तुमचा ससा कोणता??
आजचं युग म्हणजे धावपळीचं जीवन, यंत्रवत चालणारी माणसे आणि त्यांच्यापेक्षा हि वेगाने धावणाऱ्या त्यांच्या गरजा आणि निर्णय...
आजची परिस्थिती अशी आहे कि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पदासाठी एका व्यक्तीला कमीत कमी २० स्पर्धक आहेत. प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचं आहे, स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं आहे. पण यश मात्र सगळ्यांना मिळत अस नाही. आणि सगळेच अपयशी ठरतात असंही नाही.
खरं तर यश आणि अपयश या दोहोंमध्ये फरक आहे तर तो म्हणजे एकाग्रतेचा जी व्यक्ती आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करते ती कधीच अपयशी ठरतं नाही.
महाभारतातील द्रोणाचार्य आणि अर्जुनाचे उदाहरण तर सर्वानाच माहित आहे. अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्विर बनण्यामागे त्याची एकाग्रता महत्वाची होती. खरं तर प्रत्येकाला संधी मिळते आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्याची, आणि कधी ती मिळाली नाही तर स्वतः ती संधी निर्माण करता आली पाहिजे. अर्जुना ला संधी मिळाली होती आणि एकलव्य नी ती संधी स्वतः निर्माण केली होती. म्हणून कधीच परिस्थिती ला दोष देऊ नका.
माणसाचा हा स्वभावदोष आहे कि माणूस हा अपयशाला तेवढं घाबरत नाही जेवढं तो यासाठी घाबरतो कि अपयशाचा खापर फोडायला काही कारण मिळालं नाही तर???कटू असलं तरी हे खरं आहे.म्हणून कारण शोधण्यात कधीच वेळ दडवू नका. आहे त्या वेळेचं सोनं करा. आणि त्यासाठी आपल्या ध्येयावर एकचित्त रहा.
तुमचं ध्येय लहान आहे कि मोठं हे याचा फरक पडत नाही तर तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतःला किती समर्पित करता ते जास्त महत्वाचं आहे. स्वप्न सर्व च बघतात,पण झोपेत बघतो ते स्वप्नं नसतातच मुळी, जी स्वप्ने आपली झोप उडवतात, आणि ती पूर्ण करण्यासाठी मनाला प्रेरणा देतात ती स्वप्नं असतात आणि अशी स्वप्ने त्याच व्यक्ती ला पडतात जी त्यांच्या ध्येयाशी एकरूप असतात.
जर तुमच्यासमोर ९ ससे पळत असतील आणि त्यातला तुम्हाला १ पकडायचा असेल तर त्यातल्या एकावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही सगळ्यांना पकडण्याचा प्रयत्न केलात तर त्यातला एकही न मिळण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही ज्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असाल तो जर फारच पळपुटा असेल तर त्याला पकडण्याची तुमची युक्ती किंवा तंत्र बदला, पण तो ससा बदलू नका, त्यालाच चिकटून रहा.
तुमच्यासमोर अनेक संधी येतील पण सगळ्याच संधी साधनं तुम्हाला शक्य होणार नाही, एक ससा पकडा, त्याला स्वतःच्या खिशात कैद करा आणि मगच दुसऱ्या सशाच्या मागे जा.
यशाचा हाच मार्ग आहे.