडतो .म्हणजे जर सौभाग्यवती म्हणाल्या ,असं बाहेरचं खाऊन खाऊन चटावलेले नुसते... घरातल्यांची चिंता नाही... कधी आम्हाला कुठे नेले नाही , कधी हौसेने फिरवले नाही . सदा कदा मित्राच्या पाटर्या जळ्या मेल्या त्या ... असं म्हणत धडाधड भांडी पडण्याचा आवाज आला तर हा केतकी राग असतो हे ओळखावे ... या केतकी रंगाच्या रागांमध्ये अनेक गोष्टी असतात .घरातील चहाच्या कपांचे लग्न लागतात, बशांना पोरं होतात , काचेचे ग्लासाचे व्हराड निघतं . आणि घरातील शोच्या वस्तू जागेवर राहत नाहीत. तर जमिनीवर पडून त्या अनेकविध होतात .या गोष्टीचा त्रास मात्र आपल्याला सोसावा लागतो कारण आर्थिक भुर्दंड आपल्यालाच पडणार असतो ..केतकी राग आपल्या खिशाला परवडणारा नसतो. म्हणून सर्व मंडळांना सूचना आहे की केतकी रागा पर्यंत जाण्याइतपत आपली कोणतीच गोष्ट अनुचित करू नये किंवा अबोली रंगात बदल होतोय असं कळाल्यानंतर लगेच बिनार्शत माघार घ्यावी . माफी मागावी .विरोधी पक्षनेत्या सारखे वागू नये .असा आमचा आपणास सल्ला आहे. हा केतकी रंग अधिक बळावतो तेव्हा नारंगी रंगाचा राग तयार होते...
(क्रमशः )
पुढचा राग : नारंगी राग
डॉ .गजानन पाटील