The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
काय आहे मृत्यू? एक कटू सत्य.सर्वपरिचित पण तरीही तेवढच भयानक.मनुष्य जन्म घेऊन या भूतलावावर येतो आणि मृत्यू हा त्या जीवनाचा शेवट ,वर्षानुवर्षे चालत आलेलं हे निसर्गाचं चक्र .वैद्यानिक दृष्ट्या साधं आणि सरळ. पण खरंच मृत्यू एवढा साधा असतो? एखाद्याच्या जन्माने सगळीकडे आनंद पसरतो,शरीरातील नसानसात रोमांच संचारतो. कारण तिथे एक नवं आयुष्य सुरु होणार असत. एक जीव लहानाचा मोठा होतो.बोबडं बोलून ,धडपडत चालायला शिकत.हे सगळं फक्त त्या जीवाशी मर्यादित नसत.तर त्या लहानच मोठं होण्याऱ्या जिवाबरोबर त्याच्या भोवतालचे लोकही ते सगळं जगत असतात.त्याच्या लहानपणात तेही लहान होतात आणि पन्नशीच्या वयातही पाच वर्षाचा असल्याचा अनुभव घेतात.पण मृत्यू या सगळ्याच्या विपरीत आहे. धड्पडलेलं लेकरू उठून पुन्हा उभं राहत पण मृत्यूनंतर माणसाची सावलीही राहत नाही.जस एका जन्माने त्याच्या भोवतालच्या आवडत्या व्यक्तींचा जन्म होतो तसेच एका मृत्यू ने त्याच्या आसपासच्या लोकांच्या भावनांचा हि मृत्यू होतो. पण शेवटी जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.जो जन्मला तो मरणारच.पण या दोहोंमधील जे अंतर आहे ते आयुष्य आहे.जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपल्याकडे काहीच नसत.ना शब्द ना ओळख,पण जगण्याची इच्छा आपल्याला सगळं काही देत नाव,यश आनंद, नाते आणि त्याचबरोर दुःख,अपयश सुद्धा. अनेक प्रयत्नांनंतर जेव्हा अपयश येत तेव्हा आपल्याला मृत्यू सोपा वाटतो.अनेक दुःखांना जेव्हा समोर जावं लागत तेव्हा आपल्याला मृत्यू सोपा वाटतो.हि माणसाची मानसिकताच आहे.पण आयुष्यच गणित समजलं तर फार सोपं आहे.फक्त आयुष्यात काय मिळवायचं आणि काय वजा करायचं ते मात्र कळायला हवं .एखाद्या गोष्टीसाठी शंभर वेळा प्रयत्न करूनही ती मिळत नसेल तर थांबायचं नाही कारण कदाचित एकशे एक वेळानंतर ती मिळणार असेल! दुःख मिळालं म्हणून आपण श्वास घ्यायचं थांबत नाही तर मग प्रयत्न तरी का थांबवायचे.जीवनात कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर ती मिळवण्याच्या ध्यास स्वतः मध्ये असला पाहिजे.कावळ्यांनी किती हि ठरवलं तरी तो गरुडझेप घेऊ शकत नाही कारण आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द गरुडाला मुळातच असते. म्हणून कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर आधी स्वतः मध्ये तशी इच्छा जागृत व्हायला हवी.कारण आपण अंड्याला बाहेरून कितीतरी फूट म्हटलं तर ते फक्त फुटेल. पण जर ते अंड स्वतः फुटलं तर त्यातून एक जीव बाहेर येतो हे आहे आयुष्यच गणित .जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे तोपर्यंत तुमचे प्रयत्न चालू असायला हवे.जर प्रयत्न थांबले तर तो जिवंतपणी आलेला मृत्यू आहे. ज्या लोकांमध्ये आपण वावरतो,पूर्ण आयुष्य घालवतो ते लोक मेल्यानंतर स्मशानात घेऊन जातात आणि ते प्रेत जाळतात.त्या जळणाऱ्या ज्वाला प्रेतावर आपलं अधिराज्य गाजवतात .आणि कवटी फुटली कि सारे नातेवाईक परत फिरतात.ज्या शरीराला आयुष्यभर आपण एवढं जपतो शेवटी ते राख होत आणि मागे उरत ते फक्त आपलं नाव.म्हणून जगताना असच जगा कि मृत्यूनंतर हि तुमचं नाव जिवंत राहायला हवं.सतत प्रयत्न करा स्वतःला एवढं मोठं बनवा कि मृत्यू हि तुम्हाला मारू शकणार नाही.आणि स्वतःला मोठं बनवताना नैतिकता जपा.कारण व्यक्ती तीच मोठी असते जिला भेटल्यानंतर कुणी स्वतःला लहान समजणार नाही. मृत्यू हे पृथ्वीवरच एक अपरिहार्य सत्य आहे.आपण मेहनत करतो कारण त्याच्या शेवटी यश असत,आपण यशावर प्रेम करतो म्हणजेच शेवटावर प्रेम करतो.त्यांच्याप्रमाणे जस जीवनावर प्रेम करतो तसेच मृत्यू वरही करा म्हणजे आयुष्य आणखी सुंदर बनेल.आणि मृत्यू नंतर तुमचं केवळ नाव न राहता एक आठवण म्हणून नेहमी जिवंत राहील.
