व्यसनापायी धनी माझं कपाळ उजाळ करून गेला,
जाता जाता पदरी लेकरू टाकून अडकवून गेला,
म्हणून..,लेकराला छातीला लावून दिस काढत होते.
मोकळ्या आभाळाखाली राहुटी बांधत होते,
तीन दगडाच्या चुल्यावरी उरलेला संसार थाटत होते,
आण..,, लेकराला छातीला लावून दिस काढत होते.
जग बदलले जुनी माणसं पण बदलले गेले,
आधुनिकतेच्या नावाखाली हातचे काम गेले,
तरी.., लेकराला छातीला लावून दिस काढत होते.
पोटापाण्यासाठी पायपीट करून गाव बदलत होते,
रातची चूल पेटण्यासाठी दिवसा दगड फोडत होते,
आण.., लेकराला छातीला लावून दिस काढत होते.
पोटासाठी दिवसा बैलासारखी कामाला जुंपायची,
लेकराच्या दुधासाठी रातचं म्या गाय बनायची,
तरी.., लेकराला छातीला लावून दिस काढत होते.
तिशी दिस अंग म्या माझं उल्स-उल्स खोडत होते,
लेकराला वाढविण्यासाठी म्या एकलीच झिजत होते,
आण..,लेकराला छातीला लावून दिस काढत होते.
रातच्या अंधाराची सवय तर झालीच होती,
लेकराला अंगाई म्हणल्याशिवाय झोप येत नव्हती,
म्हणून..,लेकराला छातीला लावून दिस काढत होते.
रोज रातीला धनीच्या आठवणीत म्या रडत होते,
उघड्या कपाळी लेकराचा हात लगताच निजत होते,
आण.. लेकराला छातीला लावून दिस काढत होते.
....अविनाश लष्करे