काल्याचं कीर्तन
कोणत्याही सप्ताहाची, उत्सवाची सांगता लळिताच्या कीर्तनाने करण्याची कीर्तन परंपरा आहे. मात्र त्यापूर्वी कृष्णाच्या लीला कथन करणारं काल्याचं कीर्तन हा एक विशेष आविष्कार म्हणावा लागेल.
काला म्हणजे गोपाळकाला. कृष्ण आणि छोटे सवंगडी यांना आरती करून मानाने देवळात आणलं जातं.देवळाला भोवती म्हणजेच प्रदक्षिणा घातली जाते आणि बाळकृष्ण मंदिरात येतो.
कृष्ण आणि त्याच्या बालगोप सख्यांचं आनंदनिधान म्हणजे दही,दूध,लोणी चोरणं... या जाचाला,बाललीलांना कंटाळून शेवटी यशोदेने कृष्णाला आणि त्याच्या सवंगड्यांना गाई घेऊन चरायला पाठवलं... बुवा रंगून सांगत असतात... तबला आणि पेटीच्या साथीवर कथा पुढे जाते.
बाळसवंगडीच ते.गाई वळायला सोडल्या की ते थोडेच शांत बसणार???? मग सुरु होणार त्यांचे खेळ.... आट्यापाट्या,चेंडूफळी,फुगडी....
विरजण घुसळणं हा गोपींचा प्रतिकात्मक उद्योग असं सारं सारं...
बुवा गात असतात,,, गोपाला गोपाला.. आणि त्या तालावर पुरुषांच्या आणि महिलांच्या फुगड्या रंगू लागतात. सोन्याचा वर्ख आणि मोत्याच्या माळांनी सजवलेला छोटा चेंडू विठोबाच्या हातांना लावला जातो... कुणीतरी तो कीर्तनकार बुवांकडे फेकतो.मग बुवा तो झेलून परत देवाकडे फेकणार.... असा सोहळा सुंदर साजिरा... तो संपताना सगळे देवळाच्या अंगणात जातात.कुंकू रेखलेल्या छोट्या मडक्यावर श्रीफल ठेवलेलं असतं. बुवा ती हंडी फोडतात..
खेळून दवलेले सवंगडी आपापल्या शिदोर्या उघडतात.सर्वांचा गोड तिखट खाऊ,पोहे असं सगळ्ळं एकत्र कालंवलं जातं.त्याचा प्रसाद सर्व भक्तांना वाटला जातो. तो अवीट चवीचा प्रसाद जिभेवर घोळतो तोच बुवा भैरवीचे सूर आळवतात. आरती होते आणि काल्याची सांगता होते. मनात आणि आठवणीत रूंजी घालतं काल्याचं कीर्तन आणि बाळगोपाळ. दमल्या भागल्या ग्रामीण जनतेला क्षणभर विसावा देणारा आणि दैनंदिन चाकोरीतून महिलावर्गाला दिलासा देणारा उत्सव... रात्री समईच्या उजेडात पेंगताना विठोबाच्या बाळमुठीत असेल घट्ट पकडलेला सोनेरी वर्खाचा मोती जडवलेला त्याचा चेंडू...