नाती कशी असावीत?
नाती पाकात मुरलेल्या #गुलाबजाम इतकी गोडच असावीत असं नाही. खरंतर ती तशी गोड मिट्ट असूच नयेत. कारण
ती गुलाबजामसारखीच महाग आणि मर्यादितच असतात.
नाती टपरीवरच्या #कांदाभजीसारखी असावीत अगदी साधी पण हवीहवीशी. कधीही कुठंही हाकेला ओ देऊन धावत येणारी.
नाती असावीत गरमागरम #चहासारखी , एकदा भुरका मारला की डोकं आणि मन फ्रेश करुन देणारी.
नाती असावीत साध्या #वरणासारखी अहंपणाचा मसाला भरलेल्या कटाच्या आमटीसारखी तिखट आणि जळजळीत असू नयेत. कटाची आमटी पिताना मजा वाटते खरी पण दुस-या दिवशी आमटी तिचा प्रताप दाखवते.
नाती पुरणासारखी पचायला जड असू नयेत. ती जितकी #मक्याच्या -लाह्यांसारखी हलकी असतील तेवढी दिवसेंदिवस फुलत जातात.
नाती सीताफळासारखी असू नयेत.समज कमी नि गैरसमज जास्त.एकवेळ ती #फणसासारखी असतील तरी चालेल.वरुन काटेरी आतून रसाळ
नाती असावीत #सुधारसासारखी , आपल्या आर्थिक चणचणीच्या काळात पक्वान्न खाल्ल्याचं समाधान देणारी.
नाती कडूही असावीत पण कारल्याइतकी असू नयेत. ती #मेथीच्या -भाजीइतकी कडवट असावीत त्यांचा कडवटपणाही जीभेला चव आणणारा असावा.
नाती श्रीखंडासारखी श्रीमंत नसली तरी चालेल पण #ताकासारखी शिणवटा दूर करणारी असावीत.
#कैरीसारखं एखादं नातं असेल तर त्याचा मुरांबा मात्र आपल्याला करता यायला हवा.
#आंब्यासारख्या मधुर नात्यावर काही प्रक्रीया करण्याची गरजच नसते. ते उपजतच सर्वांगसुंदर आणि राजेशाही थाट मिरवणारं असतं.
नाती दूधासारखी नासणारी नकोत. #तूपासारखी अमर हवीत. पाण्याचा शिबका मारला की कडकड आवाज करणारं तूप त्याच्या घमघमाटानं घर भरुन टाकतं. तशी नातीसुद्धा पुरेपूर कढलेली आणि सुगंध पसरवणारी असावीत.
नाती चायनिज आणि इटालियन सारखी आधुनिक ढंगाची असली तरी हरकत नाही पण त्यातही कण्या आणि आंबिलीतली सात्विकता हवी. पौष्टिकता हवी.
नाती असावीत देवाला दाखवलेल्या #नैवेद्याच्या पानासारखी. मात्र नैवेद्याच्या पानात वेगळं मीठ वाढलेलं नसतं. कारण पदार्थांमधलं मीठ बरोबर असतं. हे चवीपुरतं मीठ प्रत्येक पदार्थात असावंच लागतं.
नैवेद्याचं पान देवाने उष्टं केलेल, त्याला सर्वच मान देतात. मग चटणी कोशिंबीर असो वा पोळीभाजी, नैवेद्याच्या पानातल्या सर्वांना अगदी आदराची, पावित्र्याची वागणूक मिळते. नैवेद्याचं पान खायला मिळणं भाग्यात असावं लागतं हेच खरं!
संग्रहीत पोस्ट
विवेक कुलकर्णी यांचा आभारी आहे.cp