आज मकर संक्रांत.संक्रमणाचा दिवस .जुन्या वर्षातून नवीन वर्षात संक्रमण, एका ऋतूतून दुसर्या ऋतूत संक्रमण.
खरं तर आपल्या आयुष्यात संक्रमण हे क्षणोक्षणी घडतच असत .आपल्या कळत नकळत. आता मनात असलेल्या विचारांची जागा दुसऱ्या क्षणी दुसऱ्या विचाराने घेतलेली असते.आता हातात असलेली वस्तू पुढील क्षणी आवडेलच याची खात्री नसते.
संक्रमण, बदल हा विश्वाचा ठायी भाव आहे. गेल्या क्षणाला तिलांजली देऊन येणाऱ्या क्षणाचं तिळगुळ देऊन आनंदाने स्वागत करायच ही आपली हिंदु परंपरा. युगानुयुगे चालत आली आहे.
आयुष्यात बर्याच बर्यावाईट घटना घडतात, कळत नकळत, जाणून बुजून एकमेकांना दुखावल जात. अनाहूतपणे एकमेकांना अपमानित केलं जात.
कसही असलं तरी जखमा ह्या होतातच. त्या जखमांचा निचरा होणं हे तितकेच महत्त्वाचे असते म्हणूनच आपल्या पुर्वासुरींनी मार्गदर्शन ही केले आहे.
सणवार, व्रतकैवल्ये, तीर्थविधी,प्रायश्चित्त असे अनेकानेक मार्ग सुचविले आहेत .त्याचाच अवलंब करून आपण आपले जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करतो.
त्यातलाच आजचा हा दिवस... मकर संक्रांत.
चला तर मग सारं सारं विसरून हा दिवस आनंदाने साजरा करु या!
हा घ्या माझ्या कडून प्रेमरुपी तीळगूळ.
तीळगूळ घ्या गोड बोला.