लोकशाहीचा चौथा स्तंभ खरोखरी आपली भूमिका बजावतो?
आज 6 जानेवारी. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी याच दिवशी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. एकूणच मराठी वृत्तपत्रांची वाटचाल थ काळात पाहिली तर ती अतिशय खडतर होती. बातम्या गोळा करताना बातमीदाराला खूप यातायात करावी लागत होती. वाहतुकीच्या सुविधा फारशा न्हवत्या. फोन, फॅक्स, तार , टपाल या माध्यमातून ग्रामीण भागातून बातम्या पाठवाव्या लागत होत्या. त्या वृत्तपत्र कार्यालयास पोहचतील की नाही याची खात्री न्हवती. बातमीचा दर्जा पाहून त्या काळात रोख मानधन दिले जात असे. बातमीला एक दर्जा होता.शासन यंत्रणा हादरवून सोडण्याची ताकद बातमीत होती. दैनिकाच्या मालकानाच गरिबी व कष्टाची जाण होती. समाज व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचे काम होत होते. शोधक पत्रकारिता होती. लोक आतुरतेने दैनिकांची वाट पहात होते. एक वृत्तपत्र दिवसभर वाचले जायचे इतका भरगच्च मजकूर त्यात असायचा.
काळ बदलला पत्रकारिता बदलली. पूर्वी बातमीदार हा एकच शब्द रूढ होता. आज बातमीदार, प्रतिनिधी, वार्ताहर असे वेगवेगळे शब्द अस्तित्वात आहेत. सध्या तर बातमीदार, पत्रकार हे शब्द काळाच्या ओघात नष्ट होऊन जाहिरातदार हा शब्द रूढ झाला आहे. वृत्तपत्राच्या मालकांना बातम्या नकोत जाहिराती हव्यात. एक वेळ बातमी चुकली तरी चालेल पण जाहिरात चुकता कामा नये. जाहिराती मिळवण्यासाठी राजकारण्यांच्या दारात सकाळपासून हे पत्रकार कम जाहिरातदार काही तरी हाती पडेल या अपेक्षेने बसलेले असतात. जाहिरातीचा वर्ग आपल्या हातून जाईल म्हणून त्याला गोंजारत बसतात.
काही वृत्तपत्रांच्या बाबतीत तर न बोलणेच चांगले. खूषमस्करी करणारी बातमी देऊन ते वृत्तपत्र घेऊन संबंधितांच्या दारात जायचे व त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवून घ्यायची हे तर आता नित्याचे झाले आहे. जाहिरात देणाऱ्याना प्राधान्य हेच तत्व आज अस्तित्वात आले आहे.
पूर्वी प्रत्येक दैनिकांची काही वैशिष्ट्ये होती. प्रत्येकाचे लेखन स्वतंत्र होते. लोक ते आवडीने वाचायचे. त्यात अभ्यासपूर्ण माहिती असायची. वृत्तपत्रातील बातमी लोक प्रमाणभूत मानायचे. घटना एकच पण प्रत्येकाची लेखनशैली वेगळी होती. आज सामूहिक पत्रकारिता होत आहे. एकजण बातमी लिहून त्याच्या झेरॉक्स इतरांना पुरवत असल्याने सर्व दैनिकातील बातम्या एकसारख्या वाटत आहेत. संस्था आपल्याला पाहिजे तशा बातम्या छापून आणत आहेत. गावोगावी कधीच चार ओळी स्वतःच्या मनाने लिहल्या नाहीत ते जेष्ठ पत्रकार म्हणून वावरत असून अन्य बातमीदारावर आपला अंकुश ठेवत आहेत.
दिसेल ते लिहणे, वास्तवतेवर आधारित लिहणे, कोणाला तरी खुश करण्यासाठी न लिहणे, केवळ टोचणी देण्यासाठी लिहणे, एखाद्याला लेखणीने रक्तबंबाळ न करणे, समाजासाठी लिहणे, सेवाभावी वृत्तीने काम करणे, विशेष म्हणजे शुद्धच लिहणे याचा विसर या माध्यमाला पडता कामा नये.
अगदी सगळ्याच पत्रकारांना या पट्टीत मोजून चालणार नाही. काहीजण खरच सेवाभावी वृत्तीने व पोटतिडकीने लिहतात त्यांचा यथोचित गौरव देखील झाला पाहिजे. आज कागदाच्या वाढलेल्या किमती, जाहिरातीचा कमी झालेला ओघ, लोकांचे फारसे न लाभणारे पाठबळ, मालकाची मर्जी, त्यांचा वाढता हस्तक्षेप, संपादक पद टिकविण्यासाठी करावी लागणारी धडपड आशा कितीतरी गोष्टी आहेत. वृत्तपत्र आणखी किती काळ चालतील याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही.
आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व पत्रकार बंधु भगिनींना हार्दिक शुभेच्छा. समाज प्रबोधनाचे काम आपल्या हातून अधिक घडावे हीच अपेक्षा!!!
प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार, मोबाईल क्रमांक 9881157709