प्रत्येक माणसाला दोन मने असतात. आपलं अर्धसुप्त मन सकारात्मक आणि नकारात्मक भावनांमधून निवड करत नसत तर ते सखोल आणि उथळ भावनांमधून निवड करीत असत. बहुतेक लोक नकारात्मक भांवनांमध्ये नकळत गढून जातात. कारण सकारात्मक विचारपेक्षा नकारात्मक विचार आपले लक्ष वेधून घेतात. किंबहुना लहान असल्यापासून आपल्याला तेच आढळतं. आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा आपल्या विचारांवर सरळ परिणाम होत असतो. लहान मूल घरात आनंदाने खेळत असत, आणि बाकीचे सारे आपल्या कामात व्यस्त असतात. त्यावेळी त्या मुलाच्या खेळण्याकडे कुणाचं लक्ष जात नाही ,पण जर खेळता खेळता त्या मुलाला काही लागलं, दुखापत झाली तर ते मूल रडायला सुरवात करतं , त्याचवेळी सगळे त्याच्याकडे धाव घेतात " काय झालं?" म्हणून. म्हणजे आपल्या नकळत आपल्या त्या मुलाच्या अर्धसुप्त मनावर हे बिंबवत असतो कि त्याच रडणं त्याच्या आनंदापेक्षा जास्त लक्ष वेधून घेत, परिणामी काही काळानंतर आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ते मूल कोणत्या न कोणत्या प्रकारे रडू लागत, हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी आकांडतांडव करत. आता त्याच अस वागणं इतरांना जरी विचित्र वाटत असलं तरी त्याला ते बरोबर च वाटतं. कारण त्याच्या अंतर्मनावर नकळत हेच कोरल्या गेलं कि लक्ष वेधून घ्यायचं.. आणि त्यानुसार त्याला जे योग्य वाटलं ते तो करत गेला. म्हणून एखादी गोष्ट घडून गेली असेल तर त्यावर जास्त विचार करू नका. त्या गोष्टी चा नकारात्मक पगडा तुमच्या सुप्त मनावर होऊ देऊ नका. अपयशातून जे शिकून घाययच ते शिकवण घ्या आणि विसरून जा. तुमचं छोटं छोटा यश साजर करा. त्या सुखमध्ये तल्लीन होऊन जा.एवढं कि नकारात्मक विचार तुमच्या मनातही यायला नको. पण हे करायचं कस??? यावर उत्तर म्हणजे नकारात्मक गोष्ट असेल तर त्यावर फार तर फार 2 वाक्य बोला, आणि सकारात्मक असेल तर त्यावर 10 वाक्य बोला, तुमच्या मनाला कळू द्या तुमचा सर्वोतोपरी कल हा सकारात्मक ते कडेच आहे. नकारात्मकते साठी अगदी कंजूष बना, मोजून मापून शब्द वापरा, पण सकारात्मक विचारांना मिठी मारून आलिंगन द्या, त्यांना बहरू द्या, हेच परिवर्तन आहे. कोणीतरी म्हटलं आहे, दुःखी मन सर्वात सुंदर काव्य करत, मग या अनुषंगाने देवाने जेव्हा हि सुंदर पृथ्वी निर्माण केली तेव्हा तो खूप दुःखी असला पाहिजे. पण जो हे बोलला त्याअर्थी तो ईश्वराला समजलाच नाही. प्रसन्नतेचा तळ गाठा, तुम्हाला कुठल्या काव्याची कवितेची गरजच भासणार नाही, तुमच्यातून च काव्य बाहेर येईल..... तुमचं जीवनच काव्य बनून जाईल.....
