The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
आंब्याचे पान हिंदू संस्कृतीमध्ये आंब्याच्या पानाला विशेष असे महत्व आहे. ज्या दोरीवर सर्व आंब्याची पाने एकत्र केली जातात त्यास तोरण असे म्हटले जाते. अगदी पुरातन काळापासून या आंब्याच्या पानाला घरच्या उंबरठ्यावरच्या दारावर जागा नेमून दिलेली आहे. हिरव्यागार लांब पानामुळे घराची शोभा आणखीन वाढीस लागते. तसे पाहिले तर निसर्गात अनेक झाडं आहेत आणि अनेक झाडांची पाने देखील आकर्षक आणि चांगली देखील आहेत तरी आंब्याच्या पानांची निवड शुभ कार्यासाठी केल्या जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी वर आणि वधू च्या घरासमोर मांडव टाकल्या जाते. त्यासाठी याच पानांचा वापर केला जातो. फुलांच्या हारमध्ये देखील या पानांचा वापर केला जातो. या आंब्याच्या पानाला डहाळी देखील म्हटले जाते. तसं पाहिलं तर आंबा हा गुणकारी आहेच. खास उन्हाळ्यात आपण सर्वचजण आंब्याचा आस्वाद घेत असतो. आंब्यासोबत त्या झाडांची पाने देखील गुणकारी आहेत. या पानांच्या टोकात सी, बी व ए व्हिटॅमिन असते व त्यात अन्य पोषणमूल्येही आहेत. अँटी ऑक्सिडंट म्हणूनही ही पाने उपयुक्त असून ती पाण्यात उकळून अथवा चूर्ण स्वरूपात वापरता येतात. आंब्याची कोवळी पाने टॅनिनने युक्त असतात. डायबेटिसची सुरवात असेल तर ही पाने वाळवून पावडर करावी व पाण्यात रात्रभर भिजवून ती गाळून सकाळी हे पाणी प्यावे. त्याने मधुमेहाची लक्षणे कमी होतात, ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी, रक्तवाहिन्यांचे काठिण्य कमी करण्यासाठी ही पाने उपयोगी आहेत. मनात असलेली अस्वस्थता या पानांनी दूर करता येते. त्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ही पाने टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. पित्तखडे अथवा मूत्रखड्याचा त्रास होत असेल तर पानांचे बारीक चूर्ण पाण्यात भिजवून रात्रभर ठेवावे व हे पाणी सकाळी प्यायलाने पित्तखडे, मूत्रखडे मोडतात व शरीराबाहेर पडतात. सर्व श्वासविकारांवर म्हणजे सर्दी, अस्थमा यावर पानांचा पाण्यात उकळवून केलेला काढा घेतल्याने बरे वाटते. त्यात थोडा मध घातला तर कफावर गुणकारी ठरतो. त्याने बसलेला आवाज सुटण्यासही मदत होते. अतिसार अथवा हगवण झाल्यास अथवा शौचातून रक्त पडत असल्यास सावलीत वाळविलेली पाने पावडर करून दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याबरोबर घ्यावी. कानदुखीचा त्रास होत असेल तर पानांचा रस काढून चमचाभर रस कानात थेंबथेंब टाकत रहावा. कानात घालताना हा रस थोडा कोमट करून घालावा. भाजल्याने झालेल्या जखमा आंब्याच्या पानांची जाळून राख करून ती जखमांवर लावल्याने लवकर भरून येतात. या राखेमुळे त्वचा गार राहते. उचक्या लागत असल्यास अथवा घशाचा त्रास होत असल्यास ही पाने जाळून त्याचा धूर श्वासमार्गे आत ओढावा. पोट स्वच्छ व हलके राहण्यासाठी एका झाकणाच्या डब्यात पाने पाण्यात टाकून झाकण लावावे व रात्रभर ते तसेच ठेवून सकाळी गाळून हे पाणी अनशा पोटी प्यावे. हा उपचार नियमाने केल्यास पोटाचे त्रास होत नाहीत. असे हे गुणकारी आंब्याचे पान आहे. तेंव्हा आपल्या घरात फक्त सणासुदीलाच नाही तर आयुर्वेदिक म्हणून या पानांचे स्वागत करू या. संकलन :- नागोराव सा. येवतीकर मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ *🌼🌸 विचारधारा 🌻🌺* •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• आपण घेतलेल्या कोणत्याही चांगल्या कामासाठी एक पाऊल उचलले की इतरांचीही पाऊले आपल्या मदतीसाठी धाऊन येतात.पण त्या विधायक कामासाठी पहिल्यांदा आपले स्वतःचे पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे. आपल्या मागे येतील का नाही याचा विचार करत बसू नये. 📝 - नागोराव सा. येवतीकर धर्माबाद 9423625769 ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
