व्यथा दुष्काळग्रस्ताची
उन्हाचा पारा जसा जसा चढतो
अंगाची लाही तशी तशी होते
जमिनीला पडलेल्या भेगा बघून
काळजाचे चक्क पाणी पाणी होते ।।
गोठ्यातली जनावर घेऊन जाताना
चारा छावणीत नेऊन सोडताना
गड्यानो आन घेऊन खरंच सांगतो
डोळ्यातून आसवांच्या धारा येतात ।।
तापलेल्या जमिनीवर पाय ठेवताना
शरीरातल सार त्राणच संपून जात
भेगाळलेल्या त्या भूमीला बघताच
असह्य वेदनांनी मन भरून येत ।।
पाण्याच्या प्रत्येक थेंबा थेंबासाठी
विहिरीत जीव धोक्यात घालणाऱ्या
आया बहिणीकड पाहवत देखील नाही
मात्र निसर्गाच्या पुढे काही चालत नाही ।।
दुष्काळग्रस्तांची आवस्था नीट पहा जरा
निसर्ग पण किती अन का क्रूर बनत आहे
कधी डोळ्यातून आसव काढायला लावतो
तर कधी पाण्यात आसव मिसळायला लावतो ।।
उन्हाळ्यात पाण्यासाठी दूरवर असते भटकंती
पावसाळ्यात मात्र चहूकडे पाणीच पाणी
मला सांगा कधी बदलणार हे विदारक चित्र
पुढच्या पिढीच गुलदस्त्यात आहे भविष्य ।।
प्रदीप जोशी विटा
@