पुण्यात गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे विधायक पत्रकारिता या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. शारदा पीठमचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी यावेळी पत्रकारितेच्या बाबतीत खूप चांगले विचार मंथन केले. त्यांचे विचार मला खूपच भावले. पत्रकारिता कालची आजची व उद्याची याबाबत माझ्या मनात देखील अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित झाली.
पूर्वीचा एक काळ असा होता की केवळ वृत्तपत्रांवर लोकांना बातमीसाठी अवलंबून रहावे लागत होते. लोक वर्तमानपत्र कधी येते याची वाट पहात असत. त्याकाळात विश्वासार्हता देखील तेवढीच होती. आपण पाठवलेल्या व संस्कारित होऊन आलेल्या बातम्या प्रसिद्ध झाल्याचा एक मानसिक आनंद पत्रकारांना होत असे. दिवसभर बातमीची चर्चा होत असे. आज काळ बदलला. पत्रकारिता बदलली. दैनिके वाढली. प्रिंट माध्यमावर अन्य माध्यमांनी अतिक्रमण केले. स्पर्धा वाढली. वृत्तपत्राचे मालक दैनिकाचे गणित अर्थकारणाशी घालू लागले. त्यामुळे बातमीदार हा शब्द जाऊन जाहिरातदार हा शब्द रूढ झाला. लोकांचे प्रश्न मांडून राज्यकर्त्यांचा रोष ओढवण्यापेक्षा त्यांची स्तुतीसुमने गाऊन जाहिराती मिळविण्यावर आज अधिक भर आहे. शोधक पत्रकारिता तर संपतच चालली आहे. केवळ पाने भरणे हाच उद्योग काही दैनिके करत आहेत. याला काही अपवाद देखील आहेत. त्यांनी आजही पत्रकारितेचे व्रत जपले आहे.
मुळात संस्था त्यांना पाहिजे तशा बातम्या टाईप करून देतात. त्यामुळे एकच बातमी एका शब्दचाही बदल नसलेली वाचकांना बहुतांश ठिकाणी वाचावी लागत आहे. हे चांगल्या पत्रकारितेच्या दृष्टीने घातकच आहे. वृत्तपत्र उघडले की पानभर वाढदिवसाच्या जाहिराती व संबंधित व्यक्तीला पाहिजे तसा खुश करणारा मजकूर आढळतो. सध्या तर म्हणे जाहिरातीचे टार्गेट दिले असल्याची चर्चा आहे. अशा पत्रकाराकडून वास्तव बातम्यांची अपेक्षा तरी कशी करायची?
सांगण्याचा मुद्दा असा की या चर्चासत्रात समाज मनातील अंतर माध्यमानी मिटवावे अशी अपेक्षा वसंतराव गाडगीळ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “ वृत्तपत्रात लिहणारा, चॅनेल च्या माध्यमातून काम करणारा म्हणजेच पत्रकार असे नसून स्वतःकडे असलेली बातमी दुसऱ्याला सांगणे म्हणजे पत्रकारिताच होय. ज्या बातम्यांमुळे समाजाचा घात होतो त्या बातम्या पत्रकारांनी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत. एखादी बातमी वाचून माणूस हिंस्र होणार नाही, त्याचा मनात द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी माध्यमांनी घेतलीच पाहिजे. समाज मनातील दुरावा अंतर वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. “
पत्रकारिता विधायक असावी असा सल्ला नेहमीच दिला जातो. माझ्या मते पत्रकारिता विधायकच असते ती विघातक असूच शकत नाही. समाजात चांगल्या व वाईट आशा दोन्ही प्रवृत्ती असतात. त्यामुळे जागरूकता ठेवून पत्रकारिता केली की ती सकारात्मक पत्रकारिता होत असते. समाज पुढे न्यायचा असेल तर चांगल्या गोष्टी समाजासमोर ठेवल्या पाहिजेत. समाज मनाचा आरसा म्हणजे वृत्तपत्र ही धारणा हवी. समाज सुज्ञ आहे. छापून आलेली बातमी व प्रत्यक्ष ती व्यक्ती कशी आहे याची तो मनाशी तुलना करत असतो. त्यामुळे वास्तवतेचे भान ठेवणे आवश्यक ठरते. राजकारणी मंडळी तर आपला नेहमीच वापर करून घेत असतात. जाहिरातीच्या तालावर आपणास पाहिजे तसे नाचवत असतात. या क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर आपणास त्याची प्रचिती येते.
सद्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत काहीही करायला माणसे मागेपुढे पहात नाहीत. वृत्तपत्रांना वेगवेगळ्या स्कीम का टाकाव्या लागतात?. वाचकांना सवलतीच्या दरात वर्षभर बांधून का घ्यावे लागते? कूपन योजना का करावी लागते? या साऱ्यांचे उत्तर आपल्यावर वाचकांची विश्वासार्हता राहिली नाही हेच माझे मत आहे. काही ठिकाणी स्थानिक वृत्तपत्रे वॉट्सअप्प, फेसबुकवर आलेलाच मजकूर दैनिकात देतात. हा मजकूर मोफत वाचायला मिळत असताना वाचक पैसे देऊन अंक विकत कशासाठी घेतील? याचा गांभीर्याने आज विचार करण्याची वेळ आली आहे.वर्तमानपत्रातुन दर्जेदार वास्तव लेखन वाचावयास मिळावे ही वाचकांची अपेक्षा असते.