*" प्रसिद्धीचे वलय .......! "* माणसांच्या जीवनात प्रसिद्धी खूप महत्वाचा भाग आहे. प्रत्येकांना वाटतं की आपण प्रसिद्ध व्हावं. त्यासाठी नाना प्रकारचे कार्य केल्या जाते. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ठरावे, यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते. पण काही लोकं समाजात असे ही आढळून येतात की, ते प्रसिद्धीपासून चार हात दूर राहतात. तरी देखील ते एक ना एक दिवस प्रसिद्धीस येतात. कारण त्यांच्यामध्ये ती प्रतिभा असते. याउलट काही मंडळी प्रसिद्धीसाठी अधूनमधून प्रयत्न करतात. पूर्वीच्या काळी प्रसिद्ध होण्याचं एकमेव साधन म्हणजे वृत्तपत्र. वृत्तपत्रात स्वतःचे नाव प्रकाशित होऊन चार लोकांना वाचण्यास मिळणे ही फार मोठी बाब होती. कारण त्यावेळी आजच्या सारखे सोशल मीडिया नव्हती. काही मंडळी आपलं नाव आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित व्हावे म्हणून पत्राद्वारे आपली पसंद कळवायचे आणि आकाशवाणीवर नुसत्या नावाची उदघोषणा जरी झाली तरी काय आनंद व्हायचा ? चार मित्र त्यांना भेटल्यावर सांगायचे की आकाशवाणीवर आपले नाव ऐकलं होतं. प्रसिद्धीची सवय फार वाईट असते. एकदा जर त्याची सवय लागली तर माणूस त्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करत असतो. आपलं नाव प्रसिद्धी माध्यमात कसं येईल ? याच विचारांच्या तंद्रीत राहतात. प्रसिद्धीचे वलय राजकारणी आणि चित्रपट सृष्टीतील लोकांना खूप भुरळ घालते. नेहमी प्रसिद्धीच्या वलयात राहावं म्हणून अधूनमधून अनेक घटना जाणूनबुझुन घडवून आणतात. प्रसिद्धीची सवय एक व्यसन बनते त्यावेळी मात्र एखादे दिवशी आपले नाव प्रसिद्ध झाले नाही तर मन बेचैन होते, अस्वस्थता वाढते. चांगल्या कामाची जशी प्रसिद्धी होते त्यापेक्षा जास्त खराब कामांची प्रसिद्धी फार लवकर होते. तशी प्रसिद्धी कोणालाही नको वाटते कारण त्यामुळे आपली समाजात नाचक्की होते. म्हणून माणूस चांगल्या कार्याच्या प्रसिद्धीकडे जास्तीत जास्त लक्ष देतो. आज प्रसिद्धीसाठी अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी वृत्तपत्राचे स्थान किंचितही कमी झाले नाही. पेपरमध्ये आपले नाव यावं म्हणून आज ही प्रत्येकजण धडपडत असतो. राजकारणी आणि चित्रपट क्षेत्रातील मंडळीना रोजच प्रसिद्धी मिळते. मात्र सामान्य लोकांना प्रसिद्धी कशी मिळेल ? त्यासाठी मग समाजात काही चांगले कार्य करावे लागेल. तरी मीडियावाले बघतीलच याची खात्री नसते. प्रसिद्धीसाठी सुरू होतो मग नावीन्य काही करायचं खेळ. देशातल्या विविध घटना आणि घडामोडीवर आपल्या नावाचे लेख कविता लिहून पाठविणे. वृत्तपत्रात आपल्या नावाने ते प्रसिद्ध झाल्यावर आनंद होणारच. तीच जर पहिली वेळ असेल तर खूपच आनंद होणार, यात शंका नाही. - नासा
स्वातंत्र्यातील गुलामी सत्तेचाळीसला संपले इंग्रजांचे जुलमी राज्य सुरू झाले भारतीयांच्या मनातील स्वराज्य स्वातंत्र्यानंतरही काही भागात होती गुलामगिरी तेथील राजानी चालविली त्यांची हाराकिरी त्यापैकी दक्षिणेत हैद्राबाद होते एक संस्थान भारत सरकारच्या सुचनेला देत नव्हता मान तेथे होता कासीम रझवी नावाचा सुल्तान रझाकारीच्या नावाने लोकांचा करे अपमान स्वामी रामानंद तीर्थ सर्वांचे पुढारी बनले गोविंदराव पानसरे सारखे शूरवीर मिळाले सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते देशाचे जाणून होते सारे अत्याचार रझाकारी लोकांचे घरावर तिरंगा फडकवूनी केला लोकांनी विरोध याच गोष्टीचा शत्रूला येत होता प्रचंड क्रोध लोकांच्या एकजुटीने त्यांचा पाडाव केला एका वर्षांनी निझामातून मराठवाडा मुक्त झाला - नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड, 9423625769
