बहीण
ही गोष्ट सगळ्यांनाच लागू होते, की एखादी गोष्ट जी कुणाकडे असेल तर त्याला त्याचं तेवढं मोल वाटत नाही. पण तीच गोष्ट जेव्हा आपल्याकडे नसते तेव्हा त्याचं वाटणारं मोल, हे थोडं असल्यापेक्षा जास्त असतं. आणि माझ्यासाठी ती गोष्ट म्हणजे, 'बहीण'.
घरात पाहिलं तर बहीण सोडून सगळीच पात्र भरलेली आहेत, पण ना आम्हाला बहीण होती, ना आमच्या वडिलांना. आहेत तर त्या मानलेल्या किंवा चुलत बहिणी, पण त्या मानलेल्या किंवा चुलत बहिणींना खऱ्या बहिणींची सर कशी येणार.
लहानपणी मी नाराज झालो की मग आईला म्हणायचो, आई मला का बहीण नाही ग, त्यांनाच का आहे. वाटायचं मोठी बहीण असती तर आई बाबांनी मारल्यावर तिच्या कुशीत जाऊन रडता आलं असतं, मग ती सांभाळून घेईल आपल्याला आणि लहान असती तर तिचे लाड पुरवतानाच आयुष्य निघालं असतं आपलं.
दर वर्षीच्या रक्षाबंधनाला, तेवढी राखी बांधावी म्हणून, चुलत बहिणींकडे तेवढा दिवस साजरा करून यायचं, बस नंतर वर्षभर काही पत्ता नाही.
आज काल एखादी गोष्ट प्रभावीपणे सामाजिक माध्यमांच्या मदतीने दाखवता येते, मग त्यात बहिण भावाचं प्रेमही आलंच. मग माझ्यासारखा जेव्हा ते बघतो तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहतंच, सहजासहजी कुणालाही न दिसणारं. दाटून आलेल्या कंठालाही गिळंकृत करून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नसतोच समोर उभा
रक्षाबंधनाच्या दिवशी सामाजिक माध्यमांवर दिवभरातून एकदाही जरी डोकावून पाहिलं तरी तिथं आपल्या भावा बहिणीसोबत टाकलेला एक तरी फोटो असतोच, मग माझ्यासारखा जळकुंडी माणसाने मोबाईल बंद करून निपचित पडावं, एवढंच काय ते करण्यासारखं.
असो, शेवटी दुःख ही बोलून दाखवायची नसतात, ती गिळायची असतात अस वाटतं. कधीतरी मला हे लिहावं लागणारच होतं. ते आज ह्या वाकूळ मनाने लिहिण्यास भाग पाडलं.. कदाचित कुणाला कमीपणाचंही वाटून जाईल... पण शेवटी बहीण नसणाऱ्यांनाही दुःख असतंच...