#काव्योत्सव -२
#भक्ती अभंगकाव्य
मनाचिया गूढगर्भी तेजाळली एक मूर्ती!
कवणा सांगू तिची किर्ती, मायबापा!!
सावळे ते रूप स्थापियले अंतरी
वसविले निरंतरी माझ्या चित्ती!!
नयनांच्या कमळांचे भाव ठसले डोळ्यात
कटेवरी हात, पाय समचरण साधिती!
उजळला देह माझा, काया जाहली पुनीत!
झाले स्थिर अवयव झळाळली बुद्धी!!
उन्मनी साधली जीव झाला एकाकार!
सावळ्याच्या परिसस्पर्शे जीव शिव अद्वैताती !!
माझेपण रिते झाले उरली केवळ भक्ती
आसावली माझी मती तुझिया प्रिती!!
देह आणि मन बुद्धी जाहली तुझीच आता
गुरूकृपे मीच धन्य लागली समाधी!!