मी अनुभवली तुझी चिरनिद्रा
सर्वच दुःखमय असं जगाला सांगत तू निघून गेलास सुखाच्या वाटेने अज्ञाताच्या प्रवासाला.... आणि झालास बद्धातून मुक्त.... बुद्ध.....
मी पाहिलं तुला कधी हातात अबोध मुकी कलिका घेऊन
तर कधी तू घेतलंस हातात कठोर वज्र
कधी पाहिला मी तुझा जन्म कुशीतून होताना
काळ्याभिन्न खडकात छिन्नी हातोड्यांच्या घावांनी साकारलं तुझं भूतलावरचं अस्तित्व
कधी तू झालास इतका मोठा की तुझ्या अर्धांगिनीच्या दोन डोळ्यातही सामावू शकला नाहीस तू!! ती मात्र तुझी वाट पाहत उभी निष्पाप लेकरासह!!!
अनुभवला तुझा उपदेश मी मृगशावक होऊन
तुझं धर्मचक्र फिरत आहेच अजून
पण या सगळ्यापेक्षा तू मला सापडतोस त्या पौर्णिमेच्या पूर्णचंद्रात... जिच्यामधे सामावलं आहे तुझ्या अतर्क्य जन्माचं गुपित...