लालपरीला बदलावे लागेल
मातीचा धुरळा उडवीत लाल रंगाची एसटी ज्याला ग्रामीण भागात बस या नावाने ओळखले जाते, ती येत असताना पाहून बालपणीच्या मनाला कोण आनंद व्हायचा. ' बस आली बस आली ' म्हणून उड्या मारत सर्वाना सांगत आणि ओरडत जाणारी लहान मुले आज कुठेच दिसत नाहीत. मामाच्या गावाला जाण्यासाठी झुक झुक गाडी फार कमी लोकांच्या नशिबात असते. मात्र लाल परी म्हणजे बस सर्वांच्याच नशिबात असते. कारण ती सर्वांच्या गावात जाते. 25-30 वर्षांपूर्वीचा काळ आठवला तर लक्षात येते की, दळणवळणासाठी बस किती महत्वाचे होते. ग्रामीण भागात त्याकाळी बैलगाडीच्या नंतरचे प्रवासासाठी बस हेच माध्यम होतं. सायकल वगळता कसल्याही प्रकारचे वाहन गावात नजरेस येत नसे. त्याचमुळे प्रत्येक व्यक्ती दररोज या लालपरीची चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो अगदी त्याप्रमाणे वाट पाहत असत. बस आल्याचा सर्वात जास्त आनंद बालगोपाळाना व्हायचा. आज तशी परिस्थिती राहिली नाही आणि बसनेच प्रवास करावा लागेल असे ही नाही. आज प्रत्येकांच्या घरी दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे बसची वाट पाहणे किंवा बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेने फार कमी झाली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तरी ही बसने प्रवास करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, कारण लोकसंख्या ही त्या प्रमाणात वाढत आहे ना ! ग्रामीण भागात तुलनेने कमी फेऱ्या मारणाऱ्या बसेस असतील मात्र लांबपल्यासाठी धावणाऱ्या बसेसची संख्या काही कमी नाही. तालुका, जिल्हे, मोठी शहरे व तीर्थक्षेत्राच्या बसस्थानकातील गर्दी पाहून आजही बसेसला अच्छे दिन आहेत याची प्रचिती येते. खाजगी वाहनांची प्रचंड स्पर्धा लक्षात घेता प्रवासी आज ही बसलाच पहिली पसंदी देतात. काही वेळा नाईलाजास्तव प्रवाश्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. पण खाजगी वाहनाने प्रवास करतांना इच्छित स्थळी सुखरूप पोहोचणार काय ? याबाबत प्रवाश्यांच्या मनात नेहमीच धाकधूक असते. कारण या वाहनाच्या ड्रायव्हरकडे वाहन चालविण्याचा परवाना असतोच असे नाही. ते सुरक्षित वाहन चालवित नाहीत. रस्त्यावर आजपर्यंत जे अपघात झाले आहेत ते जास्तीत जास्त अश्या खाजगी वाहनाचे आहेत. त्याउलट बसचे ड्रायव्हर हे शिक्षित आणि जबाबदारीने चांगल्याप्रकारे वाहन चालविणारे असतात. म्हणूनच बसचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जातो. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक वाडी, पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे एसटी होय. जेष्ठ नागरिकांसाठी ही हक्काची गाडी समजली जाते. ' प्रवाश्यांच्या सेवेसाठी ' ह्या ब्रीद वाक्याला जगणारी सेवा म्हणजे एसटीची सेवा होय. पण आजकाल हीच एसटी तोट्यात चालली आहे किंवा डबघाईला आली आहे असे अनेकजण बोलत असतात. कदाचित ते खरे ही असेल कारण एसटीला आज भरपूर प्रतिस्पर्धी निर्माण झाले आहेत. आज दळणवळण करण्यासाठी फक्त एसटी हे एकच साधन उरले नाही. ह्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एसटीला स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे.
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769