नसतं एखाद्या नात्याला नाव
म्हणून खोटे असतात का मनातले भाव?
गुपित उलगडावं तसं नातं उमलत जातं
हळुवार मखमलीच्या लड्या गुंफीत जातं
मनातलं मनाला समजायला लागतं
मनतळ्याकाठी प्राजक्ताचं झाड सडा घालायला लागतं
प्राजक्ताच्या सुवासात मनही घमघमतं
झाडंही आता नाचू डोलू लागतं
नातं तुझं माझं प्राजक्ताचं फूल
रात्रीच उमलतं पण पहाटेला घालतं भूल
त्या पहाटेला भात गातो भूपाळी
प्राजक्ताच्या अबोलतेची शांत हळुवार कथुली!