आता कुठे रमतोय
" आता कुठे रमतोय रे तू ? म्हणजे हल्ली कधी बोलतच नाही. आधी किती बोलायचो ना आपण.. आता कधी बोलणं होतंच नाही. अजूनही रागावला आहेस का ? " आपल्या रेशमी केसांना दूर सारीत 'ती' म्हणाली. चेहऱ्यावर उदासीनता स्पष्ट दिसत होती. कदाचित बऱ्याच दिवसांनी त्याला पाहिल्यावर तिच्या मनाच्या स्वच्छ आकाशात काळजीचे ,हताशेचे आणि आठवणींचे काळपट ढग जमले होते. मनाचे घट्ट जुळलेले बंध जेव्हा दुरावतात तेव्हा त्याच्या धूसर प्रतिमा माणसाच्या चेहऱ्यावर थोंडात दिसतातच ' तो ' ही त्याला कुठे अपवाद ठरणार होता. तिच्या शब्दांनी तो मात्र जरा चपापलाच. चेहऱ्यावर कृत्रिम हास्य आणत तो म्हणाला
" कुठे रमतोय.....रमतोय या सकल विश्वाच्या कृष्णधवल शलाखेत , रमतोय या सुंदर उमललेल्या बकुळसुमनांत , रमतोय या कोवळ्या पर्णरंधाच्या शीतल छायेत , रमतोय या विस्तीर्ण धबधब्याच थंडगार जल अंगावर घेत , रमतोय ईथल्या विहगांशी गप्पा करीत ,रमतोय या रंगीबिरंगी इंद्र्धनुष्याला स्पर्श करीत ,रमतोय ईथल्या पाषाणावर आठवणींच्या खुणा मोजत ,रमतोय आता स्वतःच्या जगात " ताडकन उठून तो आता दूर जाऊ लागला. नेत्रांच्या कडा अश्रूंनी पाणावल्या होत्या पण त्या कधीही तिला दिसणार नव्हत्या......
NIKHIL D