काव्योत्सव २.०
भावनाप्रधान
चांदणे पेरून जा
क्षणांवर माझ्या मोहर तुझी कोरून जा
नको चंद्र पुनवेचा, थोडे चांदणेच पेरून जा
पिंजून ढगास वस्त्र शुभ्रतेचे घे विणूनी
जाता जाता थोडी निळाईही पांघरून जा
किती वाट पाहिली माझ्यातल्या चातकानी
होऊन थेंब हलकेच मनात खोल झिरून जा
तुझ्यासाठीच होता ठेवला वसंत हा जपूनी
आज इथल्या फुलांसवे तूही बहरून जा
साक्षीला आहेत साऱ्या विखुरल्या आठवणी
पसारा माझ्या मनीचा एकदा आवरून जा
रंग माझ्या प्रेमाचा नकोच घेऊस ओढुनी
सावळ्या रंगात रंगल्या राधेस फक्त स्मरून जा
एकदाच ये अशी बंध सारे तोडूनी
स्वत:लाच माझ्याकडे कायमचे विसरून जा
- मीनल