Marathi Quote in Thought by Na Sa Yeotikar

Thought quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

लेख वाचल्यावर एक share जरूर करावे. म्हणजे इतरांना ही वाचायला मिळेल.

*प्रेरणेतुन नवसाहित्याची निर्मिती*

प्रेरणा व्यक्तीला प्रोत्साहित करून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करून पुढे जाण्याची चालना देते तर शिक्षा ही व्यक्तीच्या मनात न्यूनगंड निर्माण करून मागे नेत असते. म्हणूनच शिक्षेने जे काम होत नाही ते एका प्रेरणाद्वारे होऊ शकते. व्यक्तीच्या जीवनात प्रेरणा देणारी पहिली व्यक्ती म्हणजे आई. जिच्या पोटात नऊ महिने नऊ दिवस बाळ सुरक्षित वाढते ती आई आपल्या बाळाला नेहमीच प्रेरणा देत असते. बाळ जन्माला आल्यापासून आई आपल्या बाळासाठी झटत असते. त्याची प्रगती होत असताना तिला किती आनंद होत असतो. बाळाला बोलता यावे, चालता यावे, पळता यावे, यासर्व बाबीसाठी आई आपल्या बाळाला नेहमी प्रेरणा देते. नुसती प्रेरणा देत नाही तर कठीण प्रसंगात मदत देखील करते. प्रेरणा देणारी दुसरी व्यक्ती म्हणजे शिक्षक. जेंव्हा मूल सहा वर्षाचे होते तेंव्हा ते शाळेत प्रवेशित होते. त्याठिकाणी त्यांचा संबंध शिक्षकांशी येतो. शिक्षक शाळेत शिकवण्यासोबत प्रत्येकाला प्रेरित करत असतो. तुम्ही हे करू शकता याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक निर्माण करतात. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना ओळखून त्यांचा आविष्कार करण्याचे काम शिक्षक करतात. त्यांच्या प्रेरणेने विद्यार्थी कठोर मेहनत करून अशक्य गोष्ट देखील शक्य करून दाखवतात. त्यानंतर तिसरे प्रेरणा देणारे व्यक्ती म्हणजे मित्र. आपल्याच वयाची मंडळी एकत्र येतात तेंव्हा ते मित्र म्हणून ओळखले जातात. जो अचूक मार्गदर्शन करतो कदाचित ते कडू असेल तोच खरा मित्र समजला जातो. व्यक्तीच्या अंगात असलेल्या अनेक बलस्थानाना मित्र चांगल्या प्रकारे ओळखतात आणि तू हे करू शकतोस असा आत्मविश्वास निर्माण करतात त्याचसोबत वारंवार शाबासकीची थाप देत त्याला प्रेरणा देत राहतात. मित्रांच्या या शाबासकीने वेगळा विश्वास मिळत राहते आणि उत्तरोत्तर प्रगती करत असतो. रामायणातील एक प्रसंग येथे नमूद करावेसे वाटते. रावणाने सीतेला अपहरण करून लंकेत नेऊन ठेवलेले असते. सीतेच्या शोधात भगवान श्रीराम, लक्ष्मण, हनुमान आणि वानरसेना सर्व सागर किनारी येऊन पोहोचतात. सीता लंकेत असेल तर तिला संदेश देऊन येण्यासाठी हनुमानाची निवड होते. त्यावेळी हनुमान सागर किनारी चिंतीत मुद्रेत जाऊन बसतो. मी सात समुद्र पार करून लंकेत पोहोचू शकतो की नाही यावर तो विचार करत बसलेला असतो. जांबुवंत त्यांची समस्या ओळखून घेतो आणि हनुमान काय करू शकतो याची जाणीव करून देतो. तेंव्हा हनुमानाला स्वची जाणीव होते आणि तो लंकेकडे उड्डाण करतो. मित्र आपल्यामध्ये लपलेल्या स्वला जागे करण्याचे काम करतात. म्हणून जीवनात आई आणि गुरुजी यांच्यानंतर तिसरे महत्वाचे स्थान आहे. लहान मुलांकडून काही काम करून घ्यायचे असेल तर तिथे प्रेरणाच कामाला येऊ शकते. लहान मुलेच नाही तर कोणाकडूनही काही काम करून घ्यायचे असेल तर प्रेरणा द्यावेच लागेल. आज मी जे काही लिहीत आहे यामागे माझे गुरुजी, मित्र आणि सर्व वाचक वर्ग आहे. ज्यांच्या प्रेरणेने गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने लिहीत आलो आहे. एखादा वाचक जेंव्हा आपला लेख आवडला म्हणून फोन करतो तेंव्हा जी ऊर्जा, प्रेरणा, प्रोत्साहन मिळते ते किती ही पैसा खर्च करून मिळत नाही. वाचकांचे हे प्रेम लेखकांना मिळायला हवे. म्हणून सर्वाना विनंती करतो की, लिहिणाऱ्या हाताला बळकटी येण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी लेख पूर्ण वाचल्यावर एक फोन करावं, एक संदेश पाठवावे. त्यामुळे ते अजून नवनवीन साहित्य लिहून आपली मराठी भाषा समृद्ध करतील. आपल्या मराठी भाषेच्या विकासासाठी नवसाहित्यिकांना प्रेरणा देणे गरजेचे आहे. भविष्यकाळात आजचे साहित्य हेच आपल्या समाजाची ओळख राहणार आहे.

- नासा येवतीकर, 9423625769

पूर्ण लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ....!

Marathi Thought by Na Sa Yeotikar : 111455780
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now