घरातील शाळा व पालक शिक्षक कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे बदल बघायला मिळाले. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतात संचारबंदी लागू करून लॉकडाऊन करण्यात आले. शाळकरी मुलांसह इतर लोकांनाही लॉकडाऊन म्हणजे काय असते ? याची माहिती नव्हती. पण कोरोनामुळे लॉकडाऊन या शब्दासोबत कॉरंटाईन, पॉजिटिव्ह, निगेटिव्ह, कंटेंटमेंट अशा शब्दाचीही ओळख झाली. अगदी सुरुवातीला हा काहीतरी प्लेगसारखा महामारीचा भयानक रोग आहे आणि त्यापासून वाचण्यासाठी घरी राहणे हेच सुरक्षित आहे, म्हणून सुरुवातीच्या काळात सर्वांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून सरकारला सहकार्य केले. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होती. मात्र जसे दिवस सुरू लागले तसे या कोरोनाविषयी लोकांच्या मनात असलेली भीती जरा कमी होऊ लागली म्हणून त्याचा परिणाम असा झाला की, एका महिन्यात जेवढे बाधित झाले होते तेवढे रुग्ण आज एका दिवसात सापडत आहेत. कोरोनाचा अटकाव न झाल्यामुळे त्याचा अनेक गोष्टीवर परिणाम झाला. उद्योगधंदे बंद झाले. वाहतूक सेवा बस आणि रेल्वे बंद झाली. तसे शाळा-विद्यालये देखील बंद झाली. एप्रिल महिन्यात शाळकरी मुलांच्या परीक्षा होणार होते ते सर्व रद्द झाले, उन्हाळी सुट्टी देखील संपली. जून महिना सुरू झाला की शाळेला सुरुवात होईल असे वाटले पण शासन कोणतेही रिस्क उचलायला तयार नव्हते आणि पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला राजी नव्हते. असे करता करता ऑगस्ट महिना देखील संपला पण शाळा सुरू होण्याची काही चिन्हे नाहीत. गुरुविना शिक्षण आजपर्यंत कोणी विचारात घेतले नव्हते. पण या कोरोनाने गुरुविना शिक्षण घेण्यास सर्वाना मजबूर केले. कोरोना काळात पालक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरू बनले. शाळेत जाता येत नाही तर घरात बसून अभ्यास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली म्हणून पालकांना त्यांचे शिक्षक बनणे गरजेचे झाले. यानिमित्ताने शिक्षक मुलांना शाळेत कसे सांभाळतात ? याची प्रचिती पालकांना नक्कीच आले असेल. शिक्षित, अशिक्षित, जागरूक किंवा जागरूक नसलेल्या अश्या सर्वच पालकांना या कोरोनाच्या काळात आपल्या मुलांसाठी थोडा वेळ द्यावाच लागत आहे. अनेक घरातून याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारीचे सूर ऐकायला मिळत आहेत तर काही ठिकाणी पालक आपल्या मुलांकडून चांगले काम करवून घेत आहेत. शिक्षक मंडळी नेहमी म्हणत असत की, शाळेतील वातावरण आनंदी, प्रसन्न आणि खेळीमेळीचे ठेवण्यासाठी शिक्षक प्रेमळ असणे आवश्यक आहे. हेच तत्व आज घरासाठी लागू पडत आहे. घरातील वातावरण हसत खेळत ठेवले तरच मुले प्रसन्न राहू शकतात अन्यथा त्यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मुलांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्याशी प्रेमळपणाने वर्तन ठेवून त्यांच्याकडून अभ्यासाचे काम करवून घ्यावे लागते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपी जाईपर्यंत त्याचा वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. शाळेचा जसा वेळापत्रक असतो त्यानुसार घरातील शाळा याचे वेळापत्रक तयार करून त्याची अंमलबजावणी केले तर निश्चितच फायदा होऊ शकतो. सकाळची वेळ वाचनासाठी उत्तम असते म्हणून दोन तास मुलांना वाचण्यासाठी द्यावे. त्यात देखील रोजचा विषय ठरवून दिल्यास सर्व विषयांना न्याय देता येईल. त्यानंतर सकाळी दहा ते एक या वेळात ऑनलाईन अभ्यासासाठी राखीव ठेवावे. एक ते चार या वेळात मुलांना त्यांच्या आवडीचे काम करण्याची मुभा द्यावी, जसे की टीव्ही पाहणे किंवा अन्य काही खेळ खेळणे. सायंकाळी चार ते सहा ही वेळ लेखन क्रियेसाठी द्यावे. सहा ते आठ या वेळात काही मैदानी खेळ घराच्या परिसरात खेळण्यास द्यावे आणि रात्री दहाला झोपी जाणे. असा वेळापत्रक आपल्या मुलांना पालकांनी तयार करून दिल्यास मुलांचा नित्यनेमाने अभ्यास होऊ शकतो. आज शिक्षकदिन त्यानिमित्ताने या कोरोना काळात शिक्षक झालेल्या अनेक पालकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ......! - नागोराव सा. येवतीकर 9423625769
