समाधान
आयुष्यात समाधान कमावण्याचा मी खूप प्रयत्न केला,
पण त्यानेच दरवेळी आमच्या भेटीचा खेळ-खंडोबा केला.
आता समोर दिसते आहे, हळूच जाऊन पकडावे,
त्याने मात्र अलगद सुटून दूर उभे राहून हसावे.
प्रयत्नांना शिस्तीची जोड देऊन आक्रमणाची मी वाढवली धार,
ते खुदकन हसले, म्हणले मनावर घेऊ नकोस फार.
समाधान सापडत नाही, मिळत नाही म्हणून केला होता मी त्रागा,
नकळतच हातातून सुटत चालला होता हातातील सुखाचा धागा
समाधानामागे मी धावत होतो जोरात,
ते मात्र माझ्याशी लपंडाव खेळत होते जोमात
शेवटी मी ही थकलो, जरा निवांत बसलो
ते मला खुणावत होते पण मी नाही धावलो
त्याच्या या चालाखीवर प्रथमच मन नाही भूलले,
आणि नकळतच या खेळाचे गुपित मला कळले
आता त्याच्या मागे धावत नाही, मोकाट सोडले आहे त्याला
तेच सारखे निमित्त शोधून भेटते आहे, भेटून खिजवते आहे मला
आता मी हसतो, सुखात असतो, सुटू देत नाही धागा
समाधान असते जवळच कुठेतरी, मला ठाऊक आहे त्याची जागा.
मला समजले तेच तुम्हालाही सांगतो,
जेव्हा मन मृगजळा मागे धावायचे थांबते,
त्याचवेळी आयुष्यात सुखही समाधानाने नांदते.
Swapnil