कविता..
पाठ आणि डोळे
पाठीला डोळे असणे..
विषय आला जेव्हा समोर
माझ्याच शरीराचे हे दोन भाग
दोघेही हक्का बक्का झाले
पाठ म्हणाली त्वेषाने
इतके दिवस तुला नको असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत
तु माझी ढाल केलीस
आणि स्वतःचा बचाव करून घेतलास
आता तुझ्या सोयीसाठी
तू मला डोळे लावणार आणि नाही नाही ते पहायला लावणार
हे कदापि शक्य नाही
तुझ्या या प्रस्तावा कडे मी पाठ फिरवते..
इकडे डोळ्यांची नापसंती सुद्धा कमी नव्हती
पटकन स्वतःला मोठे करून आणि गरागरा फिरवुन
थेट अगदी तीनशे साठ अंशात फिरवून त्यांनी आपली नाराजी दाखवली
आणि म्हणाले
जेव्हा नको असेल तेव्हा मला बंद करून तू स्वतःला वाईट गोष्टी पासून वाचवू पाहतेस
प्रत्येक वेळेस अगदी तुझ्या मना प्रमाणे वागत आलोय आम्ही
आणि आता तू आम्हाला कुठेही चिकटवायला निघालीस
हे कदापि शक्य नाही
असे म्हणून डोळ्यांनी घट्ट मिटून स्वतःला आक्रसून घेतले
आता या दोघांनी असहकार पुकारला म्हणल्यावर मी तरी बापडी काय करणार
मी तर डोळे बंद करून
या विषयाकडेच पाठच फिरवली
वृषाली