प्रिय भूमिपुत्र बंधू-भगिनी हो,
आपण सारेच ज्या मातीच्या कणाकणात, शब्दाशब्दात आणि श्रमाच्या थेंबांमध्ये वाढलो, ती माती म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नव्हे, ती आपल्या संस्कृतीची, परिश्रमाची आणि आत्मीयतेची उर्जा आहे.
भूमिपुत्र म्हणजे कोण? जात, धर्म, भाषा किंवा गावाने ठरवलेली ओळख नव्हे — तर ज्या भूमीवर आपण कष्ट करतो, जिच्या कणाकणात आपल्या घामाचा सुगंध मिसळतो, त्या भूमीशी असलेली नाळ — हाच खरा भूमिपुत्रत्वाचा अर्थ आहे.
आज आपण व्यवसाय, शेती, सेवा, शिक्षण किंवा कोणत्याही क्षेत्रात असलो, तरी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी — आपले यश हे केवळ वैयक्तिक न राहता ते समाजाच्या, गावाच्या, राज्याच्या, राष्ट्राच्या उन्नतीशी जोडलेलं असावं.
चांगल्या विचारांची देवाण-घेवाण, प्रामाणिक कष्टांची जाण, आणि एकमेकांना आधार देण्याची तयारी — याचं बळ वाढलं, तर कुठलाही भूमिपुत्र मागे राहणार नाही.
या व्यासपीठावर, कोणीही कुठल्या जातीचा, धर्माचा, किंवा पार्श्वभूमीचा असो — प्रत्येकाला आपलं म्हणता यावं, व्यक्त होता यावं, आणि दुसऱ्याच्या यशात आपलं यश पाहता यावं — हाच आमचा हेतू आहे.
मनात कटुता न ठेवता, मतभेदांना बाजूला ठेवून, आपण एकमेकांसाठी उभं राहिलो तर आपल्या मातीतूनच नवी स्वप्नं उभी राहतील, नवे नेतृत्व तयार होईल, आणि आपल्या भूमिपुत्रांची ओळख ही केवळ नावापुरती न राहता कर्तृत्वाने उजळेल.
चला तर मग, संवाद सुरू ठेवूया…
मृग नक्षत्राची सुरुवात आपल्या विचारांच्या आणि कृतीच्या नवा पेरणीची असो…
आपल्या भूमिपुत्रत्वाचा खरा अर्थ जगाला दाखवूया…!
आपलाच,
विवेक शिंदे, कोल्हापूर