नियमाचे पालन करू या, कोरोना रोगाला हरवू या. या वर्षाच्या प्रारंभी भारत देशात प्रवेशित झालेला कोव्हीड - 19 हा विषाणू पाहता पाहता संपूर्ण देश काबीज केला आहे. मोठमोठ्या शहरापासून छोट्या छोट्या गावात कोरोना विषाणू पसरला आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या देशात रोज सरासरी 60 हजार नवे रुग्ण सापडत आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 33 लाख झालेली आहे. याचसोबत मृतांची संख्या 58 हजार पर्यंत झाली आहे. सुरुवातीपासून जनता कर्फ्यु, संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर करून देखील भारतात कोरोनाचा प्रसार का होत आहे, याबाबत ICMR ने दिलेल्या कारणावर प्रत्येक नागरिकांनी चिंतन करणे आवश्यक आहे, असे वाटते. " भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास काळजी न घेणारे आणि मास्क न घालणारे लोकच जबाबदार आहेत असा इशारा ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिला आहे. विदेशात कोरोना रोगाचा प्रसार कसा झाला होता ? याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आणि माहिती सोशल मीडियात यापूर्वी व्हायरल झाले आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. आपण कोणाच्या संपर्कात आलो नाही आणि तोंडावरील मास्क काढलं नाही तर या रोगापासून दूर राहू शकतो. मात्र जनता ही गोष्ट लक्षात न घेता, बेजबाबदारपणे वागत असल्याने हा विषाणू फैलावत आहे. शासनाने लॉकडाऊन का जाहीर केले ? याबाबीविषयी आजही जनता अनभिज्ञ आहे. लॉकडाऊन काळातील टाळ्या वाजविणे यांना लक्षात आहे, दिवे लावणे हे विसरू शकले नाहीत मात्र घरी राहा, सुरक्षित राहा या वाक्याचा खरा अर्थ अजूनही काही लोकांना कळालेले नाही. देशातील सारी जनता जागी व्हावी म्हणून मोबाईलवर जनजागृतीची रिंगटोन लावण्यात आली, लोकांनी त्यातून देखील काहीच बोध घेतले नाही. कोरोना रोगापासून स्वतः दूर राहणे आणि आपल्या कुटुंबाला संरक्षित करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी फक्त तीन गोष्टी पाळलेच पाहिजे. घरातून बाहेर पडतांना नाक व तोंड झाकून राहील असे मास्क वापरले पाहिजे. मास्क नसेल तर निदान रुमाल तरी तोंडावर बांधायला हवे. गर्दीच्या ठिकाणी प्रत्येकांनी तोंडावर मास्क वापरल्याने कोरोनाचा प्रसार थांबविता येऊ शकते. म्हणून सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क लावण्याची प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. त्यासाठी कोणी आपल्यावर कायदा करण्याची वेळ येऊ नये. बाहेर गेल्यावर इतर लोकांशी संपर्क करू नये मग ते किती ही जवळची व्यक्ती असेल. हस्तांदोलन करण्यापेक्षा दुरून नमस्कार हीच पद्धत वापरली गेली पाहिजे. शेवटचे म्हणजे बाहेरून घरात प्रवेश करताना आपले हातपाय पाण्याने स्वच्छ धुवून घरात प्रवेश करणे. या छोट्या वाटणाऱ्या पण आपणाला कोरोनापासून संरक्षित करणाऱ्या सवयी निदान वर्षभर तरी विसरून चालणार नाही. माझ्याकडे ताकत खूप आहे, शरीरात प्रतिकारशक्ती भरपूर आहे, मला कोरोना होणारच नाही अशा कोणत्याही भ्रामक गैरसमजुतीमध्ये राहणाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे. भारतात मृत्युदर कमी असला आणि रिकव्हरी रेट चांगला असेल तरी कोरोना रोगाला समूळ नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने जागरूकतेने वागले पाहिजे. अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडावे अन्यथा घरातच राहण्याची सवय लावून घ्यावे लागेल. लोकांची गर्दी टाळावे म्हणून सरकारने अजून ही रेल्वे सुरू केली नाही, मंदिराचे दार उघडले नाही, शाळा-विद्यालय चालू केले नाही. जोपर्यंत आपण सर्वजण समजदार नागरिक होऊन वागणार नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील, कदाचित 2020 हे वर्ष संपूनही जाईल. तेंव्हा आपली थोडीशी चूक आपल्या परिवारातील सदस्यांना संकटात नेऊ शकते, हे लक्षात असू द्यावे. काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली केंव्हाही बरे. म्हणून सरकारकडून तयार करण्यात आलेल्या प्रत्येक नियमाचे आपण पालन करू या आणि कोरोना महामारीला हरवू या. जय हिंद - नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769
