###अभंग वाणी तुकारामाची
-------------------------------
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
माझें कोण आहे तुजविण देवा ।
मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥
वाट पाहतसें कृपेच्या सागरा ।
गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
साच करीं हरी आपुली ब्रिदावळी ।
कृपेनें सांभाळीं महाराजा ॥२॥
क्षमा करीं सर्व अपराध माझा ।
लडिवाळ मी तुझा पांडुरंगा ॥३॥
साह्य होसी तरी जाती साही वैरी ।
मग सुखें अंतरीं ध्यान तुझें ॥४॥
कृपा करोनि देई दया क्षमा शांती ।
तेणें तुझी भक्ति लाभईंल ॥५॥
माझें हें सामर्थ्य नव्हे नारायणा ।
जरी कांहीं करुणा येइल तुज ॥६॥
तुका म्हणे मज कैसें आपंगा जी ।
आपुलेंसें करा जी पांडुरंगा ॥७॥
?रामकृष्ण हरि?