दिवाळी अंकावर मंदीचे सावट
दिवाळी आली म्हटले की एका बाजूला फराळ व दुसऱ्या बाजूला दिवाळी अंकांचे वाचन असे जणू समीकरणच काही वर्षांपासून ठरून गेले आहे. खवैय्ये व वाचक या दोघांची भूक भागवण्याचा हा उत्साही सण. या वर्षी मात्र दोन्ही बाजूनी मंदीचे सावट पसरले आहे. बाजारपेठेतील मंदी, पावसाचे थैमान, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका यामुळे सर्वसामान्य माणूस हतबल झालेला दिसत आहे. प्राप्त परिस्थितीवर मात करून दिवाळी आनंददायी करण्याकडे सर्वसामान्यांचा कल आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बाजारात मंदीची लाट पसरल्याचे दिसून येत आहे. वस्तूंचे भाव वाढले आहेत. आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे. यापूर्वी जो उत्साह दिवाळीच्या आधी जाणवत होता तो फारसा दिसून येत नाही. तरीही संकटावर मात करून घराघरातून हा सण साजरा केला जातोय. फराळाच्या पदार्थांची विक्री करणारे मोजके स्टॉल दिसून येत आहेत. त्याच्या किमती देखील वाढल्या आहेत. पावसाचे अहोरात्र थैमान सुरू असल्याने बाजारपेठेत फारशी गर्दी नाही. सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. सर्वसामान्य पैशाचे वाटप होईल व दिवाळी सण चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल या अपेक्षेत होते. मात्र त्यांची निराशा झाली. यावेळी आर्थिक वाटप कमी झाले. मोजक्या कार्यकर्त्यांनी हात धुवून घेतले. मतदारांच्या नावावर नुसत्याच रकमा पडल्या. फायदा मात्र राजकीय दलालांना झाला. मतमोजणी नंतर त्याचेही चित्र स्पष्ट होईल. त्याची रंगतदार चर्चा देखील होईल.
नोकरदारांचे पुढील महिन्याचे पगार सेवानिवृत्त लोकांची पेन्शन याच महिन्यात बँक खात्यावर जमा झाली असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पुढील महिन्यात आवक नसल्याने त्यांना नियोजनबद्ध खर्च करावा लागणार आहे. दिवाळी अंकाला देखील आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. दरवर्षी सुमारे 350 च्या आसपास दिवाळी अंक उपलब्ध होतात. या वर्षी आतापर्यंत 50 च्या आसपास दिवाळी अंक स्टॉल वर उपलब्ध झाले आहेत. आणखी काही उपलब्ध होतील मात्र त्याला काही अवधी लागेल. दिवाळी अंकाचे अर्थकारण जाहिरातीवर अवलंबून असते. आचार संहितेमुळे दिवाली अंक प्रकाशकांना वेळेवर जाहिराती मिळू शकल्या नाहीत. पृष्ठसंख्येच्या तुलनेत जाहिराती कमी असल्याने दिवाळी अंकांच्या किमतीत वाढ झाली आहे.
दिवाळी अंक विकत घेऊन वाचणारी वाचक मंडळी कमी होत चालली आहेत. दिवाळी अंक विकत घेण्यापेक्षा वाचनालयाचे वर्गणीदार होऊन दिवाळी अंक वाचणारी मंडळी भरपूर आहेत. मुळातच वाचक संख्या कमी होत आहे. जे प्रस्थापित साहित्यिक आहेत त्यांची मानधनाची अपेक्षा मोठी असते. चांगले लिहणारांची संख्या घटली आहे. जात, धर्म, समाज, वैयक्तीक समस्या साहित्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे साहित्यिक वर्तुळात बोलले जाते. हलकं फुलक विनोदी साहित्य उपलब्धच होत नसल्याचे दिवाळी अंक प्रकाशकाचे मत आहे.
विविध कारणांनी छापील दिवाळी अंक प्रकाशित करणे जिकिरीचे झाल्याने बहुतांशी दिवाळी अंक यंदा निघणार नाहीत त्यातच भर म्हणून ऑनलाईन दिवाळी अंकांची संख्या वाढली आहे. वाचकांना देखील वेळेचे गणित विचारात घेता ऑनलाईन दिवाळी अंक मोबाईल, लपटॉप, संगणक यावर पाहणे सहज शक्य होते. छापील दिवाळी अंकासाठी कमीतकमी 100 रुपये मोजावे लागतात. त्यातही तो कितपत वाचनीय असेल याची खात्री नसल्याने त्याचे ग्राहक कमीच आहेत. काही दिवाळी अंकांचे मुखपृष्ठ खूप छान असते मात्र आत वाचनीय मजकूर असेलच असे नाही. आशा वेळी काय भुललियासी वरलीया रंगा असे म्हणण्याची वेळ येते.
आज वाचक मर्यादित आहे मात्र तो चोखंदळ आहे. मानधन असेल तर साहित्य ही साहित्यिकांची भूमिका तर विना मानधन तुमचे साहित्य स्वीकारतो ही काही प्रकाशकांची धारणा यामुळे दर्जेदार साहित्य समाजापुढे येत नाही याचा विचार झाला पाहिजे.
प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार
मोबाईल क्र. 9881157709