शिक्षण नको ऑनलाईनला आवरा कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घालून या वर्षाच्या सुरुवातीस भारतात प्रवेश मिळविला आणि येथे देखील त्याने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याची साखळी तोडली जावी आणि मनुष्य एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भारत सरकारने संचारबंदीचा आदेश लागू करून लॉकडाऊन जाहीर केले. कोरोना आजाराची सर्वानाच धास्ती होती त्यामुळे या पहिल्या लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्याचा परिणाम असा झाला की, अनेक कारखाने, उद्योगधंदे, दुकाने त्यासोबत शाळा, महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आली. बाराव्या वर्गाची परीक्षा संपली होती मात्र दहाव्या वर्गाच्या परिक्षेतील भूगोल विषयाची परीक्षा न घेता निकाल जाहीर करण्यात आले. बारावी आणि दहावीच्या परीक्षेनंतरच शालेय आणि विद्यापीठच्या परीक्षेला सुरुवात होते. त्यामुळे ह्या सर्व परीक्षा हो नाही करत रद्द करावे लागले आणि परीक्षा न घेता मुलांना पुढील वर्गात प्रवेशित करण्यात आले. पाहता पाहता जून महिना उजाडला तरी कोरोनाचे संकट टळले नाही. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याविषयी अनेक खलबते झाली. पण कोणतेही पालक आपल्या मुलांना संकटाच्या खाईत कसे सोडेल ? शाळा सुरू करण्यास पालकांचा तीव्र विरोध लक्षात घेता शाळा सुरू झाली नाही. हे वर्ष असेच वाया जाते की काय अशी साशंका पालकांच्या मनात निर्माण झाले होते. त्याच काळात मुलांना ऑनलाईन शिक्षण देता येईल का ? याची चाचपणी सरकारने सुरू केली. त्यापूर्वीच काही हौशी मंडळींनी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. ऑनलाईन शिक्षण ह्या गोंडस नावाखाली खाजगी शाळेतून पालकांची अक्षरशः लूट सुरू झाली. शासन काही निर्णय घेण्याचा अगोदर काही खाजगी शाळांनी सोशल मीडियाचा आधार घेऊन मुलांना शिकवणी देण्यास प्रारंभ केली. त्याच्या नावाखाली पालकांकडून शैक्षणिक फीसची मागणी करू लागले. याबाबीमुळे मध्यमवर्गीय पालक हैराण झाले होते. ऑनलाईनच्या शिक्षणात काही मुले शिकण्याच्या ऐवजी मोबाईलवर गेम खेळतात असे काही पालकांकडून तक्रारीचा सूर ऐकायला मिळाला होता. त्याचसोबत मोबाईलवर जास्त वेळ अभ्यास केल्याने मुलांच्या डोळ्यावर व डोक्यावर देखील परिणाम झाल्याचे काही पालकांनी आपले मत व्यक्त केले आहे. खाजगी शाळेत शिकणारे विद्यार्थी हे चांगल्या घरातले असतात त्यामुळे त्यांचे पालक त्यांच्या ऑनलाईन शिक्षणाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतील. मात्र सरकारी शाळेत शिकणारे जे गरीब विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाच्या गरजा खरंच पूर्ण करू शकतील का ? अर्थात याचे उत्तर नाही असे मिळते. मोबाईल दिलं नाही म्हणून एका शाळकरी मुलाने आत्महत्या केली, अश्या बातम्या ही वाचायला मिळाले. ऑनलाईन शिक्षणाने समाजात शैक्षणिक विषमतेची दरी निर्माण झाली आहे, हे सत्य स्वीकारावेच लागेल. कारण पैसेवाल्याच्या मुलांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळत आहेत त्यामुळे त्यांचा नियमित अभ्यास चालू आहे तर ज्यांच्याकडे पैसा नाही, मोबाईल नाही अशा पालकांची मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. म्हणजे एकप्रकारे ते शाळाबाह्य होत आहेत. शिक्षण अधिकार अधिनियमानुसार देशातील प्रत्येक बालकांना समान शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. मग या ऑनलाईन शिक्षणामुळे जी मुले वंचित राहत आहेत, त्यांचे काय ? वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त मागासवर्गीयांची संख्या जास्त आहे. म्हणजे गरीब मागासवर्गीय लोकांवर हा अन्याय नाही का ? लवकरात लवकर या ऑनलाईन शिक्षणावर बंदी आणायलाच हवी. सरसकट सर्व मुलांना समान शिक्षण कसे देता येईल यावर विचारविनिमय होणे आवश्यक आहे. शिक्षक-विद्यार्थी समोरासमोर असल्यावर जी आंतरक्रिया होते, अध्यापन प्रभावी ठरते ती प्रक्रिया ऑनलाईन शिक्षणात दिसून येत नाही. म्हणून ऑनलाईन शिक्षणाच्या बागुलबुवाला आवर घालून सर्व विद्यार्थ्यांचा हिताचा विचार करून शैक्षणिक वर्षाला सुरुवात करावे असे सुचवावे वाटते. - नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769
