“एका निर्णयाची किंमत!”
माणसाच्या आयुष्यात काही निर्णय असे असतात की, ते घेताना मनाला खूप आनंद होतो; पण कालांतराने त्याच निर्णयांचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. काही निर्णय विचारपूर्वक घेतले जातात, तर काही भावनेच्या भरात. त्या क्षणी आपले मन जे सांगते तेच योग्य वाटते. मात्र काळ पुढे सरकतो, परिस्थिती बदलते आणि आपण घेतलेल्या निर्णयांची दुसरी बाजू समोर येऊ लागते.
प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर भावना आहे. पण प्रेमाबरोबर समजूतदारपणा, विश्वास, जबाबदारी आणि भविष्याचा विचार नसेल, तर त्या प्रेमाचे रूपांतर दुःखात होण्यास वेळ लागत नाही.
अशाच एका निर्णयाची आणि त्यातून घडलेल्या आयुष्याची ही कहाणी आहे. प्रेमासाठी घरदार सोडणाऱ्या दोन जीवांची, संसार उभा करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका स्त्रीची आणि शेवटी आयुष्याच्या वळणावर उभे राहून आपल्या निर्णयांचा विचार करणाऱ्या तिच्या मनाची!
दीपावलीसाठी मी बहिणीला भेटण्यासाठी हिंगणघाट गेलो होतो. तिथेच माझा कॉलेजचा जिवलग मित्र प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. त्याच्या भेटीला जात असताना अचानक मला आवाज ऐकू आला.
"दादा, दादा. थांब."
मी त्या आवाजाने कार थांबविली. बघितले तर ती प्राजक्ता ताई होती. मी कार बाजूला पार्क केली.
प्राजक्ता ताई ही त्यावेळेस बी. ए. ला होती. माझ्या घराजवळच राहत होती. ती मराठा समाजाची होती. मी नुकताच वणीवरून राहायला आलो होतो. ती हुशार व अभ्यासात चांगली होती. स्वभावाने मनमोकळी होती. ती सहज कुणाशीही बोलायची. तिची माझ्यासोबत चांगलीच मैत्री होती. ती मला सुरुवातीपासूनच दादा म्हणायची. ती माझ्यापेक्षा एक वर्ष पुढे होती. तरी पण ती मला दादा कां म्हणायची हे एक कोडंच होत.
मी त्यावेळेस प्री-युनिव्हर्सिटी कॉमर्सला होतो. माझ्यासोबत बसणारा माझा मित्र प्रभाकर हा अजंता गावावरून कॉलेजला यायचा. तो राहणीमानात खूप पॉश राहायचा. दिसायलाही रुबाबदार होता. अभ्यासात फारसा हुशार नव्हता. घरचा सुखी होता. त्याच्याकडे दहा एकर जमीन होती. एकुलता एक मुलगा होता. तो आणि मी एकाच बेंचवर जवळ जवळ माझ्या सोबत राहत असल्याने हळूहळू त्याची ओळख प्राजक्ता ताईशी झाली. तो आता अधिकच जास्त तिच्या संपर्कात राहू लागला. त्याचे तिच्याबद्दलचे आकर्षण वाढू लागले.
एक दिवस कॉलेजमध्ये असतांना प्राजक्ता ताई माझ्याशी बोलत उभी होती. सोबत माझा मित्रही होता. मित्र थोड्या वेळाने लायब्ररीत गेला. ती गप्पा गोष्टीत रंगून गेली. एवढ्यात प्रभाकर आला. त्याने माझी कॉलर पकडली. तो मला म्हणाला,
"खबरदार पुन्हां बोलतांना दिसला तर!"
तेवढ्यात माझा मित्र आला. त्याने मध्यस्थी केली. इकडे प्राजक्ता ताईलाही कळले नाही. काय झाले ते? तिनी माझी माफी मागितली पण मी मात्र आता दोघांशीही बोलणे टाळत होतो.
त्यांची मैत्री वाढतच गेली. ती फारशी श्रीमंत नव्हती. तिचे वडील कारखान्यात काम करीत होते. आई नसल्याने प्राजक्ता ताई आणि बाबा दोघेच राहत होते. छोटेसे घर होते. ती मराठा समाजाची होती. प्रभाकर हा कुणबी समाजाचा होता. त्यांची मैत्री वाढू लागली. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तीच ही प्राजक्ता ताई.
तिला म्हणालो,
"चल, कॉफी घेऊ."
मी व प्राजक्ता ताई हॉटेल मध्ये बसलो होतो. एवढ्यात माझे लक्ष तिच्या कडे गेले. तिला पाहून मन बेचैन झाले. तिच्या गळ्यात ती सौभाग्यपोत नसल्याने मी म्हणालो,
"हे काय?"
प्राजक्ता ताई रडायला लागली. मी म्हणालो,
"सांभाळ स्वतः ला. मला सांग तर काय झाले ते. तू सांगितल्याशिवाय मला कसे कळेल."
प्राजक्ता ताई सारखी बोलत होती. मी शून्य अवस्थेत ऐकत होतो. ती बोलतांना कधी खंबीर तर कधी हळवी होत होती. तिची संभ्रमावस्था बघून मी म्हणालो,
"चल मंदिरात जाऊन बोलू या."
प्राजक्ता ताई मंदिरात येताच मला म्हणाली,
"हे मंदीर बरे आठवले तुला? खरं सांग हेच ते मंदीर नं! तुझ्या आठवणीचे! तुझ्या आणि कुसुमच्या प्रेमाची सुरुवात येथूनच झाली होती ना!”
मी तिला म्हणालो,
"ताई तू पण नं! कसली गं तू "
"त्या आठवणी नको आता. निवांत जागा म्हणून मी इथे तुला आणले. बाकी काही नाही."
"बरं ठिक आहे बाबा. करून देते तिची भेट."
"ताई, तू आहे तशीच आहे अजूनही. बरं जाऊ दे. सांग बरं काय म्हणत होती."
प्राजक्ता ताई बोलू लागली.
"अरे माझा नुकताच बी. ए. फायनल चा निकाल लागला होता. त्याने मला कॉलेज मधूनच सोबत चल म्हटले. मी त्यांच्या मोटरसायकलवर बसली. त्याने शहराच्या बाहेर नेत असल्याने मी सहजच विचारले. तो म्हणाला, अगं, माझ शेत दाखवायला नेत आहे. त्याचे शेत रोडवरच होते. तो सांगत होता. हे माझे शेत. मी एकटाच आहे. मला भाऊ बहीण कुणी नाही. पण मला आज खूप भीती वाटत होती. कारण बाबा वाट पाहिलं. पण एवढ्यात पावसाचे जोरदार वातावरण तयार झाले. पाउस सुरु झाला. नको तेच घडले. तो जास्त जवळ येऊ लागला. मी त्याला विरोध करीत होते. त्याने माझ्या इच्छेचा आणि स्वातंत्र्याचा अनादर करणे सुरु केले. मला मनातून राग आला होता. मी असहाह्य झाली होती. पण तो हट्टी स्वभावाचा होता. त्यानंतर त्याने मला घरी सोडले. मला काय करावे अनं कुणाला सांगायचे असे झाले. एक दिवस तो घरी आला. त्याला सांगितले तर तो म्हणाला आपण स्वतंत्र राहू. त्याने खोली करून दिली. मी मात्र या ठिकाणी चूक केली. मी बाबांना न सांगताच निघून गेली कारण मला त्याच्यावर विश्वास्स व भावनिक ओढ होती.
आमचे काही दिवस बरे चालले होते. तो माझ्यासोबत राहत होता. तीन चार महिन्यांनी त्यांच्या स्वभावात परिवर्तन झाले. तो आता नशा करू लागला. एका रात्री तो अकरा वाजता घरी आला. त्याने माझ्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला. पण तोच हात मी पकडला आणि त्याला चांगलेच झोडपून काढले. पूर्ण राग त्याच्यावर काढला. मग तो येत नव्हता. त्याच्या नशेचे कारण आणि आमची ती शेतातली घटना त्याच्या बाबाला कळली. ते एक दिवस माझ्या खोलीवर आले. माझी अवस्था बघून ते अस्वस्थ झाले. त्यांनी माझ्या बाबांची भेट घेतली आणि जबाबदारीही घेतली.
मी एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव प्रभाकर ठेवले. कारण मला भेटलेला प्रभाकर त्याचा सारखा होऊ द्यायचा नव्हता. मला सासू -सासऱ्यांनी स्वीकारले होते. ते काळजी घेत होते. इकडे त्याचे प्रमाण वाढत गेले. एक दिवस त्याच्या मृत्यूची बातमी आली. माझ्या मनावर खूप परिणाम झाला. त्या दिवशी मला जाणवले की, माणूस अनेकदा स्वतःच्या सुखाचाच विचार करतो. आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यावर काय परिणाम होईल, याचा विचार मात्र करीत नाही. माणूस किती स्वार्थी असतो. स्वतः साठीच जगतो. असा तो निघून गेला. मी जाऊ शकली नाही. खूप रडली.
माझ्या निर्णयाची किंमत खूप मोजावी लागली. कधी कधी वेळप्रसंगी बोलणे गरजेचे असते. वडिलधाऱ्यांचा मान ठेवावा लागतो. त्याचा सल्ला फार महत्वाचा असतो.
मला सासऱ्यांनी कॉन्व्हेंटला नोकरी मिळवून दिली. दोन-तीन वर्षे निघून गेले. मला आज बाबांची खूप आठवण झाली. मी मुलाला घेऊन बाबांच्या घरी गेली. बाहेरच
थांबली. मुलाला पाठविले. त्या लहान मुलाला बघून माझे बाबा शांत झाले. बाहेर आले. मला म्हणाले,
“आतातरी घरी येणार नाही कां? की आपल्याच मनानी वागणार आहेस?”
लगेच बाबांनी हात पकडून घरी आणले आणि कुठेच जायचे नाही आता. तुझे सासरे आले होते. सर्व सांगितले मला.
मी आता बाबांसोबत राहू लागली. तिकडे माझ्यासाठी माझ्या सासऱ्यांनी नवीन घर बांधून दिले. आम्ही त्या घरात राहू लागलो. काही दिवसात बाबांचे निधन झाले. मी परिस्थितीशी संघर्ष करीत राहिले; पण हार मानली नाही. जिद्दीने डी.एड. पूर्ण केले आणि प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरी मिळवली. त्यानंतर अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. बी.एड. केल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे. आयुष्याने खूप काही शिकवले; पण त्याचबरोबर पुन्हा उभे राहण्याचे बळही दिले. आता सर्वत्र आनंद होता. सासू सासरे माझ्याकडे अधूनमधून राहायचे.
तुझी भेट झाली. खूप आनंद झाला. चल घरी चल आणि हो. तुझ्या मैत्रिणीची भेट करून देते. ती इथेच आहे. बघ.
आयुष्यात एका निर्णयाची किती किंमत मोजावी लागते. मी बाबांना विचारून त्याच्या सोबत जायला हवी होती आणि नंतरही बाबाला खरं खरं सांगितलं असतं तर, किती बरे झाले असते! असो.
चल माझ्या बरोबर. कुसुम ला भेटायला. तुझी ती मैत्रीण. विसरलास कां? अरे! ती तुला नाही विसरली. तिला एकदा भेटायचं आहे तुला. ती अनेकदा तुझ्याबद्दल विचारत असते. तुझी भेट व्हावी, अशी तिची इच्छा आहे.”
मी म्हणालो,
"अगं राहू दे. तीचे ठिक चालू आहे. मी देखील संसारात स्थिर झालो आहे. नको आता."
"अरे! दुरूनच तुमची भेट घडवून देतो बस. तिला एकदा भेटायचं तुला. ती म्हणत होती मला. तो कधी भेटेल मला. तिने मुलाचे नांव तुझेच ठेवले आणि योगायोग बघ. तिला अनेक मुलं बघायला आली पण शेवटी तुझ्या आडनाव असलेल्या मुलाला होकार दिला.”
"पागल आहे ती. नको ते करत असते ती."
"पुरुषांना काय कळणार स्त्री मन"
असे म्हणताच आम्ही घराजवळ पोहोचलो. मी कारमधेच बसलो होतो. प्राजक्ता ताई आतमध्ये गेली. तिला समजताच कुसुम घराच्या बाहेर आली आणि म्हणाली,
"आयुष्यात नाही आलास पण आता घरात येणार नाही कां?"
मी विचारात पडलो होतो. या दोन स्त्री मनाच्या मध्ये. गप्पा गोष्टी करत वेळ निघून गेली. ताई वाट पाहत असेल. असे म्हणताच त्या दोघी म्हणाल्या.
"आम्ही केव्हाच कळविले आहे तिकडे. आम्ही तुझ्या ताईचे घर बघितले आहे."
मी म्हणालो,
"म्हणजे हा तुमचा डाव मी समजू शकलो नाही."
तसा तू पूर्वीपासून बुद्धू आहेसच. एरवी आम्ही तुझ्या मागे तुला बुद्धू म्हणून चिडवीत होतो.
आता समजले मला. ठीक आहे. आता माझी सुटका करा म्हणजे झाले.
असे म्हणताच तिघेही हसायला लागलो.
काही वेळाने मी दोघांचा निरोप घेतला. कार सुरू केली आणि बहिणीच्या घरी जाण्यासाठी निघालो. पण मन मात्र तिथेच रेंगाळले होते.
प्राजक्ताच्या आयुष्यातील घटना डोळ्यांसमोरून सरकत होत्या. प्रेमात पडणे हा गुन्हा नव्हता; पण प्रेमाच्या भरात स्वतःच्या भविष्याचा विचार न करणे, जवळच्या माणसांचा विश्वास न घेणे आणि योग्य वेळी सत्य न सांगणे याची किंमत तिला मोजावी लागली होती.
तरीही तिने परिस्थितीसमोर हार मानली नाही. दुःखाचे ओझे मनात ठेवून ती पुन्हा उभी राहिली. स्वतःचे शिक्षण पूर्ण केले, नोकरी मिळवली आणि मुलाचे भविष्य घडविण्याचा निर्धार केला.
मनात एक विचार आला.
आयुष्यात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे; पण त्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारण्याचे धैर्यही आपल्यात असायला हवे. निर्णय घेताना भावना महत्त्वाच्या असतातच; मात्र विवेक, समजूतदारपणा आणि भविष्याचा विचारही तितकाच आवश्यक असतो.
कारण काही निर्णय क्षणभराचा आनंद देतात; पण त्यांचे परिणाम आयुष्यभर सोबत राहतात.
खरंच, आयुष्य जगताना निर्णय घ्यावाच लागतो; पण तो घेताना स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याबरोबरच आपल्या माणसांच्या अनुभवाचाही विचार करायला हवा.
शेवटी मनात एकच विचार आला...
'निर्णय आपला असतो; पण त्याची किंमत कधी कधी संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागते!'
निष्कर्ष एवढाच की, आयुष्याच्या वाटेवर निर्णय घेताना मनाचा विचार करावा; पण त्या निर्णयाचे परिणाम स्वीकारण्याची तयारीही ठेवावी. कारण आयुष्य आपल्याला निर्णय घेण्याची संधी देते; मात्र प्रत्येक निर्णयाचे परिणाम आपल्या मनाप्रमाणे असतीलच असे नाही!
दि. 3 नोव्हें., 2026.
प्रा. डॉ. विनोद राऊत,
से. नि. प्राध्यापक,
अमरावती.