भिजली होती झाडं
भिजल्या होत्या वेली
रात्रही भिजली चिंब
आणि झाली काजळ ओली!!
अंगावरचा शालू
तोही होता काळा
होती त्याच्या पदरावर
पाऊसखडी विणलेली!
रात्र झाली काजळ ओली!!
चंद्र भाळीच्या तिचा
झाला होता फिका
पण गाली मात्र श्रावण सरींची
बट थेंबांची रुळली !
रात्र झाली काजळ ओली!!
पंचमीचा सण दारात ठाकला
रातीने तळव्याला मेंदी रेखली माखली
पहिल्या किरणात नक्षी केशरी रंगली
रात्र झाली काजळ ओली!
आर्या