मनकवळा एक असं स्वप्न...मणी बिंबलेलं.. एक असं नातं..हृदयात कोरलेलं.. एक असा साथी..जो असेल हळवा.. मिळेल का असा मला...माझा 'मनकवळा'? होईल जरा धाकधूक..ह्रद्यातलं गुपित ओठांवर खुलताना नकळत देईल का तो साथ माझ्या त्या शब्दांना ? दबा धरून बसलेल्या माझ्या अश्रूंना ... तोडेल का तो बांध माझ्या दुःखांचा? विलक्षण सोनेरी क्षणांचा सडा... उधळेल का माझ्यावर..माझा मनकवळा? लागते ठेच,रक्ताळतो पाय . पण पायातून वाहणाऱ्या लाल अग्नीपेक्षा दाह असतो एकटेपणाचा.. संगीतातले सूरही नाहीत आणि इंद्रधनूतले रंगही.. क्षणिक मिळणाऱ्या सुखावरहीची पडलाय पडदा .. घेऊन चैतन्याची पहाट..गवसेल का मला माझा मनकवळा? लढून साऱ्या जगताशी ..घेऊन हातात हाती .. शब्दांविना जुळलेली नाती..प्रेमाच्या उभारून चार भिंती.. सप्तजन्माची शाश्वती .फक्त मी अन माझा सांगाती..... घेरून आहे तारुण्याच्या कडा... कधी भेटेल मला माझा मनकवळा? ,
आठवण तुला बघून काळ लोटला होतंय अधीर माझं मन आठवते तुझी डोळ्यांत साठवलेली मूर्ती पण खरं सांगू? या आठवणींना हि येते रे तुझी आठवण पुन्हा देऊया उजाळा त्या सोनेरी क्षणांना झुगारून सारे बंध जगूया स्वप्नांच्या कथा पण नशीब खेळ खेळतोय मी समजू शकते तुझ्याही व्यथा होईल भेट,,, उजळून येतील आठवणी वाट बघते त्या क्षणाची असेल समोर तुझी मूर्ती आणि बहरून येईल आपली प्रीती
औपचारिकते चा मुखवटा आजच युग म्हणजे स्पर्धेचं युग.यशाच्या मागे धावताना या युगात अनेक गोष्टी कालबाह्य होत आहेत.प्रत्येकाला या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहायचं आहे आणि त्यासाठी स्वतः ला सिद्ध करताना माणूस हा माणूस न राहता एक यंत्रमानव झाला आहे.त्यामुळे साहजिकच माणसातली मानसिकता हि बदलली आहे,पण समाजात वावरतांना केवळ पैसा किंवा पद असून चालत नाही,सोबत असावी लागते ती 'नैतिकता'.पण या स्मार्ट युगात जून जाऊन सगळंच नवीन आलंय,'पत्र' जाऊन मोबाईल आले,मग मेल ,skype इत्यादी .अगदी सगळं काही स्मार्ट झालंय. आणि याचाच परिणाम म्हणजे नैतिकतेचा स्मार्ट रूप 'औपचारिकता'. आपल्या संस्कृतीची ,मूल्यांची जोपासना करणे ,या धकाधकीच्या जीवनात जगतांना त्या मूल्यांना अध्यात्माची ,माणुसकीची झालर देणे हि आहे नैतिकता .अगदीच सोप्या भाषेत जर नैतिकता आणि औपचारिकता या दोहोंमधील फरक सांगायचं असेल तर तो म्हणजे माणसाने माणसासोबत माणसासारखी दिलेली वागणूक म्हणजे नैतिकता आणि आपण मुळात जसे नाहीच केवळ वेळेवर आणलेला नैतिकतेचा आव म्हणजे औपचारिकता .खूप फरक आहे या दोन मानसिकतेमध्ये. वाईट वेळ कधीच कुणाला सांगून येत नाही.प्रत्येक कठीण प्रसंगी आर्थिक मदतच लागते अशी बाब नसते.गरज असते ती आपुलकीची, म्हणजेच नैतिकतेची.मध्यंतरी वाचण्यात आलं होत आणि वाचून डोळ्याच्या कडा नकळत ओलावल्या होत्या एक मध्यमवर्गीय कुटुंब.