Marathi Quote in Motivational by Na Sa Yeotikar

Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#भाग्य
नव्यानेच सासरी गेलेल्या मुलीचे आईस पत्र

प्रिय आई,
साष्टांग दंडवत.
विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की, आज मला तुझी फारच आठवण येत होती. का ? कोण जाणे ? तुझ्याशी जरा बोलावे वाटलं म्हणून घरातील सारे कामे संपवून माझ्या खोलीत येऊन तुला मनातलं पत्र लिहीत आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय असते ? हे सासरी आल्यानंतर कळाले. माझ्यावर तुझं रागावणं किंवा बोलणं त्याचे मला तेवढं काही वाटायचं नाही. पण आज पदोपदी तुझ्या त्या बोलण्याचा अर्थ कळायला लागलंय. सकाळी लवकर उठलं नाही तर तू माझ्यावर रागावत होतीस, सासरी गेल्यावर कशी करतेस ? असं तुला कोणी उशिरा पर्यंत झोपू देईल का ? नाही गं आई, आज मी गेल्या सहा महिन्यांपासून सकाळी साडेपाचलाच उठते आहे. सकाळची सारी कामे मला एकटीलाच करावी लागतात. मला कामाचा कंटाळा नाही आहे गं, पण हे लोकं एवढे कसे आळशी आहेत ? याचाच मला प्रश्न पडतो. छोट्या छोट्या गोष्टीसाठी देखील मलाच आवाज देतात. मीच ते करावं लागतं. आई, तू एकदा म्हटली होतीस बघ, सासरी आराम करायचं असेल तर माहेरी खूप काम करावं. हे तू कोणत्या उद्देशाने म्हटली होतीस मला माहित नाही पण मी तुला कोणत्याच कामात मदत केली नाही म्हणून सासरी मला एवढा त्रास सोसावा लागत आहे वाटतं. साखरेची चव गुळाला येत नाही त्याप्रमाणे सासू किती ही आई समान असेल तरी आई नसतेच मुळी. आईच्या कुशीत झोपणे असेल किंवा तिच्याशी मनमोकळे बोलणे असेल आपल्या सासूशी करता येत नाही. कित्येक जण म्हणतात की, माझी सासू आई सारखी आहे. त्यांचे बोलणे वरवरचे वाटते. आईची जागा अन्य कोणीच घेऊ शकत नाही. आई, आज किती तरी दिवस झाले माझा आवडती मालिका तारक मेहता का उलटा चष्मा पाहिला नाही. एके दिवशी सहजच ती मालिका पाहत होते आणि जोरजोरात हसत होते. तर सासू आणि सासरे माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. थोड्या वेळासाठी मी विसरले होते की, मी माहेरी आहे सासरी. लगेच टीव्ही बंद केला आणि माझ्या खोलीत येऊन पडलो. त्यादिवसापासून मी ती मालिका पाहिलेच नाही. माझ्या अश्या अनेक गोष्टीवर बंधने आल्यामुळे मी स्वातंत्र्यातुन पारतंत्र्यात गेल्यासारखे भासत आहे. आई, सर्व काही चांगले आहे. जेवायला काही कमी नाही पण भूक लागतच नाही. पैसा भरपूर आहे मात्र काही खरेदी करावेसे वाटत नाही. घरात माणसांची संख्या खूप आहे पण माझ्या मनाला समजून घेणारे कोणी नाही. डोळ्याला दिसायला सुख, समृद्धी, पैसा, अडका भरपूर आहे मात्र माझे मन अजून आनंदी झालं नाही. तुझी प्रत्येक शिकवण लक्षात ठेवून मी वागत असते मात्र ह्यांना त्याचे काही देणेघेणे नसते याच अविर्भावात वागत असतात. मला घराच्या बाहेर जाता येत नाही की मनासारखे काही करता येत नाही. मी पूर्णपणे कळसूत्री बाहुली बनली आहे. हे ही दिवस जातील आणि भविष्यात चांगले दिवस येतील, माझे भाग्य नक्की उजळेल याची मला खात्री आहे, या एका आशेवर जगत आहे. बाबा कसे आहेत ? तब्येतीला जपायला सांग आणि हो यातलं काहीपण बाबांना कळू देऊ नको. उगीच ते काळजी करतात. बाकी सर्व खुशाल आहे. दिवाळीला घेऊन जायला नक्की या, एक पंधरा-वीस दिवस राहणार आहे यावेळी. घरी आल्यावर भरपूर बोलायचं आहे तुझ्याशी. पत्र थांबविते. पत्राचे उत्तर पाठव, मी वाट पाहत आहे.

तुझीच लाडकी
नयना

नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद

Marathi Motivational by Na Sa Yeotikar : 111446763
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now