कविता
' एज इज जस्ट अ नंबर '
नेहमी माझा गोंधळ असायचा
की मी ' ही ' आहे का मी ' ती'
नक्की कोण आहे बरं मी
शोधताना होते कायम फजिती
लहान असतांना होते मी
छकुली सोनुली बबडी
तेव्हा वाटायचे मला
मी लहान नाही एवढी
शरीराने वाढत गेले
भूमिका बदलत गेले
दिदी ताई मावशी आत्या
अशी विशेषणे लागलें गेले
लग्नानंतर परत बदल झाले
काकू मामी वहिनी झाले
भूमिकांमधील हा बदल
काळानुसार स्वीकारत गेले
आजीच्या हाकेने मात्र
मन पुरते हलले गेले
मग विचारात पडले की
कधी बरं मी म्हातारी झाले
जीवनाच्या रंगमंचावर
असा हैदोस भूमिकांचा
आपण नक्की कोण आहोत
ध्यास जीवा शोधण्याचा
मनाची झाली घुसळण
वर आले सत्याचे नवनीत
त्याचा आस्वाद घेत
सुरू झाले नवं जीवनगीत
सत्याच्या जाणिवेने कळले की
मी तर ती तशीच आहे चिरंतन
शरीर जरी थकले तरी
मी मात्र तीच आहे निरंतर
म्हणूनच आता खात्री पटली
की एज इज जस्ट अ नंबर
अपुन तो हैं हमेशा के लिये
वही का वही बंदा सिकंदर
_ मंजुषा देशपांडे, पुणे.