*जीवनातील अनमोल मित्र* मित्र जीवनात हवेहवेसे वाटतात कारण प्रत्येक सुख-दुःखामध्ये फक्तनिफक्त मित्राची साथ आपणाला मिळते. बालपणीचे मित्र, शाळेतले मित्र, महाविद्यालय मित्र आणि नौकरीच्या ठिकाणी मिळणारे मित्र असे मित्राचे वर्गीकरण करता येईल. बालपणीचे मित्र जेंव्हा खूप वर्षानंतर मिळतात तेंव्हा खूप आनंद होतो. काय बोलावे ? हे ही सुचत नाही. खूप गप्पा होतील, चहा-पाणी होईल, त्या॑नी ज्या ठिकाणी खाल्ले, झोपले, उठले, बसले अभ्यास केले, रुसले, मारामारी केले आणि खेळले त्या जागेत काय काय बदल झाले यावर विचार होईल आणि मनात एक वेगळाच आनंद देऊन जाईल. बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा असे म्हटल्या जाते ते यामुळेच याची प्रचिती यनिमित्ताने पुन्हा एकदा येते. दिवसभर उन्हात खेळण्याचे ठिकाण आज मात्र ओसाड दिसून येते. आज त्या ठिकाणी कोणीच खेळत नाही. मुलांची खेळ खेळण्याची आवड कमी झाली म्हणावे की आई-बाबा त्यांना खेळू देत नाहीत, हे न उलगडणारे कोडे आहे. काही असो पण आम्ही लहान असताना जे काही उद्योग केले, खेळ खेळले, ते आजची मुले नक्कीच करत असताना आढळून येत नाहीत. टीव्हीवरील कार्टून आणि मोबाईलवरील गेमने या मुलांना पुरते वेडं केले आहे. जुने मित्र भेटले की या विषयावर हमखास चर्चा होणारच. शाळेत गेल्यावर जे आपल्या शेजारी बसतील त्याच्या सोबत मैत्री होते. त्यास आपण पाटी मित्र म्हणतो. LKG, UKG सारखे वर्ग त्यावेळी नव्हते त्यामूळे पेंसिल-वही हे पाचव्या वर्गात जाईपर्यंत माहीत व्हायचे नाहीत. कलम-पाटी एवढेच काय आमच्या दफ्तरमध्ये असायचे. बरे दफ्तर तरी कसले ती पिशवीच असायची. शुद्धलेखन असो वा बेरीज-वजाबाकी सर्व काही त्या पाटीवरच. कलम उधार देणारे मित्र फार कमी मिळायचे. शाळा संपल्यावर आम्ही कलम जिंकण्याचा खेळ खेळायचो आणि डब्यात सर्व कलम जमा करून ठेवायचो. काही मित्र कलमने लिहायचे नाही किंवा आमच्या सोबत खेळायचे सुध्दा नाही तरी त्याची कलम कश्या काय संपायच्या याचा शोध लावायला वेळ लागला नाही. शाळेच्या पाठीमागे बसून तो संपूर्ण कलम खाऊन टाकायचा आणि कलम नाही म्हणून लिहिणे टाळायाचा मात्र गुरुजी त्याला कसे सोडणार. ते काही ऐकुन घ्यायचे नाही आणि शेवटी येथे मदत करणारा तो मित्रच. गृहपाठ पूर्ण करणे असो वा एखादे चित्र काढायचे असो त्यावेळी फक्त मित्रच मदतीला धावून येतात. शालेय मित्राची ओळख आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. या लहान वयात हेच तर आपणाला चांगले वळण लावतात. या वयात ज्यांना चांगले मित्र लाभले त्याचे आयुष्य सफल झाल्यासारखे आहे. कारण मित्र हे जीवनाला वळण लावणारे तट आहेत. एकमेकांची खोड काढायची आणि गुरुजींचा मार इतरांना मिळवून देण्यात धन्यता मानण्यात येणाऱ्या या वयात आपल्या मित्रांसोबत केलेल्या लहानमोठ्या चेष्टा मस्करी आज आठवले की हसावे की रडावे हेच कळत नाही. शालेय जीवन असेच हसत खेळत कधी संपले हेच कळत नाही आणि सर्व मित्रांची ताटातूट होते. शाळेतील काही स्वप्नं घेऊन महाविद्यालयात जाऊन पोहोचतो. आजपर्यंत विहिरीत पोहणारे मासे जेंव्हा मोठ्या समुद्रात किंवा नदीत जाऊन पडतात तेंव्हा त्या माश्यांची जी अवस्था होते जवळपास तीच अवस्था या ठिकाणी होते. आपल्या विचारांशी सहमत असणारे मित्र मिळणे खूपच कठीण असते. या वयातील मित्र अगदी सहजपणे जोडल्या जात नाही. यांचे समझदारीचे वय असते. काय चांगले, काय वाईट आहे, कोण कसा आहे या सर्व बाबींचा सूक्ष्म विचार करूनच ते मित्र बनवितात. या ठिकाणी मिळालेले मित्र आजीवन सोबत राहतात. म्हणून यांच्यासोबत कधीही गद्दारी करू नये. अन्यथा जीवनात कोणी मित्र होतच नाहीत. पाण्याशिवाय मासोळीचे जीवन ज्याप्रमाणे काहीच नाही अगदी तसेच मित्राशिवाय जीवन आहे. - नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
