प्रिय सर्वांचा आवडता आंबा,
फळांचा राजा म्हणजे आंबा. आंबा म्हटले आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वानाच आवडते फळ आहे. आंब्याला मोहोर आल्यापासून ते पिवळा धम्मक आंबा दृष्टीस पडेपर्यंत सर्वांची नजर त्या आंब्याकडे लागलेली असते. पूर्वीच्या काळी प्रत्येकांच्या शेतात एक तरी आंब्याचे झाड असायचे त्यामुळे मुबलक प्रमाणात आंबे खाण्यास मिळत असत. पण आज शेतातील वृक्ष तोडण्यात आली त्यामुळे आंब्याची झाडं देखील कमी झाली. आंब्याच्या झाडांच्या समुहाला आमराई असा उल्लेख केला जातो. तशी प्रत्येक गावात एक आमराई नक्की असायची पण तेही आज नामशेष झाले आहे. आजच्या काळात लोकं आंब्याला व्यावसायिक स्वरूप आणून शेतात आंब्याच्या झाडांची कलम करून शेती करत आहेत. गावरान आंबा बाजूला होऊन आज वेगवेगळ्या नावाची आंबे बाजारात येत आहेत. आंब्याच्या झाडाला दगड मारून कच्या कैरी पाडण्याचे दिवस आज संपले आहेत. आज आंबा विकत घेतल्याशिवाय मिळत नाही. आंब्याचा मोसम सुरू झाला की प्रत्येकांच्या घरात रसाळीचा कार्यक्रम सुरू होतो. पहिली रसाळी जावयाला खाऊ घालण्याची प्रथा आज ही कायम आहे. खास करून मुलगी आणि जावयाला रसाळी कार्यक्रमाला आमंत्रित केले जाते आणि त्याचा मनमुराद आनंद लुटला जातो. पुरणपोळी आणि आंब्याचा रस याच्या जेवणाचा स्वाद काही वेगळाच असतो. आंबे चोखून खाण्यात जी मजा येते ते आंब्याचे रस पिण्यात कधीच येत नाही. आम्ही लहानपणी रस कमी खायचो पण हक्काने आमच्या हिस्स्यातला आंबा खाणे सोडले नाही. आंब्याचे कैरी व त्यापासून तयार करण्यात येणारे लोणचं हे एक आवडते खाद्य आहे. जेवतांना तोंडी लावण्यासाठी आंब्याचे लोणचे असेल तर जेवण रुचकर वाटते. आज ही काहीजण भाजी नसले तरी लोणच्यासोबत भाकर खाताना दिसून येतात. मात्र त्यासाठी आंब्याच्या सिझनमध्येच लोणचं टाकावे लागते. मृग नक्षत्रानंतर टाकलेलं लोणचं दीर्घकाळ टिकते असे म्हणतात. कैऱ्याचं पन्ह हे सुद्धा शरीरासाठी खूपच लाभदायक ठरते. त्याचसोबत आंब्याच्या झाडाच्या सावलीत आल्हाददायी वाटते. सध्या आंब्याचे हापूस आंबा, केसरी आंबा, असे अनेक प्रकारच्या जातीचे आंबे प्रसिद्ध आहेत. माणसाच्या जीवनात आंबा हा बहुगुणी फळ आहे म्हणून या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे.
- नासा येवतीकर, धर्माबाद