मुलांनी स्वावलंबी व्हावे
प्रत्येक व्यक्तीने सर्वच कामे करायला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे. घरात झाडू मारणे, भांडे घासणे, कपडे धुणे, भाजी निवडणे, दळण आणणे, स्वयंपाक करणे ही कामे आई किंवा बहिणीनेच करावीत असा काही लिखित नियम नाही. ही कामे मुलांनी स्वतःहुन केलीच पाहिजेत याकडे पालकांनी लक्ष द्यावे. तरच भविष्यात जेंव्हा शिक्षणासाठी घर सोडून बाहेरगावी राहण्याचा प्रसंग येतो त्यावेळी केलेल्या या कामाचा अनुभव त्यांना कामाला येतो. बाजारातून भाजीपाला खरेदी करणे, किराणा सामान आणणे, कपडे इस्त्री करून आणणे, वृत्तपत्र आणणे इत्यादी घराबाहेर करावयाची कामे वडील किंवा भावंडांची कामे मुलींना वेळ मिळेल तशी आवर्जून करायाला लावणे सुद्धा गरजेचे आहे. ही कामे मुलांची आणि ती मुलींची असे कामाचे वर्गीकरण विशेष करून पालकांनी करू नये. सकाळी झोपेतून उठल्यावर आई सांगण्याच्या अगोदर अंथरूण, पांघरूण घडी करून व्यवस्थित ठेवणे, जेवायला बसताना निदान स्वतःपुरते तरी ताट, वाटी आणि पाण्याने भरलेला ग्लास घेणे, जेवण संपल्यावर ताट नियोजित धुण्याच्या ठिकाणी ठेवणे, आपली पुस्तके, वह्या, पेन, दप्तर इत्यादी सर्व व्यवस्थित ठेवून घेणे यासारख्या लहानसहान कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपली कामे आपणच करायची सवय मुलांना लहानपणापासून लावणे अत्यावश्यक आहे. अशी सवय लावली नाही तर काय होते. एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर मुलांची पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल तेंव्हा मुले सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतात. त्यामुळे मुलांवर तसा प्रसंग ओढावू नये म्हणून काम करायला शिकवावे लागेल. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी पंचाईत मुलींच्या बाबतीत सुध्दा घडते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जर आपापल्या कामाची विभागणी करून घेतली तर असे प्रसंग निर्माण होऊ शकतो. त्यास्तव कामाची विभागणी न करता, मुलगा-मुलगी असा भेद न करता अगदी लहानपणापासून घरातील कामे मुलांना पालकांनी सांगायला हवी, तरच ते स्वावलंबी जीवन जगू शकतात. यासाठी उदाहरण म्हणून परमपूज्य साने गुरुजी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जीवनचरित्र मुलांना सांगितले तर आपली कामे आपण का करावीत याचे महत्व त्यांना कळते. समर्थ रामदास स्वामी यांनी तर जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला असा उपदेश दिला आहे. त्यामुळे आज नाही, आतापासूनच मुलांना आपली कामे आपण करायला सुरुवात करण्यासाठी प्रेरित करावे.
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, जि. नांदेड
9423625769