मुंबईत कोरोना रुग्णांचे पॉझिटिव्ह रेट कमी होत आहेत
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट आता कमी होत आहे. मुंबईत कोरोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण आता १० टक्क्यांच्या खाली आले आहे. मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली. गुरुवारी मुंबईत कोविड पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ९.९४ टक्के होते. गुरुवारी एकूण ४,३२८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एकूण ४३ हजार ५२५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती.जवळपास ४४ हजार चाचण्या केल्यानंतर आज पॉझिटिव्हिटी रेट एकआकडी आहे" असा दावा चहल यांनी केला. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट २०.८५ टक्के होता. चार एप्रिलला हा पॉझिटिव्हिटी रेट २७.९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. त्यादिवशी ५१ हजार ३१३ नमुन्यांच्या चाचण्यांपैकी ११ हजार ५७३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले होते.मुंबईतील ८५ टक्के नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत नसल्याचे चहल यांनी सांगितले. कोरोना रुग्णांसाठी सध्या ५,७२५ बेड्स रिकामे आहेत. मुंबईत रुग्ण संख्या कमी असली, तरी महाराष्ट्राच्या अन्य भागात मात्र कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झालेले नाही.