तुझ्या माझ्या नात्याला नाव काय द्यावं?
तुला मी आणि मला तू
आणि काय हवं?
ओंजळ रिकामी माझी म्हणून काय झालं?
तुझा हात माझ्या हाती
आणि काय हवं?
बरसणाऱ्या पावसाने भिजवलं म्हणून काय झालं?
एका छत्रीखाली आपण दोघे
आणि काय हवं?
कामाचा ताण असला म्हणून काय झालं?
तुझे माझे काही क्षण
आणि काय हवं?
थोडा रुसवा फुगवा झाला म्हणून काय झालं?
समजूत काढायला मी आहे
आणि काय हवं?
आयुष्याच्या धावपळीत धडपडलास म्हणून काय झालं?
सावरायला मी आहे
आणि काय हवं?
जगाने पाठ फिरवली म्हणून काय झालं?
तुझ्या सोबत मी आहे
आणि काय हवं?
तुझ्या माझ्या नात्याचं कोड सुटलं नाही म्हणून काय झालं?
तू आनंदी रहा नेहमी
आणि काय हवं?
©ChinmayiDeshpande