रद्दी.............!
लेखक : डॉ. शांताराम कारंडे
हरी रद्दीवाला नावाचा एक मस्तवाल, मोकळ्या मनाचा गरीब माणूस दररोज गल्लीबोळातून फिरत रद्दी विकत घ्यायचा व्यवसाय करीत असे. असाच एके दिवशी तो हरी रद्दीवाला एका चिकू मारवाडी असलेल्या प्रीती नामक गृहिणी कडून रद्दी विकत घेताना बरीच घासाघीस करायला लागल्यामुळे वैतागला होता. तरीही धंद्यामध्ये मंदी असल्याने भाव वाढवून द्यायला तयार तो होतो. मग वजन करण्यासाठी हातगाडीवरील तराजू आणण्याच्या हेतूने तो हरी परत रस्त्यावर जातो तोच त्याची नजर चुकवून ती प्रीती नामक गृहिणी त्या रद्दीच्या गठ्यात एक जाडजूड विट बेमालुमपणे सरकवून देते. रद्दीचा गठ्ठा खोलून न बघताच हरी त्याचे वजन करतो आणि पैसे देऊन तो गठ्ठा घेऊन जातो.
संध्याकाळी प्रीतीचा नवरा घरी येतो तेव्हा बायको नटूनथटून तयार झालेली पाहताच आश्चर्याने विचारतो, आज जेवण बनवायचं नाही का ? त्यावर प्रीती नवर्याला म्हणते, आटपा लवकर, आज आपण सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेवण करुन येऊ. नवरा विचारतो, माझ्याकडे तर पैसे नाहीत, तुला लॉटरी लागली का ? मग परत समजवतो, पुढच्या आठवड्यात बघू. त्यावर प्रीती म्हणते, माझ्याकडे आहेत पैसे! आज मी घरातली सगळी रद्दी विकली! तीही चांगल्या भावात ! नवरा लगबगीने आपल्या खोलीत जातो. बरीच शोधाशोध करतो आणि त्रासिक चेहर्याने बायकोवर खेकसतो, टेबलावर माझे एक जाडजूड फोल्डर होते ते दिसत नाही ? ते कुठं आहे ? तू घेतलयस का ? बायको उत्तरते, ते टेबलावर होतं ते फोल्डर होय ? मी जास्त पैसे मिळवण्यासाठी रद्दीत विकून टाकलं! नवरा झटक्यात खाली बसतो. काय केलंस तू हे? अगं, आयुष्यभराची सर्टिफिकेट्स होते त्यात? लाखो रुपये खर्चून..... अभ्यास करून त्या पदव्या मिळवल्या होत्या. आता त्या डिग्र्या मी कश्या परत मिळवू ?
त्याचवेळी हरी आपल्या घरी रद्दीची वर्गवारी करीत असताना कागदात गुंडाळलेली विट त्याच्या नजरेस पडते. क्षूद्र स्वार्थासाठी लोक किती खालच्या पायरीवर घसरतात, हे बघून तो दुःखी-कष्टी होतो. मग ती विट बाजुला ठेऊन आणि हरी परत आपल्या कामाला लागतो. काही वेळाने सर्टिफिकेट्सचा तो लिफाफाही त्याच्या हाती लागतो. आत पाहतो तर अनेक मोठ्या डिग्र्यांची सर्टिफिकेट्स! हरी मात्र पाहताच राहतो.
इकडे त्या नवराबायकोला रात्रभर झोप येत नसते. एकमेकांवर खेकसाखेकशी करत कसेबसे रात्र ढकलतात. सकाळ होताच ते दोघे त्या रद्दीवाल्याला शोधून काढतात. तो दिसल्याक्षणीच विचारतो, काल तू माझ्या बायकोकडून रद्दी घेऊन गेलास? त्यात तुला एक जाडसर लिफाफा मिळाला का? तुझ्यासाठी तो रद्दीचा भाग असला, तरी माझ्यासाठी तो लिफाफा फार महत्वाचा आहे. आता मात्र हरी त्याला वरून खालून न्याहळतो आणि एका क्षणात चौकशी न करता एक मोठा लिफाफा त्याच्या हातात ठेवतो.
इतक्या सहजतेने परत मिळालेली सर्टिफिकेट्स पाहून नवरा-बायकोच्या आनंदाला उधान येते. नवरा म्हणतो, नाही तरी माझ्या आयुष्याची कमाई गेलीच होती. आता हे घे तुला माझ्याकडून पैसे खास शाॅपिंग करायला! रद्दीवाला हरी खरंच बावळट निघाला. कारण तो त्या नवऱ्याला आरामात ब्लॅकमेल करू शकत होता. आयुष्यभर मेहनत करुनही मिळवलेली सर्टिफिकेट्स करीता बक्षीस म्हणून हजार पाचशे रुपये नक्कीच मिळाले असते..... त्यामुळे रद्दीवाला हरी हा खरंच बावळट निघाला!
नवरा-बायकोचे संभाषण ऐकत दाराआड उभी असलेला हरी बाहेर येऊन म्हणतो, ही घ्या तुमची विट. काल रद्दीत चुकून आली होती माझ्याकडे! रद्दीच्या व्यवसायात मी माझ्या आयुष्यभरात लाख रुपये मिळवू शकेन की नाही, मला माहीत नाही, पण प्रामाणिकपणे जे काही मिळवितो, त्यामुळे रात्री शांतपणे झोपी जातो, कारण मी स्वतःला कधीच फसवत नाही.