पती-पत्नी आणि २ मुले.दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी त्या दाम्पत्याने स्वतःला अगदी झोकून दिल होत.मुलेही हुशार आणि मेहनती होती.मोठा मुलगा शिष्यवृत्ती मिळवून परदेशी गेला.आणि काहीच काळात त्याने लहान भावाला हि आपल्यासोबत बोलावून घेतलं.दोघेही लठ्ठ पगाराची नोकरी करत होते न चुकता दर महिन्याला आई-वडिलांना पैसे पाठवीत.इकडे या दाम्पत्यांच्या शेजारी एक मुलगा राहत होता.साधारण त्यांच्या मुलाच्याच व्हायचा .पण शिक्षणाअभावी छोटे मोठे कामे करायचा.या दाम्पत्याला काहीही गरज पडली तर तो लगेच त्यांच्या मदतीला यायचा आणि भरपूर काळजी हि घ्यायचा.त्यांची मुले रोज किंवा वेळ मिळाला तशी त्यांना फोन करायची,विडिओ कॉल वरून बोलायची.सगळं काही व्यवस्थित सुरु होत आणि अचानक त्यांच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.त्या माऊलीला तर आभाळ कोसळलेलं.दोन्ही मुलांना कळवण्यात आलं.मोठा मुलगा आला आणि परंपरेनुसार त्याने वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिला.शोकसभेत आलेल्या एक व्यक्तीने त्याला लहान भावाबद्दल विचारलं कि तो का नाही आला? तर त्यावर मोठा भाऊ बोलला "नाही,तो आईच्या वेळी येणार आहे.' त्याच हे भावनाहीन उत्तर ऐकून त्यांची आई शून्यातच गेली.स्वतःला सावरून तिने त्या शेजारच्या मुलाला जवळ बोलावलं आणि पोटच्या पोरीला उद्देशून म्हटलं'बाळ,यांना सांग,स्वतःच्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराला आळीपाळीने यावं एवढं त्यांना बंधन नाही हो.माझ्या चितेला अग्नी तूच देणार.आजपासून तूच माझा मुलगा.' सगळ्या विचारांना हादरवून टाकणारी हि घटना खूप प्रश्न समोर मांडते.नेमकं कोण जवळच होत?दर महिन्याला पैसे पाठवणारे मुलं कि प्रत्येक हाकेला ओ देणारा तो शेजारचा मुलगा? त्या उतार वयात खरं तर त्यांच्या सहवासाची जास्त गरज होती पण त्यांची गरज त्यांच्या मुलांना कळलीच नाही.त्यांनी पाळली ती फक्त औपचारिकता .याउलट त्या शेजारच्या मुलाची त्या दाम्पत्याला काहीही आर्थिक मदत नव्हती पण खंबीर आधार होता.तो त्यांची मायेनी काळजी घ्यायचा आणि जगताना याची जास्त गरज असते औपचारिकता हि बाब वाटते तेवढी सहज नाही. जोपर्यंत या औपचारिकतेचा आपण बळी होत नाही तोपर्यंत त्याचं गांभीर्य उमजण कठीणचआहे.कारण त्या माउलीने जे अनुभवलं ते आपल्यासारख्यांना कळणार नाही.पण लोकांनी आपल्यासोबत जस वागावं अशी आपली इच्छा असते तसेच आपणही त्यांच्याशी वागावं.कारण 'पेराल तेच उगवेल'. आपण वेळ नाही हि सबब पुढे करून आपली मूल्ये ,संस्कार विसरत चाललो आहे.हे सगळं वेळीच बदलायला हवं नाहीतर नैतिकता तर कालबाह्य होतच आहे नंतर औपचारिकता हि राहणार नाही.आणि तो दिवस दूर नसेल जेव्हा अंत्यसंस्काराला लोक विडिओ कॉल वरून उपस्थित राहतील.
