Desire/ कामना,
Maslo ,Garret, गोल्डसन आदी अनेक आदरणीय मानस शास्त्रज्ञांनी गरजा, प्रेरणा यांचे अनेक प्रकारे वर्गीकरण केले आहे. जसे जन्मजात (Innate motives), biological जैविक प्रेरण यात तहान भूक, श्वसन ,उत्सर्जन, कामना, निद्रा आदी चा समावेश आहे. या सर्व गरजा सर्व सजीवांठायी नैसर्गिक असल्या व कामना हे जैव प्रेरण असले तारीहीमनुष्य या सजीवासाठी कामना पुर्ततेसाठी विवाह हा एकमेव वैध मार्ग; न्याय, संस्कृती द्वारा निहित आहे . कारण, मनुष्यास इतर सजीवांहून भिन्न करणारा बुद्धी हा अलौकिक घटक निसर्गानेच बहाल केलेला आहे. बौद्धिक घटकामुळेच माणूस हा इतर पशुहून भिन्न किंबहुना श्रेष्ठ ठरतो. केवळ म्हणून प्रारंभिक अन्न साखळीत शेवटच्या स्थानावर असणारा मानव आज सर्वात वरच्या स्थानावर विराजमान आहे.
याशिवाय ,श्वसन ,भूक ,तहान,निद्रा , उत्सर्जन या जैव प्रेरणांइतकी कामना ही अत्यावश्यक तात्काल पुर्ती योग्य गरज नाही. या ऊर्जेचे नियंत्रण, दमन, अन्य विधायक मार्गाकडे रूपांतरण सहज शक्य आहे. मानसिक आरोग्य उत्तम असल्याचे ते एक साधारण लक्षण आहे. समाजसेवा, कला- कसब, वाङमय, शौर्य, खेळ, वात्सल्य, श्रध्दा भाव ,योग अशा ध्येयाने प्रेरित होऊन, अविवाहित वा वियोगाउपरांत संतुलित किंबहुना आदरणीय जीवन व्यतित करणाऱ्या थोर व्यक्ती(स्त्री, पुरुष) भूतकाळात आणि वर्तमान काळातही आहेत.
मनुष्यठायी असणाऱ्या सर्व उर्जाचे सकारात्मक रूपांतरण ,दमन वा अन्य सुयोग्य मार्गाकडे वळविणे याचे अद्ययावत ज्ञान प्राचीन संस्कृती आणि आधुनिक मानस शास्त्र या दोहोंना आहे. मूर्ती/वास्तू कला, काव्य ,श्रम ,व्यायाम, शौर्य ह्या विधायक मार्गाने श्रुंगार भावना उत्सर्जित करता येतात.
पौगंडावस्थेतील मुलांचे स्वप्न रंजन, अतिरिक्त शारीर ऊर्जा,मानसिक उर्मी यांचा व्यय करण्यासाठी कथा /काव्य, मैदानी खेळ, विविध स्पर्धा, श्रम दान,सेवा, योगा यांचा समावेश त्यांच्या दैनंदिनीत करावा,त्यांना प्रशिक्षित करावे असे शैक्षणिक मनोविज्ञान सांगते.
कोणत्याही नैसर्गिक क्षमता ,गरजा ,प्रेरणा या सुयोग्य ,समाजमान्य रीतीने अभिव्यक्त करणे,प्रगट करणे हे सुदृढ मानसिक आरोग्याचे लक्षण आहे. सामाजिक आरोग्यसुद्धा याद्वारे अबाधीत राहते.
म्हणूनच परंपरा असो वा विज्ञान मानवास संतुलित किंबहुना “माणूस “बनण्याचाच संदेश देतात.
★ पूर्णा गंधर्व