मी लिहिलेलं पहिलं पुस्तक पाऊलवाट हे मी लिहिलेलं पहिलं पुस्तक. शालेय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची निर्मिती केली. ज्याप्रकारे एखाद्या स्त्रीला पहिलं बाळंतपणाचे डोहाळे असतात अगदी तसेच मलाही माझ्या या पहिल्या पुस्तकांविषयी झाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी सांगायचो त्या त्या गोष्टी घरी आल्यावर टिपून ठेवायचो. विद्यार्थ्यांना ठरवून असे काही बोलायचे नाही मात्र जीवनातल्या अनेक गोष्टी त्यांना गप्पा मारण्याच्या ओघात सांगत गेलो. त्यातून एक कल्पना सुचली की हे सारे इतर मुलांनाही कळायला हवे. शालेय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक आणि शिक्षक हे देखील अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून त्यांच्या विषयीदेखील या पुस्तकात लिहायचा प्रयत्न केलोय. पुस्तक प्रकाशन झाल्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी ते पुस्तक रोज एका प्रकरणाचे अभिवाचन केले. तेवढा एक आनंद या पुस्तकाच्या निमित्ताने मिळालं. पुस्तक वाचणे खूप सोपे आहे मात्र एखादे पुस्तक लिहून काढणे आणि प्रकाशित करणे खूपच कठीण बाब आहे. प्रकाशकांचा शोध घेणे ही एक दिव्यपरीक्षा आहे, असे मला वाटते. नवोगत साहित्यिकांना लवकर प्रकाशक भेटत नाहीत, एखादे वेळी भेटले तरी पुस्तक प्रकाशनासाठी लागणारा खर्च बघून कोणी पुस्तक प्रकाशित करण्याचा आपला विचार मागे घेतात. पुस्तक लिहिणे, त्यांची छपाई करणे आणि प्रकाशन करणे खरोखरच खूप कठीण असते याची जाणीव एखादे पुस्तक काढल्याशिवाय लक्षात येत नाही. पुस्तक निघाल्यावर त्याची विक्री होईल की नाही याची देखील खात्री नसते. प्रकाशक ही लेखकांना खूप कमी पुस्तक देतात. अर्ध्याहून जास्त पुस्तकं मित्रांना किंवा नातलगांना भेट म्हणून देण्यात संपतात. ते या पुस्तकाचे वाचन करतात की नाही याचे कधी कधी मनात शंकाच येते. उत्तम साहित्याला प्रसिद्धी नक्कीच मिळते. पण एखादा गरीब साहित्यिक असेल, त्याच्याकडे पैसा नसेल तर त्याचे साहित्य कोण प्रकाशित करणार ? त्याचे साहित्य त्याच्याच जवळ पडून राहील. आज सगळेच प्रकाशक व्यावसायिक झाले आहेत. ( हाताच्या बोटावर मोजता येतील असे प्रकाशक सोडून ) मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. त्यातून अशा एक दोन गरीब साहित्यिकांचे साहित्य त्या व्यासपीठावरून प्रकाशित केल्यास संमेलनाचे सार्थक होईल असे वाटते. यदाकदाचित ही पद्धत सुरू झाली आणि पुन्हा तिथे वशिलेबाजी सुरू झाली तर पुन्हा या लेखकांच्या नशिबी वाईट दिवस येतील. एका पुस्तकाचा अनुभव पाठीशी घेऊन त्यानंतर दुसरे पुस्तक प्रकाशन करण्याची कधी हिंमत केली नाही. मात्र याच काळात ई साहित्य प्रकाशनाशी माझा संबंध आला आणि ई साहित्याच्या माध्यमातून काही।पुस्तकं प्रकाशित केलोय. आज माझ्या नावावर पाऊलवाट या पुस्तकासह वैचारिक लेखसंग्रह असलेले सात, एक कवितासंग्रह व कथासंग्रह असे एकूण 10 पुस्तकं प्रकाशित झाले आहे. एक कादंबरी व दोन कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. पुस्तकाची छपाई करून पंचवीस हजार रुपये खर्च करून माझ्या पुस्तकाला जी प्रसिद्धी मिळाली नाही ती प्रसिद्धी ई बुकने मिळवून दिली. आपल्या राज्यातीलच वाचक नाही तर देश-विदेशात जिथे मराठी माणूस आहे तिथे माझे ई पुस्तक वाचले गेले आणि वाचले जात आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आणि पर्यावरण वाचविण्यासाठी ई साहित्य एक चांगले मध्यम असून अगदी अल्प खर्चात आपले पुस्तक प्रकाशन होऊ शकते. वाचकांची संख्या देखील आपण विचार करू शकत नाही यापेक्षा मोठी आहे. पुस्तकं विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे मात्र मोफत पुस्तकं मिळवून वाचणाऱ्याची संख्या जास्त आहे. या वाचकांसाठी खास करून ई साहित्य मोलाची भूमिका बजावत आहे. इंटरनेटवर ई साहित्य लिहून शोधल्यास आपणांस अनेक प्रकारचे आपल्या मनासारखे साहित्य वाचण्यास मिळू शकेल. लॉकडाऊनच्या काळात घरी बसल्या बसल्या आपण कंटाळले असाल तर नक्की वाचत राहा. - नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड 9423625769
