डेटा विषाणू
कार्यालयीन कामासाठी , शिक्षण, मनोरंजन तथा संप्रेषणासाठी(communication) इंटरनेटचा वापर अनिवार्य आहे. संप्रेषणाच्या अनेक माध्यमांमध्ये फेसबुक ,इंस्टा आदी अनेक माध्यमाद्वारे प्रसारित होणारी माहिती ,लेखन ,फोटोस व व्हिडिओस जर संयम व विवेकाने पारखले नाहीत तर तो डेटा विषाणू प्रमाणे ठरू शकतो.
बरीच माहिती ही अभ्यासपूर्ण ,प्रेरणादायी, उपयोगी व मनोरंजक असते ,यात शंका नाही. जी माहिती वादग्रस्त नाही, उद्बोधक आहे,सत्य आहे; ती स्तुत्य आहे. परंतु , काही पोस्टद्वारा करण्यात येणारे विश्लेषण, स्पष्टीकरण यांखाली कोणत्याही वैध वेब लिंक्स, संदर्भ ग्रंथ, मूळ पुस्तकांची /लेखकांची नावे आदी यांचा उल्लेख नसतो. (संदर्भावरून माहितीची वैधता ठरते)काहीवेळा अवैज्ञानीक ,कालबाह्य,असंबद्ध ,अतार्किक दाखले दिलेले असतात. हे त्या लिहिणाऱ्या/प्रसारित करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक मत ,निरीक्षण आणि जबाबदारी असते. परंतु साहजिकच माहितीच्या विश्वासार्हतेबाबत संदेह व संभ्रम असल्यास मूळ शास्त्रज्ञांचे सिद्धांत, मूळ संदर्भ ,धार्मिक ग्रंथ, संहिता यांचा पडताळा व अध्ययन करूनच माहितीचे स्वीकरण करावे, त्यास अनावश्यक अवधान व वेळ देऊ नये, श्रध्दा ,भावना दुखावू देऊ नये.
आपल्या लेखनाबद्दल वाद उत्पन्न होत असतील तर, त्या माहितीचे स्पष्टीकरण, वैध संदर्भ देणे ,अथवा ती माहिती डिलिट करणे ही लेखन कर्त्याची नैतिक जबाबदारी असते. व्हायरलच्या या युगात अशा विवादास्पद पोस्ट, माहिती प्रसारण आणि भावनिक आव्हानांमुळे समाज स्वास्थ्य बिघडल्याची उदाहरणे ही आहेत. अशा विवादास्पद, संदेह जनक महितीकडे वाद न घालता ,दुर्लक्ष करून संयमाचा परिचय द्यावा,स्वतः च्या वेळेचा आदर करावा. वस्तुतः कोणतीही तुलना प्राणी/पक्षी – मानव ,सून – मुलगी ,स्त्री – पुरुष ,निसर्गातील निर्जीव घटक – सजीव ही अयोग्य असते. (मानस शास्त्रात व्यक्तिभेद ही संकल्पना आहे) परंतु, काही सुधारात्मक परिवर्तनासाठी त्याचे उपयोजन केल्यास कुणा एका घटकाची तौलनिक हानी होणार नाही ,वा दुसऱ्या घटकाचे अवास्तव उदात्तीकरण होणार नाही याचे भान राखावे. प्रसारित होणारी चित्रे, व्हिडिओस याबाबतही विवेकबुद्धी जागरूक ठेवावी.
अनेक आदरणीय संत, लेखक, विचारवंत यांची ग्रंथसंपदा निः संशय श्रेष्ठ व कालातीत आहे.परंतु, या महान विभूतींनी (श्री व.पू.काळे, श्री पू.ल.देशपांडे ) त्यावेळी विशिष्ट संदर्भात /प्रसंगाला अनुसरून (कधी काल्पनिक कथा)लिहिल्या आहेत.त्याचा विपर्यास, चुकीचा संदर्भ घेणे आणि त्यावरून आता वाद घालणे हे त्यांच्या सद् अभिवृत्तीस व स्मृतींना यातना देणारे ठरेल. एखादी सामाजिक घटना, निर्णय यावर अभिव्यक्त होताना ,तज्ज्ञांद्वारा त्याची चिकित्सा, पार्श्वभूमी ज्ञात करून घ्यावी.निषेध, विरोध हा सार्थ ,निःपक्ष असावा. तारतम्य सोडून उन्माद अवस्थेचे प्रदर्शन करू नये.
माहिती ,भावना प्रकटीकरणच्या या प्रभावी माध्यमाचा संयमाने व आदर्श वापर करण्यावरून आपल्या ठायी असणारी सद् अभिरुची, सद् बुद्धी ,एकूणच निकोप व्यक्तीमत्व दिसून येते .
माझी वैयक्तिक धारणा मी लेखनातून कुणावरही लादत नाही. आपले लिखाण सर्वमान्य ,सर्वग्राह्य व्हावे हा अट्टाहास कशासाठी? महितीमधला तथ्यांश ,सत्यता आणि सद् हेतू मी पारखते. ओळींमागचा अर्थ मला उमगतो. माझ्या वैयक्तिक जीवनाची व सामाजिक जीवनाची मी सरमिसळ करीत नाही. स्वतः च्या व इतरांच्या ही privacy चा respect/ सन्मान करते. आपल्या ठायी असणारा माहितीचा संचय म्हणजे मला ज्ञान वाटत नाही.समाजाप्रती ते मार्गदर्शक, , प्रबोधक ठरावे तेव्हाच त्याची उपयुक्तता सिद्ध होईल.लाईक्स आणि स्टिकर्स च्या कलेक्शनपेक्षा समाजोपयोगी माहितीच्या प्रसारणामधून मिळणारा शुद्ध, सात्विक आनंद हा मला अनुपम्य वाटतो.
★पूर्णा गंधर्व