राहून गेलेले काही!
आयुष्याच्या वळणावरती
तो चष्मा काढून पाठी पाही
काही घडले काही घडवले
पण अन राहून गेले काही
म्हणतो मनी तो विचार केला
करीन हे मी करीन ते मी
काय साधले त्यातील आणिक
काय उरले, शोधीन जे मी
दिवस उगवता सूर्याची किरणे
होती कोवळी पिवळी जोवर
वाटे होईन महान कुणीतरी
आला रवि तो माध्यान्ही तोवर
वाटले तेव्हा भर तारूण्यात
लाथ मारता काढीन पाणी
रग अंगातली न जिरता उरली
गात बसे तो तरूण गाणी
करेन मी यंव, करीन त्यंव ही
अंगामध्ये संचारे ती मस्ती
पोटापाठी मग धावत सुटला
वेळच नुरला जशी आली सुस्ती
स्वप्ने बालमनी ती पाटीवरली
पुसून ती जाणारीच होती
तारूण्याच्या उंबरठ्यावर
ठेच एकदा गाणारीच होती
मग सुसाट धावत तो सुटला
आयुष्या मागे जीव घेऊनी
जगण्यासाठी सगळी धडपड
स्वप्नेबिप्ने मग मागे ठेऊनी
खदखद हसते त्याचे तरूणपण
म्हणते, बेट्या जे हवे ते माग!
कुठे निघालो पोहोचलो कुणीकडे
पूर्वायुष्याचा कुठे दिसतो माग?
आता बघतो मागे तो तर
सारे कसे अंधुकसे दिसते
तो बसतो असला निर्विकार
स्वप्न बघुनी त्यास मंदसे हसते