त्रिपुरी....
आकाशातला पूर्णचंद्र तेज ओतत होता पृथ्वीवर! घरोघरी लावलेल्या कंदिलांना आणि दिव्याच्या माळांनाही त्याचा हेवाच वाटावा असाच! निसर्गाचा मनमुक्त आविष्कार!त्रिपुरवाती लावून शंकराच्या मंदिर परिसरात भाविकांची पूजा सुरु होती!कैलासराणा शिवचंद्रमौळीवर अभिषेक झाला दुधाचा.रूद्रसूक्ताने गाभारा निनादत होता. नंतर शिवाचा सुंदरसा चांदीचा बोलका भारदार मुखवटा पिंडीवर विराजमान झाला.भस्मविलेपित भोळा सांब फुलांच्या माळांनी उटीच्या गंधाने सजला. पार्वतीनेही पाहिलं असावं त्याच्या रूपाकडे निरखून!!
आकाशीच्या चांदण्याही आजच्या चद्रबिंबाकडे तशाच पाहत असतील एकटक!!
मंदिरातली लगबग वाढली. पणत्यांमधे वाती घालून,तेलाने त्या भरून भाविक मंदिर पटांगण भरून टाकू लागले.
समोरच्या व्यासपीठावर शिवाला सेवा अर्पण करीत नृत्यांगना शिवस्तुतीवर पदविन्यास करू लागल्या! त्यांच्या हालचालीही किती मोहक! नंतर साक्षात शिव अवतीर्ण झाले! डमरूचा नाद करत त्यांचं तांडव पाहण्यात भाविक तल्लीन झाले.त्यानंतर रथात बसून बालगणेश,कार्तिकेय,पार्वतीमातेसह शंकर आले आणि वाद्यांच्या तालाने वातावरण भरून गेलेले असताना त्यांनी कागदी त्रिपुरासुराचा वध केला!! डोळ्यांच्या पापण्या लवेपर्यंत क्षणात आकाश आतषबाजीने भरून गेला! सोनेरी चांदण्या बरसू लागल्या.बालगोपाळच काय तर सर्व जमलेला प्रेक्षकवर्ग त्या आतषबाजीने हरखून गेला!!!
गर्दी पांगली.रस्ते आणि मंदिर प्रांगण मोकळं झालं... पण अजूनही...
चंद्र आकाशात होता... पणत्यांची शांत जाग मंदिरात होती. शिव प्रसन्न होता आणि एक धाकुटी त्रिपुरवात त्याच्या चरणी स्वतःला लीन करीत होती...
आर्या