होम मिनिस्टर
कैक विनोद ऐकावयास, वाचावयास मिळतात होम मिनिस्टर उर्फ ग्रुहिणीबद्दल. ग्रुहिणी मग ती नोकरी करणारी असो वा चोवीस तास घरात वावरणारी, तिचं काम सोप्पं नसतं. घरातील प्रत्येक सदस्याचे ताण ती शेअर करत असते, सुखात तर सहभागी व्हायला सारेच आतुर असतात पण बिकट क्षणात कुटुंबातील प्रत्येकाला आबालवृद्धांना साथ देते ती घरातली स्वामिनी. ती एक दिवस जरी झोपून राहिली तरी घर पारोसं होऊन जातं. घराची रया जाते. घरासाठी, घरातील प्रत्येक सदस्याची कामं वेळेवर व्हावीत यासाठी या स्वामिनीला कित्येकदा स्वतःच्या आवडीनिवडींवर बंधनं घालावी लागतात. माझं वॉशिंग मशीनचं राहुदेत यावेळी लेकीला हव्या त्या ट्युशनला घालू, लेकाला लेपटॉप घेऊ..काय म्हणता पैसे..आहे माझ्याकडे थोडी शिल्लक, तुम्ही नका काळजी करू..हा सपोर्ट देते ती स्वामिनी असते, म्हणूनच की काय तिला अर्धांगिनी म्हणतात. तनामनाने ती घराशी एकरूप होते.