Marathi Quote in Thought by Na Sa Yeotikar

Thought quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

कोरोना आणि शैक्षणिक आव्हान

कोरोना विषाणूने जगभर जसा धुमाकूळ घातला तसा भारतात देखील त्याने मार्च महिन्यापासून सर्वाना त्रस्त केले आहे. असे कोणतेही क्षेत्र शिल्लक नाही जेथे कोरोना विषाणूचा परिणाम जाणवला नाही. अनेकांचे रोजगार बुडाले, कित्येक उद्योगधंदे डबघाईला आले, कित्येकजण स्थलांतर झाले तर काहीजण आपल्या जीवाला देखील मुकले. या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जनता कर्फ्यु लागू करून लॉकडाऊनला सुरुवात केली.त्याचा परिणाम शैक्षणिक बाबीवर देखील झाला.शाळा, विद्यालय आणि महाविद्यालये ताबडतोब बंद करण्यात आले. खाजगी ट्युशन क्लास देखील बंद करण्यात आले. दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याची प्रक्रिया यावर्षी पहिल्यांदा करावी लागली. परिक्षेशिवाय विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता कळत नाही, त्यांना त्यांचे कौशल्य कळत नाही. आपण किती पाण्यात आहोत हे पाहण्याची कसोटी म्हणजे परीक्षा असते. पण यावर्षी परीक्षा न घेता वर्षभरातील कामावर त्यांचे गुणांकन करावे लागले. जून महिन्यापर्यंत हे संकट टळेल आणि नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात तरी होईल असे वाटत असतांना कोरोनाने अजून घट्ट पाय रोवून बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका प्रवक्त्याने तर कोरोना सोबत जगायला शिकलं पाहिजे असे वक्तव्य केले आहे, जे की खरे वाटत आहे. आज मूळात खरी समस्या निर्माण झाली ती म्हणजे हे शैक्षणिक वर्ष कसे असेल ? शाळकरी मुलांचे वय सहा ते सोळा वयाचे असते. कोरोनाच्या भीतीमुळे आजपर्यंत आपण या मुलांना घराबाहेर जाऊ दिले नाही. पण शाळा सुरू झाल्यावर आपल्या मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही असा यक्ष प्रश्न आज पालकांसमोर उभे राहिले आहे. शाळेत कश्याप्रकारची काळजी घेतल्या जाईल ? विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था कशी असेल ? विद्यार्थी शाळेत ये-जा कसे करतील ? त्यांचा शाळेत कुणाकुणाशी संपर्क येऊ शकतो ? असे एक नाही कित्येक प्रश्न आज पालकांच्या डोक्यात चालू आहेत. ज्याची उत्तरे सध्या तरी कोणीही देऊ शकणार नाही. काही देशात तर शाळेला वर्षभर सुट्टी दिल्याची बातमी देखील वाचण्यात आली. शिक्षण महत्वाचे की जीव या कोंडीत सध्या सर्वजण पडले आहेत. पालकांची स्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. ज्या पालकांची मुले दहावी आणि बारावीच्या वर्गात आहेत त्यांना फार काळजी लागली आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असेल ? असा प्रश्न त्यांच्या मनात कायम आहे. श्रीमंत आणि मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांना ऑनलाईन पद्धतीने काही अभ्यास उपलब्ध करून देऊ शकतील पण गरिब पालकांच्या विद्यार्थ्यांचे काय ? त्यांना कसे शिक्षण देता येईल ? शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्षात जी आंतरक्रिया होते ते ऑनलाईन पद्धतीने होऊ शकत नाही. कमीतकमी दिवसातून एखादा तास तरी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्षात संवाद होणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शाळेत विद्यार्थी संख्या भरपूर आहे तेथे दोन सत्रात शाळा भरविणे आवश्यक आहे. लहान वर्गांना सकाळच्या सत्रात आणि मोठ्या वर्गांना दुपारच्या सत्रात शाळा भरविण्याचे नियोजन फायदेशीर ठरू शकते. खाजगी ट्युशनसाठी देखील विद्यार्थी प्रवेश मर्यादित करून त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. आजकाल पालक शाळेपेक्षा खाजगी ट्युशनवर जास्त विश्वास दाखवितात, त्यामुळे मोठ्या शहरात ही स्थळे जास्त धोकादायक बनू शकतात असे पालकांना वाटते. यावर्षी परीक्षेच्या पद्धतीमध्ये ही बदल करणे अत्यावश्यक आहे. शिक्षकांशिवाय मुलांना विषयांचे अध्ययन अनुभव मिळणे अवघड आहे. ऑनलाइनचा कितीही बोलबाला असेल तरी ती पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी शाळाप्रमुख, शिक्षक आणि पालकांनी घेतली तर शैक्षणिक वर्षातील ह्या कठीण आव्हानावर मात करणे शक्य आहे, असे वाटते

- नागोराव सा. येवतीकर

Marathi Thought by Na Sa Yeotikar : 111458592
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now