खरोखर आपण कश्यात समाधानी असतो ?आपल्याजवळ जे आहे ते आपणाला कधी माहीतच नसते. ज्याप्रमाणे कस्तुरीमृग कस्तुरीच्या शोधात त्यांच्या सुगंधामागे रानभर फिरत असते. मात्र ते काही त्याला सापडत नाही. कारण ते तर त्याच्या पोटातच असते. आपली देखील अवस्था जवळपास अशीच आहे. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशीच काही स्थिती मानवाची झाली आहे. सुखाच्या शोधात तो अहोरात्र कष्ट करीत आहे. त्या कष्टाच्या प्रवाहात तो वाहून जात आहे. आज त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही तरी तो पैश्याच्या मागे का धावतो आहे. कारण त्याला तशी सवय पडली आहे. परिसाच्या शोधात माणूस कधी परिस सोडून दिला हेच कळत नाही. त्याप्रमाणे सुखासाठी झगडणाऱ्या मानवाला मनाचे समाधान शोधताच येत नाही आणि जरी ते एखाद्याला सापडलेच तरी पुढे काय ? ह्या प्रश्नाच्या उत्तरात पुन्हा शोध चालू. आयुष्यभर जे मिळवण्यासाठी मी झगडलो, ते जर मला मिळाले असेल तर आता पुढे काय ? हे प्रश्न पडायला नको असते. मात्र प्रश्नांची श्रुखंला अशीच चालू राहते. मानवाचे प्रश्न मरेपर्यंत संपत नाहीत म्हणूनच तो कधीच समाधानी राहू शकत नाही. खरोखर समाधानी आहात काय ?
- नासा येवतीकर, 9423625769