पात्रता आपल्याला आयुष्यात काय मिळतं???? ज्या गोष्टींची आपण इच्छा करतो ते ?? नव्हे, तर आपण ज्याला पात्र असतो तेच आपल्याला मिळतं. म्हणून आपल्या इच्छांची तुलना आपण आपल्या पात्रतेसोबत कसे काय करू शकतो?? इच्छा ह्या प्रत्येक व्यक्तीच्या असतात. पण त्या सगळ्यांचाच पूर्ण होऊ शकत नाही, पण म्हणून इच्छा कधीच पूर्ण होत नाही हे विधान सर्वोतोपरी चुकीचं आहे. इच्छांना जेव्हा सातत्य, दिशापूर्व, आणि आत्मप्रेरणयुक्त मेहनतीची जोड लागते तेव्हा ती इच्छा पुर्णत्वास येते. मेहनत जेवढी महत्वाची आहे तेवढीच ती दिशापूर्ण असणे हि महत्वाचे आहे. कारण जे करण्याची बिलकुल आवश्यकता नाही अस काम कितीही सातत्य पूर्वक आणि काळजीपूर्वक केलं तरी त्याला काहीच अर्थ उरत नाही. शिडी च्या टोकावर पोहचल्यावर जर हे लक्षात आलं कि ती शिडीच चुकीच्या भिंतीवर लावली आहे तर त्या कामाला काय अर्थ? म्हणून वेळ आणि परिश्रम दोहोंचा मध्य साधून व्यवस्थापन करायला हवं. आपल्याला आयुष्याकडून काय हवं आहे आणि कुठे पोहचायचे आहे हे आधी निश्चित असायला हवं. आपल्याला जे हवं ते मिळत नाही तर आपण ज्याला पात्र असतो तेच आपल्याला मिळतं. हा ईश्वराने बनवलेला सिद्धांत आहे, तो त्याचा कायदा आहे. आपला कायदा असावा सातत्यपूर्व आणि दिशाबद्ध प्रयत्न आणि एक महत्वाकांक्षा कि या परिश्रमाद्वारे मी सर्वोकृष्ट आणि फक्त सर्वोत्कृष्ट गोष्टी साठीच पात्र बनेन.
तुमचा ससा कोणता?? आजचं युग म्हणजे धावपळीचं जीवन, यंत्रवत चालणारी माणसे आणि त्यांच्यापेक्षा हि वेगाने धावणाऱ्या त्यांच्या गरजा आणि निर्णय... आजची परिस्थिती अशी आहे कि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पदासाठी एका व्यक्तीला कमीत कमी २० स्पर्धक आहेत. प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचं आहे, स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं आहे. पण यश मात्र सगळ्यांना मिळत अस नाही. आणि सगळेच अपयशी ठरतात असंही नाही. खरं तर यश आणि अपयश या दोहोंमध्ये फरक आहे तर तो म्हणजे एकाग्रतेचा जी व्यक्ती आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करते ती कधीच अपयशी ठरतं नाही. महाभारतातील द्रोणाचार्य आणि अर्जुनाचे उदाहरण तर सर्वानाच माहित आहे. अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्विर बनण्यामागे त्याची एकाग्रता महत्वाची होती. खरं तर प्रत्येकाला संधी मिळते आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्याची, आणि कधी ती मिळाली नाही तर स्वतः ती संधी निर्माण करता आली पाहिजे. अर्जुना ला संधी मिळाली होती आणि एकलव्य नी ती संधी स्वतः निर्माण केली होती. म्हणून कधीच परिस्थिती ला दोष देऊ नका. माणसाचा हा स्वभावदोष आहे कि माणूस हा अपयशाला तेवढं घाबरत नाही जेवढं तो यासाठी घाबरतो कि अपयशाचा खापर फोडायला काही कारण मिळालं नाही तर???कटू असलं तरी हे खरं आहे.