अंबरनाथ आणि बदलापूर मध्ये अधिकृत रिक्षा प्रवासी भाडे घोषित
रिक्षा चालकांना किमान भाडे ९ रुपये ठरवून देण्यात आले आहे, अशी माहिती कल्याण आरटीओचे अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितले
अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये बेकायदा पद्धतीने प्रवासी रिक्षा भाडेवाढ करणाऱ्या रिक्षाचालकांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने (Kalyan RTO) दणका दिला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांतील अधिकृत रिक्षा प्रवासी भाडे घोषित केले असून, दीड किलोमीटरपर्यंत ९ रुपये, तर चार किलोमीटरपर्यंत कमाल भाडे २४ रुपये इतके जाहीर करण्यात आले आहे, असे कल्याण आरटीओचे अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितले. बदलापूर व अंबरनाथ शहरात सध्या किमान भाडे १० ते १५ रुपये आकारले जाते. तर कमाल भाडे ३० ते ३५ रुपयांपर्यंत आकारले जाते. त्यामुळे आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे
करोना काळात रिक्षांमधून प्रवासी वाहतूक बंद होती. कालांतराने राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार रिक्षात दोन प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रवासी फेरी परवडावी म्हणून रिक्षाचालकांनी अघोषित भाडेवाढ केली. पर्याय नसल्याने प्रवाशांनी अतिरिक्त भाडे देण्यास सुरुवात केली. सध्या रिक्षात तीन ते चार प्रवासी बसवले जात असतानाही अतिरिक्त भाडे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वाद होत आहेत. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाने याची दखल घेत,
आता अधिकृत रिक्षा प्रवासी भाडे घोषित केले असून, यात किमान भाडे ९ रुपये ठरवून देण्यात आले आहे
मात्र सकाळी लोकल पकडण्याच्या गडबडीत वाद टाळण्यासाठी प्रवासी मागेल ते भाडे देऊन निघून जातात, त्यामुळे रिक्षाचालकांचे फावते. अशावेळी परिवहन विभागाने केलेली भाडेकपात रिक्षाचालक स्वीकारण्याची शक्यता कमी वाटते, असे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले.