Marathi Quote in Good Evening by Aaryaa Joshi

Good Evening quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

ऐरणीच्या देवा..
दर सहा महिन्यातून एकदा गावात येणारा लोहार.त्याचा कुटुंब कबिला छोट्या टेंपोत मावलेला.
चार गाडगी मडकी, लोहारकामाचं यंत्र आणि अन्य साहित्य,चार अंधरुणं पांघरुणं, एका पिशवीत धान्यधुन्य आणि सोबत दोन कच्चीबच्ची,एखादी लोखंडी खुर्ची.
तिठ्याच्या कोपर्‍यावर त्याने एका रात्री आपला विंचवाचा संसार मांडला महिनाभरासाठी.
त्याची गोंडस मुलं जातायेता रस्त्यातून अच्छा करतात.
मला त्याच्या बायकोचं राहून राहून कौतुक वाटे.
भल्या पहाटे सर्वांच्या आधी उठून तिचे प्रातर्विधी आणि अंघोळ उरकलेली असे. कडाक्याच्या थंडीत गाव गोधडीत घोरत असताना ती मात्र उठत असे.भर रस्त्यावर मांडलेला तिचा संसार... पण ती सरावलेली... तिच्यानंतर मग हळूहळू गाव जागं होई.
जरा नवाच्या सुमारास लोहाराचं यंत्र सुरु होई. गाव हळूहळू त्याच्या तात्पुरत्या झाकलेल्या घराला नसलेल्या दारी जमा होऊ लागे.
अॅल्युमिनीअमच्या पातेल्यात भात भाजी रटरटू लागे. पितळी परातीवजा ताटात भाकरीचा चंद्र गोल फिरू लागे.
त्याच्या मुलांना मात्र अजून वास्तवाचं भान नव्हतं.खेळाबागडायचं निरागस वय.हातात काहीतरी चघळत उन्हातान्हाची इकडेतिकडे भटकत.समोर मिळेल त्या वस्तूचा खेळ म्हणून उपयोग करत.त्यातच त्यांचा मोठा आनंद सामावलेला असे.
काही सामानसुमान मीठ मिरची हवी असेल तर लोहाराचा भाऊ दुकानात दिसे.अधूनमधून तोही काम करताना दिसे.त्यावेळी मोठा भाऊ लोखंडी खुर्चीत विश्रांती घेई.
सणावाराच्या दिवशीही गावात पुरणाची पोळी तव्यावर पडे... लोहारणीच्या तीन दगडांच्या चुलीवर काय रटरटत असेल त्याची उत्सुकता लागून राही.
खाऊन पिऊन सुखी असतानाही कशाची ना कशाचीतरी कमतरता वाटत कुढत राहणार्‍या मनाला त्या लोहारणीची नेहमी आठवण येत राही.
दीडेक महिन्याने एकदिवस अचानक तिठ्याचा कोपरा सुना दिसला... पण माझ्यासाठी तो भरला होता...
आहे त्या परिस्थितीतही वास्तवाचं भान घेऊन जगणार्‍या त्या कुटुंबाच्या आठवणीने.

Marathi Good Evening by Aaryaa Joshi : 111075192
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now