म्हणून कारण शोधण्यात कधीच वेळ दडवू नका. आहे त्या वेळेचं सोनं करा. आणि त्यासाठी आपल्या ध्येयावर एकचित्त रहा. तुमचं ध्येय लहान आहे कि मोठं हे याचा फरक पडत नाही तर तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतःला किती समर्पित करता ते जास्त महत्वाचं आहे. स्वप्न सर्व च बघतात,पण झोपेत बघतो ते स्वप्नं नसतातच मुळी, जी स्वप्ने आपली झोप उडवतात, आणि ती पूर्ण करण्यासाठी मनाला प्रेरणा देतात ती स्वप्नं असतात आणि अशी स्वप्ने त्याच व्यक्ती ला पडतात जी त्यांच्या ध्येयाशी एकरूप असतात. जर तुमच्यासमोर ९ ससे पळत असतील आणि त्यातला तुम्हाला १ पकडायचा असेल तर त्यातल्या एकावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही सगळ्यांना पकडण्याचा प्रयत्न केलात तर त्यातला एकही न मिळण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही ज्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असाल तो जर फारच पळपुटा असेल तर त्याला पकडण्याची तुमची युक्ती किंवा तंत्र बदला, पण तो ससा बदलू नका, त्यालाच चिकटून रहा. तुमच्यासमोर अनेक संधी येतील पण सगळ्याच संधी साधनं तुम्हाला शक्य होणार नाही, एक ससा पकडा, त्याला स्वतःच्या खिशात कैद करा आणि मगच दुसऱ्या सशाच्या मागे जा. यशाचा हाच मार्ग आहे.
खेळ आयुष्य म्हणजे बुद्धिबळाचा खेळ आहे आणि तो तुम्ही ' त्याच्याबरोबर' खेळत असता तुमच्या प्रत्येक चालीनंतर पुढची चाल तो खेळतो, तुमच्या खेळीचं नाव आहे 'निवड' आणि त्याच्या खेळीचं नाव आहे 'परिणाम' तुम्ही जशी खेळी कराल तस तो मात करेल तुमची परीक्षा घेतली जाईल..... तुम्हाला आव्हानं दिली जाईल..... अगदी तुमचा कडेलोट व्हायची वेळ तुमच्यावर येईल पण जर तुम्ही तुमचा खेळ शेवट्पर्यंत चांगला खेळत राहिलात तर तो जिंकेल तुम्हाला जिंकण्याची परवानगी देऊन .
मृगजळ आयुष्य म्हणजे एक विस्तारलेले रान आहे ऊन सावली च्या खेळांत लपलेलं सुख दुःखाचे कोड आहे कधी शीतल कधी उष्ण, कधी सहन न होणाऱ्या झळा आणि अचानक येणाऱ्या आल्हाददायक कळा निसर्गाच्या बाहुपाशात बिलगून नात्यांचा गोडवा गात बीज रोवून प्रीतीचे रंगांना फुलपाखरू देतंय साथ उघडून डोळे इवले,मृग हि बघतय सृष्टी झोनझवणारा वारा आणि धावणारे पाय बदलवत आहे त्याची दृष्टी बागडायला हवं त्यानं आणि आस्वाद घ्यावा जगण्याचा पण नजर जाते क्षितिजा कडे, आणि ध्यास लागतो जिंकण्याचा असंख्य धावणारे पाय ,वाट जाते एकच क्षणभंगुर ते सुख तरी हि ते हवंच होतो भास मृगजळा चा,बुद्धी होते स्थूल नाती जातात विरून ,कोमेजून जात नुकतंच उमलले फुल चूक कि बरोबर यातलं अंतर आता कळत नाही, कस्तुरी च्या शोधात स्वतः चा च शोध लागत नाही धावत धावता पाय हि क्षीण झाले एका आभासमुळे सारे जीवन कवडीमोल झाले. आता मृत्यू हि समोर येऊन थांबलाय,संगतीला कुणी नाही अपेक्षा तरी कशी करू? मृगजळा कडे जाताना मी मागे वळून बघितलं च नाही.
धुंद पावसाच्या सरी बनून मज बरसायचे होते, बनून झुळूक वाऱ्याची सर्वदूर वाहायचे होते पसरले पंख जेव्हा उडण्यासाठी, माणसातल्या लांडग्यांनी त्याचे लचके केव्हांच तोडले होते
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser