Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

भज्याची आमटी

हा एक अत्यंत चविष्ट आणि खमंग प्रकार जो भात भाकरी किंवा पोळी कशा सोबतही चांगला लागतो

भज्याची आमटी म्हंटले की कॉलेज चे दिवस आठवतात
या आमटीची ही चवीष्ट आठवण सांगितल्या खेरीज ही कृती पुरी होत नाहीं 🙂

माझ्या मैत्रिणीची आई ही आमटी अतिशय चवदार करीत असे

ज्या दिवशी मैत्रीणीकडे या आमटीचा बेत असे
त्या दिवशी सकाळी ती आमच्या खास ग्रूप मधील आम्हा दोघी
मैत्रीणीना सांगत असे ..
आज दुपारी आपण तिघी एकत्र माझ्याकडे जेवायचे आहे बर का..
आज आई भज्याची आमटी करणार आहे🙂🙂

साधारण महिन्यातून दोन वेळ तरी तिच्याकडे हा बेत असेच..
कारण तिच्या घरच्या सर्वानाच ही आमटी अवडत असे..

मैत्रिणीने असे सांगितल्या क्षणा पासून कॉलेजमधले आमच चित्त उडून जात असे 😀😀

पोटात एकदम भुकेने खड्डा पडत असे😀
कधी एकदा हे कॉलेज चे पिरियड संपतील असे होत असे..😀

यथावकाश कॉलेज सुटल्यावर लगबगीने आम्ही तिच्या घरी जायचो
तिच्या घराच्या गल्लीत शिरले की आमच्या नाकात कांदा भज्यांचा आणि खमंग आमटीचा वास शिरत असे 😋

एव्हाना साडे अकरा बारा वाजलेले असत
आमची जेवायची वेळ झालेली असे.,.

त्यात हा खमंग भज्याची आमटी चा बेत😋😋

ताबडतोब आम्ही हात पाय घुवून तिच्या स्वयंपाक घरात शिरत असु
चुलीपाशी (तसा घरी गॅस होता पण भाकरी नेहेमीच चुलीवर होत) तीची आई भाकरी थापत बसलेली असे
आम्हाला बघताच सुहास्य मुद्रेने, प्रेमाने ती म्हणायची ,
"या ग पोरीनो भुकेजला असाल ना..
(आम्ही तर कायम भुकेले असायचो च 😀)
चला पटपट पाट पाणी घेउन बसा बर जेवायला "

लगेच आम्ही पाट, पाणी ताटे ,वाट्या ,लोणच्याची बरणी ,तूप वगैरे सरंजाम गोळा करून चुलीच्या समोर गोलाकार बसायचो

त्यांच्या स्वयंपाकघरात थोडा अंधार असायचा
दुपारच्या वेळी खिडकीतुन येणाऱ्या मंद प्रकाशात आणि चुलीच्या उजेडात
दोन्ही हातानी परातीत भाकरी थापत असलेल्या तिच्या आईचा सावळा सोज्वळ चेहरा चमकत असायचा❤️
जोरात भाकरी थापत असताना त्या आवाजाच्या तालावर त्यांच्या केसांचा भरगच्च अंबाडा हलका झोके घेत असायचा ....

जवळच एका वेताच्या टोपलीत चार पाच तयार भाकरीची चळत असे
शेजारच्या चुलीवर मोठया पातेल्यात आकर्षक रंगाची चाविष्ट आमटी उकळत असायची ..
वासाने भूक आणखी खवळायची 😋

एका मोठ्या परातीत कांद्याची छोटी छोटी भजी तयार असत
शेजारीच मोठे गरम भाताचे तपेले असे
(तिच्या घरात बरीच माणसे होती त्यामुळे तिच्या आईला नेहेमीच भरपुर स्वयंपाक करायला लागे)

आमच्या वाटीत गरम आमटी वाढून ती चार चार भजी आमच्या ताटात वाढत असे
"ही घ्या गरम भाकरी ...
असे म्हणत ती आम्हाला भाकरी वाढत असे
गरम टमटमीत फुगलेली भाकरी तव्यावरून काढताच ती उलथन्याने त्याचे चार चतकोर करीत असे
आणि पानात वाढत असे
( भाकरीचे कोर हाताने न करता उलथन्याने करायची तिची ही सवय बघून बघून मला पण लागलीय 🙂)

सोबत एक एक पापड पण भाजुन देत असे

भाकरीचा कोर उघडुन आम्ही त्यात तूप घालून घेत असू
वाढलेल्या आमटीत दोन भजी टाकून
जेवणावर तुटून पडत असू..
ती भाकरी पातळ पण आकाराने खुप मोठी असे
आम्ही तशा अठरा एकोणीस वयाच्या मुली ....
आमच्यासाठी एक भाकरी, चार भजी पापड ,लोणचे इतके भरपुर होत असे..

पोट गच्च भरत असे.

तिची आई भाकरी करता करता... "अजुन वाढू का ग अर्धी.."
असे हसून म्हणत असे..
तेंव्हा आम्ही
"नको नको काकू पोट गच्च भरले आहे" असे म्हणत असू
तरीही ती आम्हाला भात वाढत असे

"पोरीनो थोडा थोडा भात खाऊनच उठायचे बर का.."
असा आग्रह करीत असे..🙂🙂

"काकू आमटी नेहेमी प्रमाणेच फर्मास झाली होती बर का..."फार आवडली...
असे आम्ही म्हणताच
"काय ग तुम्ही पोरी एवढ एवढस जेवता...
आमटी आवडली ना..पुन्हा केली की यायचं बर का.."
असे ती आमच्याकडे बघत
कौतुकाने म्हणत असे❤️

अशा वेळीं तिच्या हसऱ्या समाधानी चेहऱ्याकडे बघताना आम्हाला साक्षात अन्नपुर्णा देवीच आमच्याशी बोलत असल्याचा भास होत असे🙏

चवदार स्वयंपाकामुळे मन आणि पोट तृप्त असे 😋

आता पोट भरल्याने डोळ्यावर एक झापड यायला लागलेली असे ...
पटापट ताटे,भांडी,खरकटे उचलून आम्ही वरच्या खोलीचा रस्ता धरत असू

एकमेकींशी बोलता बोलता वरच्या खोलीत सतरंजीवर लोळताना आमचा कधी डोळा लागला कळत नसे

तीन चार वाजल्या नंतर आमचे डोळे उघडल्यावर..
आमची मैत्रीण आमच्यासाठी चहा टाकत असे

या वेळी घरच्या सगळ्यांचा जेवणाचा राम रगाडा आवरून चार घास खाऊन नुकताच तिच्या आईचा डोळा लागलेला असे
त्या माऊलीचा बाहेरून निरोप घेऊन
चहा घेउन मग आमचे आमच्या घराकडे प्रस्थान होत असे

अशी ही भज्याची आमटी किती वेळा केली तरी तिच्या आईची आठवण होतेच❤️

अत्यंत साध्या पद्धतीने केलेली ती आमटी किती चवदार लागत असे..
आणि आपण किती निगुतीने केली तरी ती अवीट चव मात्र आणू शकत नाही
हे सुध्दा जाणवते ..🙂

नेहेमी मैत्रीणीकडे खाऊन आणि बघुन ही आमटी मी अगदी तीची आई जशी करीत असे त्याच साध्या सोप्या पद्धतीने करते

साहित्य

भज्या साठी
चार कांदे
डाळीचे पीठ
तिखट हळद मीठ
भरड कुटलेले धने
कोथिंबीर

आमटी साठी
एक वाटी शिजवलेली तुर डाळ
तिखट
मिठ
काळा मसाला
कढीलिंब
गुळ
चींच
ओले खोबरे कोथिंबीर
प्रथम मध्यम आकाराचा कांदा (फोटोत दाखवला आहे) चिरुन घेणे
कांद्याला मीठ हळद तिखट चोळून दहा मिनिटे ठेवणे
कांद्याला पाणी सुटते
मग त्यात धने पुड कोथिंबीर घालून
डाळीचे पीठ घालावे
फार घट्ट अथवा फार पातळ पीठ नको
याची छोटी भजी तळून घ्यावी

आता नेहेमीप्रमाणे शिजवलेली तूर डाळ घोटून
मोहरी हिंग कढीलिंब फोडणी करून त्यात घालावी
काळा मसाला,तिखट, मीठ, गुळ चींच घालून
आमटी करावी
उकळू लागली की
थोडे खोबरे कोथींबीर घालावी
खाताना वाटीत ही दोन भजी घालून
वर गरम आमटी घालावी व खावी

भजी आमटीत सोडायची असली तर आमटी थोडी पातळ असावी ..
आमटी गॅस वरून खाली उतरवून मग त्यात भजी सोडावी व लगेच खायला घ्यावी

ही आमटी आपापल्या आवडीप्रमाणे वाटण लावून किंवा आपल्या आवडीच्या प्रकाराने सुध्दा करता येते

पण जेवढी आमटी साधी तेवढी त्यात या कांदा भजीची चव उतरेल�

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112028466
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now