नितळशार पाणी
काळ्या पत्थरावर आदळते
त्याच्याही नकळत
"जलपुष्प" उमलवते!
रोरावणारा वारा
दगडांवर आदळतो
पाव्याला फुंकर घातल्यासारखा
त्याची लकेर गुणगुणतो!
आकाशात पुंजके
विखुरलेले दिसतात
डहुळत्या पाण्यावर
नावा हेलकावत राहतात!
समोर उभे दीपगृह
याचे साक्षीदार असते
भरकटलेल्या मनांना
नवी दिशा दाखवते!
समोर ठाकलेला दुर्ग
शतकांचा पहारेकरी असतो
इतिहासाची पाने
वर्तमानात उलगडत जगतो!
मी या सगळ्याचा
एक भाग होऊन जाते
आकाश पाणी भूमी
यांच्याशी समरस होते!
भोवतीचा गलका
क्षणार्धात विरतो
माझी आणि पांचभौतिकाची
नाळ जोडून दाखवतो!