अनपेक्षित प्रवास
पहाटेच्या हवेत जरासा गारवा भिनला होता. डिसेंबरची थंडी तशीही जराशी बोचरीच असते आणी त्यातही जर पाऊस पडून गेला असेल तर काही सांगायची गरजच नाही. रस्त्याच्या कडेला उभा राहून तो बसची वाट पाहत होता. श्वेत धुके सर्वत्र पसरले होते. दुर्तफा असलेली झेंडूची शेती मनाला फार प्रफुल्लित करत होती. मोगऱ्याच्या वेलीवरचे दवबिंदू हिऱ्यासारखे लख्ख चकाकत होते. " हा तिसरा महिना तिला न पाहण्याचा" तो स्वतःशीच म्हणाला. त्याचा चेहरा लगेच दुःखाने ओढल्यासारखा झाला. "कदाचीत एक दिवस आधी आपण जर तिला आपल्या मनातल्या भावना सांगितल्या असत्या तर किती बरं झालं असतं. नाहीतरी दुसऱ्या दिवशी आपण तिच्याशी बोलणारच होतो आणी त्याच दिवशी तो जीवघेणा अपघात.. देवा किती हा भयंकर योगायोग.. कुठे गेली असेल ती.. या जगात आहे की नाही? आपल्याला तर तीच्याबद्दल काही ठाऊकही नाही.. देवा! तुझी कृपादृष्टी कायम तिच्यावर असू दे "तो स्वतःशीच म्हणाला. त्याच्या मनाच्या डोहात चिंतेच्या लहरी निर्माण होत होत्या. तो आणी ती दररोज एकाच बसमधून प्रवास करत होते.. जवळपास एक - दोन किलोमीटरच
ते अंतर असेल. त्यानंतर बस एकाजागी थांबत असे आणी मग त्या दोघांचेही मार्ग वेगवेगळे होऊन जायचे. तो तेथून ऑफिसला जायचा आणी ती तीच्या बँकेत कामाला जायची. काही जवळीक फार क्षणीक कालावधीत होऊन जाते. तसंच त्यांच्याही बाबतीत होतं.. त्याला तीच नाव सोडून काहीही ठाऊक नव्हतं.. संवादही फार क्वचित व्हायचा..काही संवाद तर फक्त नजरेतून किंवा हसण्यातूनच व्हायचा. त्याचा Love at first sight वर विश्वास होता म्हणून तो दुसऱ्या दिवशी प्रेमाची कबुली देणार होता पण दुर्दैवाने त्याच दिवशी त्या बसचा अपघात झाला.. तो काही बोलायच्या आधीच अभद्र घडलं. सुदैवाने तो तर त्या अपघातातून बचावला परंतु तीचा काही पत्ता लागत नव्हता म्हणून तो जरासा हतबल दिसत होता.
एवढ्यात समोर बस येऊन थांबली..ढगाळ, लाल, पिवळ्या रंगाचे स्वेटर, मफलर घातलेले लोक बसमध्ये चढत होते. खिन्न मनाने तो ही बसमध्ये चढला. बसमध्ये आधीच फार गर्दी होती म्हणून त्याला बसायला सीट मिळालीच नाही.. तो तसाच तिच्याच विचाररम्यजगात बसमधल्या गर्दीत एकटाच उभा होता. त्याच्या जगात तिचाच चेहरा होता. ईतक्यात त्याला काही वेगळं जाणवलं. त्याची नजर पून्हा गरगरली.. हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. त्याच्या बाजूच्याच कोपऱ्याच्या सीटवर ती बसली होती. अर्ध्या चेहऱ्यावर पट्टी गुंडाळून होती. त्याला पाहून ती हसली त्या हसण्यातही वेदना होत्याच.. तिला पाहून तोही मनोमन सुखावला. बसमल्या उभ्या पोलच्या एका बाजूला तीचा हात होता तर पोलच्या दुसऱ्या बाजूला त्याच्या हाताची बोटे तीच्या बोटांना स्पर्श करीत होती. दोहेही ऐकमेकांच्या नेत्रात आकांत बुडाली होती. चेहऱ्यावर समाधान होत. हा अनपेक्षित प्रवास त्याला आणी तिला फार प्रमोदीत, हवाहवासा वाटत होता.
समाप्त
निखिल देवरे