चला कवितेच्या जगात ......... कविता म्हणजे गीत-गाणे-काव्य. अगदी लहानपणापासून प्रत्येकांना कवितेची गोडी असते. लहान बाळाला जेवू घालतांना किंवा झोपू घालतांना आई नेहमी काहीतरी गुणगुणत असते. तिचे ते गुणगुणने म्हणजे एकप्रकारे कविताच असते. एक घास चिऊचा एक घास काऊचा म्हणत आई बाळाला जेवू घालते तर निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई हे गीत म्हणत बाळाला झोपू घालते. बाळाच्या कानावर लहानपणापासून असे काव्य आदळत असतात त्यामुळेच कविता आवडत असते. शाळेत जाण्यापूर्वी अंगणवाडी किंवा बालवाडीमध्ये गेल्यावर बाळाच्या कानावर येरे येरे पावसा, एवढा मोठा भोपळा, आपडी थापडी गुळाची पापडी असे बडबड गाणे ऐकायला मिळतात. कवितेला ताल मिळाले की ते गाणे बनते. लहान वयात अश्या तालमय कविता खूप आवडतात. शाळेत प्रवेश केल्यावर मग कवितेचा अभ्यास सुरू होतो. अनेक कविता येथे वाचायला मिळतात. वर्ग वाढत जातात तसे कवितेची गंभीरता वाढत राहते. पुढे कळते की, कविता दिसते सोपी पण त्याची निर्मिती करणे खूप कठीण बाब आहे. जीवनात आजपर्यंत ज्या कोणत्याही गोष्टी सहज आणि सोपी वाटतात प्रत्यक्षात ते करणे खूप कठीण गोष्ट असते. स्वयंपाक करणे हे सोपे आहे असे वाटते मात्र प्रत्यक्षात जेंव्हा किचनरुममध्ये प्रवेश करतो त्यावेळी कळते की किती कठीण आहे. असेच काही कवितेच्या बाबतीत आहे. कवितेत काय असते ? शब्दांचे यमक जुळवले की झाली कविता तयार. पण तसे मुळीच नाही. यमक तर जुळवावे लागते तरच त्याला ताल मिळते पण नुसते यमक जुळवून काही फायदा नाही तर त्यातून काही अर्थ बाहेर पडणे देखील गरजेचे आहे. कवी आपल्या मनातील भावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. साहित्यात कवितेचे अनेक प्रकार आहेत. सोशल मिडीयावर एक नजर फिरवली असता असे दिसून येते की, सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेक शीघ्रकवीचा जन्म झाला आहे. अनेक समुहातील संयोजक नवसाहित्यिकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी कविता तयार करण्याचे कार्यक्रम ठेवत आहेत, काही ठिकाणी ऑनलाईन कविता वाचन चालले आहे, कविसंमेलन देखील घेतल्या जात आहे. अनेक वृत्तपत्रात कवितेला स्थान दिल्या जात आहे. साहित्य निर्मितीसाठी या सर्व गोष्टी खूपच आवश्यक आणि चांगल्या आहेत, याबद्दल वाद नाही. मोबाईल आणि इंटरनेट या दोन गोष्टींमुळे खेड्यापाड्यातला कवी व त्याच्या कविता राज्यात, देशात काय जगात पोहोचत आहेत. ज्याच्याजवळ प्रतिभा आहे त्याची कविता कधी ना कधी नक्की प्रकाशज्योतात आल्याशिवाय राहणार नाही. पण काही मंडळी या सोशल मीडियात असे ही आहेत जे की, दुसऱ्याचे साहित्य आपल्या नावावर प्रसिद्ध करायला देखील मागेपुढे पाहत नाहीत. साहित्याची चोरी करणाऱ्या अशा लोकांवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण बाब आहे. नकल करून कविता करताच येत नाही. त्यासाठी स्वतःमध्ये एक प्रतिभा असावी लागते. अभ्यास करण्याची सवय असावी लागते. भाषेतील व्याकरणाचे नियम माहीत असणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत त्या भाषेतील शब्दसंपत्ती देखील तितकीच महत्वाची आहे. एखाद्या शब्दाला पर्यायी शब्द माहीत नसेल तर कविता करताना अनेक अडचणी येतात. म्हणून समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल शब्द, अलंकारिक शब्द, वावप्रचार, म्हणी या साऱ्या गोष्टींचा चांगला अभ्यास असेल तरच सुंदर कवितेची निर्मिती करू शकतो. कविता करतो म्हणजे करता येत नाही. तर कविता सहज सुचणारी प्रक्रिया आहे. त्याला अनुसरून आपला अभ्यास आणि अनुभव दांडगा असेल तर नक्कीच उत्तम दर्जाची कविता जन्मास येईल. कविता उत्तम आहे किंवा नाही हे स्वतः कवी कधीही ठरवू शकत नाही तर त्यासाठी एक वाचक वर्ग असायला हवे. जे की कवितेतील चूका आणि दुरुस्ती सांगू शकेल. जन्मतःच कोणी कवी किंवा कवयित्री राहत नाही. तर त्यासाठी कठोर मेहनत, परिश्रम आणि अभ्यास करण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे. - नासा येवतीकर
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser