पोरकं माहेर
बाप गेल्यावर. . माहेरचं अंगण ओसाड होतं घर, ओसरी, छप्पर..... सारं सारं मुरमाड होतं. फुलत नाही तिथं आता .. मळे कौतुकाचे.. डोळ्यांची फुलवात लावून... दारी कुणीच उभं नसतं.
चांदण्यांची तगर... पाण्याविना सुकून जाते... काळजी आणि मायेचं... शब्दांतलं शिंपण नसतं. घरभर विखुरलेल्या वस्तू... निराधार असतात.. चष्म्याचं घर, कसली बिलं नि कुठे याद्या... बिचाऱ्यांच्या
सोबतीला कुणी नसतं .
घरभर विखुलेल्या आठवणींना ... कवटाळून पहायचं
फोटोतल्या क्षणांच्या शिदोरीत आपलं माणूस नसतं
बाप गेल्यावर... शिक्षा असते त्या घरात जाणं
चार भिंती आणि छप्पर उरलं ... हे काही माहेर नसतं
लोक म्हणतात... मुलीची पाठवणी करणं फार कठीण
असतं
पण बापाची पाठवणी करणं... हेही काही सोपं नसतं
एकेक वस्तू आता .. पसारा म्हणून आवरत जातो
त्याच्याच वास्तूमधील त्याचेच स्पर्श पुसत जातो...
पाठवणीला कुंकू लावता न येणारी आई.. नजर चोरू
लागते...
अन् बाप जातांना .. अख्खं माहेर पोरकं करून जातो.
नंदिनी अरुण पाटील...